Sunday 4 December 2022

एकानंशा

 

एकानंशा

कंसाच्या हातून निसटून गेलेली नंद-यशोदापुत्री एकानंशा योगमाया कंसाला त्याचा वध नक्की होणारच, त्याला मारणारा जन्माला आला आहे; सुरक्षित आहे; दिवसानुदिवस वाढत आहे, बलवान होत आहे, ह्याची ग्वाही देऊन गेली.

 

गेली जी निसटून हातुन नभी विद्युत्शलाका दुजी

हाहाहासत ती भविष्य वदली,  “मी मृत्युघंटा तुझी!

कंसासांगुन जातसेचि  तुजला रे काळ आला तुझा

आहे तो सुखरूप गोकुळघरी सोडील ना तो तुला॥१

 

तो देईल कठोर मृत्यु तुजला दावा नसे फोल हा ’’

सत्याची पुतळी वदे तळपती ना काळ स्पर्शे जिला

जाई लावुन आग कंस हृदयी; ज्वाला मिळे ती नभा

होवोनी भयभीत कंस बघतो विस्फारूनी नेत्र का ॥२

 

सत्याचा नच सामना करु शके शस्त्रे असूनी करी

सत्याच्या पुढती असत्य न टिके; ही गोष्ट आहे खरी

कैसा कंस धरू शके तिज करी? ती योगमाया महा

जाई कंस-करातुनी निसटुनी पोळून त्याच्या करा ।।

 

दुष्टांचे मन सैरभैर करुनी मोहात त्या गुंतवी

लावे काळ-वनात त्यांस चकवा ने मृत्यपंथीच ती

आपत्तीत विवेकरूप धरुनी जी सज्जना जागवी

सत्याची पुतळीच ती नित वसो माझ्याच हृन्मंदिरी॥

-------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

No comments:

Post a Comment