Thursday, 24 November 2022

पारिजात

 

पारिजात

                     पारिजाताचं फूल ते बीज तयार होण्याचा प्रवास मोठा बघण्यासारखा असतो. फूल गळून पडतांना सहजपणे त्याचा एक तंतु झाडावरच्या कोंदणात तसाच राहून जातो. पाऊस संपतो. फुलांचा बहर सरतो. येणार्‍या हिवाळ्यासोबत पानं झडून झाडाचाही खराटा तयार होतो. पण  त्यावर हिरवे हिरवे हिरवे बदाम लगडलेले असतात. हे बीजही गमतीशीर. एक नाही तर दोन बदाम एकमेकांची गळाभेट केल्याप्रमाणे एकमेकांना चिकटलेले. जणु उराउरी भेटल्यासारखे. गळून गेलेल्या फुलची आणि झाडाची ही मिठी  कवितेत बद्ध झाली आपोआप ---- 

( वृत्त – मालिनी; अक्षरे-15; गण- न न म य य; यति- 8,7 )

 

बहरुन तरु आला अंगणी पारिजात

धवल सुमनराशी केशरी त्यांस देठ।

परिमल मन मोही लाघवी मंदमंद

सुरवरनगरीचे रुक्मिणी-कृष्ण-प्रेम ।। 1

 

तरुवर सजला तो मौक्तिका-पोवळ्यांनी

गगन उतरले का चांदण्याचेच खाली।

धवल तुरग येती घेऊनी का रवीसी

उजळति जणु ज्योती अमृताते भिजोनी ।। 2

 

गदगद तरुबुंधा शेलटा हालवीता

भिरभिर गिरक्यांसी घेत या पुष्पमाला।

झरझर झरती का केशरी शुभ्र धारा

अलगद उतरोनी भेटती या धरेला ।। 3

 

कुसुम विलग होता पारिजातावरोनी

तरुवर मज आला एक तंतू दिसोनी।

जणु अडकुन त्यांचा कोंदणी जीव राही

तरु जपुन तयासी ठेवितो चित्तकोषी ।। 4

 

विसरुन झबले वा खेळणी राहताती

गडबडित मुलांच्या जैसी आजीकडेची।

निघुन सकल जाता ठेविते ती जपोनी

सुखद सय मुलांची आपुल्या त्या कपाटी ।। 5

 

सकल गणित तैसे भावनांचेच वाटे

तरु अन सुमनाचा भाव तैसाच दाटे।

फरक नच दिसे तो वृक्ष वा माणसाते

सकल जगति राहे एक चैतन्य तो ते ।। 6

 

कितिक दिवस गेले मौन झालाचि वृक्ष

 सहज रमुन गेला गंधवाही स्मृतीत ।

जपुनिच शिशुचे ते ठेऊनी बाललेणे

स्मृति सुखद जपे ती माय वात्सल्यभावे ।। 7

 

उघडुनी बसला तो बाललेणी सुरेख

सुहरित हृदयांचा मांडला चित्रलेख

सुहरित हृदयांनी वृक्ष गेला भरून

जणु हृदय फुलाचे भेटले का तरूस

 

हृदय मिलन दावी बीज ते प्रेमभावे

सुख अनुपम दाटे त्याचि आलिंगनाने

मिलन हृदयद्वयांचे पाहता हर्षले मी

कुसुमतरुवराच्या भावबंधा बघोनी

-------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment