Thursday 8 December 2022

वठलेलं झाड


वठलेलं झाड

                   पावसाने हिरवागार हात सार्‍या निसर्गावर फिरवलेला दिसत असतांना सगळ्या आनंदित निसर्गाच्या पार्श्वभूमीवर एखाद काळ ठिक्कर पडलेलं पर्णरहित झाड मनाचा वेध घेतं. नजरही नेमकी त्याच्यावरच वारंवार जाते. नजरेला शांतविणार्‍या हिरव्यागार पार्श्वभूमीवर त्याचा पर्णहीन फांद्यांचा  काळसर सांगाडा जास्तच उठावानी मनात भरतो. `कधी काळी सुंदर असेल झाड!' असं म्हणत असतांनाच एखादी घार त्याच्या उंच शेंड्यावर येऊन स्थिरावते. चिर्रर्रऽऽ चि ऽऽचि आवाज करत कोळपलेल्या फांद्यांना मागे रेटत परत एकदा आकाशात झेपावते. त्या वाळक्या फांद्याही तिला वर झेपावण्यास मदत करून हवेवर झुलत राहतात. एखाद्या कावळ्याने फांद्यांच्या आधाराने बनविलेल्या काटक्याकुटक्यांच्या  घराकडे लक्ष जाते आणि मग प्रश्न पडतो, ` खरच मेलं आहे का हे झाड?'

 

पाऊस आला पाऊस गेला

तरारले कोंब बहरली झाडे

खळाळतं पाणी तुडुंब ओढे

धावत सुटले पाण्याचे लोंढे

 

वार्‍याचं गाणं पानांच्या टाळ्या

लाजत उमलत हसल्या कळया

फुलांचा आनंद सांगतो सुगंध

रान सारं आनंदानं झालं धुंद फुंद

 

वारा अन् सुगंधानी हातात हात गुंफले

वाट फुटेल तसे रानभर धावत सुटले

 

तोच ---

 

दचकला वारा थबकला सुगंध

जणु पुढे उभे भूत की समंध

नाही सळसळ नाही खळखळ

हिरव्या कंच हिरवाईत

एकच वृक्ष हा बेढब! अजागळ!!

 

कोळपले कोंब झडली पाने

सरले जीवन संपले गाणे

शुष्क काष्ठ केविलवाणे

पोखरले अंतर्बाह्य वाळवीने!

 

तरी उभारून बाहू आकाशी

बोले तो उडत्या पाखराशी,

``नाही फळे ना फुले मजपाशी

क्षण विश्रांतीला ही आहे कुशी

 

पोखरली वाळवीने ढोली

होईल बाळांसाठी खोली

काटक्या ओल्या सुकल्या

घरट्या देतील उभारी ''

 

-        - जाहला वारा तो निशब्द

-        झाला मुकाही सुगंध

त्यांची गति जाहली बंद

अन् मति जाहली मंद

 

तोडिले जीवनाने तुझे रे बंध

मग हा कसला ऋणानुबंध?

धन्य तू धन्य तू !! दोघेही गहिवरले

आसू आणिक हासू नकळत खाली ओघळले

 

त्या दवबिंदुंनी रानातील

पान अन् पान ते सजले

मरणानंतरही जीवन

आज कसे ते कळले

-----------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 


No comments:

Post a Comment