Sunday 4 December 2022

जीवनमोती-

 

जीवनमोती-

 

मला पुण्याचाच नवरा पहिजे. तोही कोथरूड किंवा सदाशिव मधला. मुंबईला काही वेगळे नाही. सेंट्रलवर काम करणारी हार्बरवरचा नवरा नको म्हणते तर हार्बरवरचा वेस्टर्नची मुलगी नको म्हणतो. सत्य परिस्थिती पाहता पुणे जो सोडतो त्याला काहीच उणे पडत नाही आणि पुण्याला `एके काळचं आमचं घरसांभाळत बसतो तो पाण्याला प्रेशर नाही--- पिरपिर पाणी समस्या, लिफ्ट नाही. मजल दर मजल करत धापा टाकत दुखऱ्या गुडघ्यांनी चवथ्या मजल्यावर पोचता पोचता वैतागून जातो. पण तरीही चितळ्यांच्या बाकरवडीवरच संतुष्ट असतो.



अमेरिकेतही वेगळं नाही. पूर्व किनाऱ्यावरील लोक पश्चिम किनाऱ्यावरील लोकांना जरा जास्तच आगाऊ समजतात. खरं तर ते पटकन सुधारणांना आपलंसं करणारे असतात.



आठराव्या वर्षीच घर सोडलेली आपलीच मुलं मुंबई, अहमदाबाद, हैद्राबाद, दिल्ली, बंगलोर, न्यूयॉर्क सिंगापूर सगळीकडे सारख्याच सहजतेने वावरतात. न्यूयॉर्कमधील ट्यूबमधे जेवढे मित्र भेटतात तेवढे पुण्यातही भेटत नाहीत म्हणत सर्व-शहर-समभाव ठेऊन सर्व शहरांविषयी सारखेच निर्लेप असतात. कर्तृत्त्वाने बहरून आलेली ही मुलं मला ढगातून पडणाऱ्या जलबिंदूंसारखी वाटतात. त्यांच्यात झालेलं आमूलाग्र परिवर्तन सुखद असतं.

 



ढगातुनी जलबिंदु निघाला

होता धास्तावला जरासा

पडेन कोठे मला न ठावे

जळेन का भूवरी तापल्या ।।



स्वर्गामधले घर हे माझे

रथ मेघांचा पवनचि घोडे

जाइल संपुन क्षणात सारे

नभातुनी हे मुक्त विहरणे ।।



मेघ पवन दोघेही हसले

घर हे शैशव जपण्यापुरते

कशास चिंता करतो वेड्या

झोकुन दे तू जीवन सारे ।।



दे रेटा तू निर्धाराने

पडशिल तेथे करशिल सोने

डोलु लागतिल पहा त्रिभुवने

प्रिय होशिल तू तुझ्या गुणांने ।।



सरसर आले उतरुन खाली

थेंब जलाचे घर सोडोनी

तृषार्त भूची तृषा पुरविण्या

जीवन दिधले उधळुन त्यांनी ।।



कुणी हासले प्राजक्तातुनि

कुणी डवरले शेतामधुनी

कणसांमधुनी मोति टपोरे

होऊन हसले थेंब खळाळुनि ।।



जलमय काया झाल्या पावन

झोकुन देता नदीत जीवन

जलबिंदू हे झाले सिंधू

मीपण त्यांचे देता सोडुन ।।



थेंब बरसले जलधीवरती

झाले त्यांचे सुंदर मोती

पडता पडता सूर्यालाही

सप्तरंग ते देऊन जाती ।।



घर हा थांबा एक क्षणाचा

उडण्यापूर्वी टेकु जरासा

सोडून देता योग्य क्षणी तो

जीवनमोती ये आकारा ।।

------------------------------

लेखणी अरुंधतीची

 

No comments:

Post a Comment