Monday 26 December 2022

अमलतास

 अमलतास  फुलले -

ग्रीष्म ऋतुत सूर्य आगीचा वर्षाव करायला लागतो, प्राणी पक्षी दे माय धरणी ठाय म्हणत पाण्यासाठी, छायेसाठी वण वण करत असतात. जराशी सावली वा जल दिसताच अत्यंत  अधीर होऊन तिकडे धाव घेऊ लागतात; नेमका त्याचवेळी अनेक तरुवर पुष्पोत्सव साजरा करत असतात. प्राण्यांना, पक्षांना दिलासा देत असतात. पानांच्या छत्र्या मिटवून फुलांच्या रंगिबेरंगी छत्र्या उघडून उभे असतात. फुलाफुलांच्या पेल्यांमधे मधु भरून भुंगे, मधमाशा व पक्षांना देत रानावनात, रस्तोरस्ती उभे असतात. त्यांना पाहूनच डोळे निवतात.

एप्रिल मे महिना म्हणजे माणिकमोहोर (गुलमोहोर) आणि पुष्कराजमोहोर (अमलतास/बहावा) ह्यांचच साम्राज्य असतं. अमलतासची डोळ्याला सुखावणारी, मोहक,  लिंबकाती पिवळी झुंबरं हवेवर हेलकावे घेऊ लागली की मनही त्यांच्यासवे झोके घेऊ लागतं.

अमलतास खुलले फुलले

पुष्कराज झुंबर झेले

 झुळुक तया देता झोके

डुलती उमा-कर्णफूले ।। 1

 

रंग मोहक लिंबकांती

अधोमुखे डुलती फुलती

लावण्यचि लावण्याचे

लाडिक कुसुमगुच्छ डोले ।। 2

 

ग्रीष्म जरी माथ्यावरती

जरि जळते सारी धरती

आतपीच्या झळयांवरति

नर्तन नयनरम्य चाले ।। 3

 

पाहे तो हसुनीच नभी

नतमस्तक हो सूर्यपदी

भूमातेसी नमन करी

मोहक अमलतास बोले ।। 4

 

``हे भास्कर तू तप्त गोल

मम हृदयी ठसलास खोल

तेजोनिधि तव तेज पिउन

अंकुर एक एक फुटले ।। 5

 

भूमाता मम क्षमाशील

दोघांचे अनमोल मोल

साधुन दोन्हीच समतोल

शांती तेज एकवटले'' ।। 6

 

अमलतास फुलले फुलले

वसुंधरा डोले डोले

सूर्य हासुनी हा पाहे

ग्रीष्मऋतु मोहे मोहे ।। 7

अमलतास फुलले -- -- -

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -


No comments:

Post a Comment