कवठ -
थंडीची सुरवात झाली की बाजारात कवठं यायला लागतात. होळीला पळस आणि महाशिवरात्रीला कवठ हे निसर्गानी मांडलेलं समीकरण सर्वांना परिचयाचं झालय. आपल्याकडे संस्कृत भाषेनी जवळ जवळ सार्याच भारतीय झाडांची वैशिष्ठ्य टिपली आहेत. त्यांना मानवी स्वभावाशी जोडून अत्यंत परखडपणे त्यांचे गुणदोष श्लोकबद्ध करून अलगद आपल्या ओंजळीत घातली आहेत.
कवठाचं झाड
उंचपुरं असून त्याच्या वाट्याला कधी फार कौतुक आल्याचं पाहिलं नाही. एवढं मोठं झाड
कोणाच्या नजरेत का बरं भरु नये? फार सावली न देणार्या आवळ्यालाही त्याच्या सावलीत
बसून आवळीभोजनाचा मान मिळाला. पण कवठाला काही असा मान मिळाला नाही; उलट त्याचं कडक
कवचाचं फळ त्याच्या सावलीतून जाणार्या एखाद्या टकलुच्या डोक्यावर पडलच तर काय
होईल ह्या विचारांनी सर्वांनाच कायम सावध केलं.
एखाद्या आजारी
मुलानी आईला सोडू नये किंवा घोरपडीने दगडाच्या खोबणीत नख्या रुतवाव्यात तसा
चिंचेचा चंद्रकोरी वाकडा आकडा झाडाला असं काही पक्कं धरून ठेवतो की वाळून काळा
पडेल पण खाली पडणार नाही. आंब्याची लांब दांडी झाडाविषयी असलेली माया सोडू शकत
नाही आणि फळापासून वा झाडापासून दूर करताच चिक गाळत (चिक उतल्याने) तुम्हालाही हाय
हाय करायला लावते. पेरु, सिताफळ, संत्र तर तोडल्यावरही माहेरच्या खजिन्यासारखं
आठवणींचं एखाद ताजं हिरवं पान स्वतःसोबत घेऊन जातात. फळ तोडायच्या आधीच केळ खाली
कोसळते. दहाबारा रायआवळे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून खाली येतात.
बेलफळ आणि कवठ
मात्र एखाद्या जीवनमुक्त झालेल्या निःसंग, निर्मम साधुच्या वृत्तीने आपल्या देठात
सुद्धा मोह न ठेवता अलगद झाडापासून सुटून येतात. माणसानी संसारातून कसं सहज सुटून
जावं, कुळाच्या नाळेचंही प्रेम धरू नये हे शिकवून जातात. कवठ अंगाला राख फासलेल्या
बैराग्यासारखं किंवा धवलवस्त्रधारी श्रमणासारखे!(बुद्ध भिक्षु) तर बेलफळ काषाय वस्त्र परिधान
केलेल्या परिव्राजकासारखे!
दोन्ही फळं
चित्ताकर्षक नाहीत. लोकरुचीच्या फळांमधे त्यांचा सामावेश केला जाणार नाही पण
दोघेही ``उरलो उपकारापुरता’’ म्हणत लोकांच्या खरोखरच्या सेवेला हजर असतात. कवठ
खोकला होऊ देत नाही तर बेलफळ उन्हाळ्याच्या सर्व त्रासांचा कवचाप्रमाणे वा ढालीप्रमाणे
बचाव करते. नारळाएवढं बेलफळ आपल्याकडे इतकं प्रिय नसलं तरी उत्तर भारताच्या
रणरणत्या उन्हाळ्यात बेलफळ फोडून त्यातील केशरी गराचं सरबत पिण्याने उन्हाळा
कितीही कडक असला तरी बाधत नाही. पिकलेल्या बेलफळाचा बेलाच्या वासाचा केशरी गर ही
गोड आणि छान लागतो. आपल्याकडे डबाबंद बेळफळपाक फक्त माहित आहे.
काहीही असो पण
परिवाराला जोडणार्या लहानशा देठाचाही मोह न ठेवता सुटणं आपल्यालाही जमायला पाहिजे
असं फार फार वाटतं आणि म्हणूनच ही तीन कडवी कवठासाठी---
मज वस्त्र
भूषणांचा । उरला न मोह चित्ती
केलेच
मुंडणासी । सन्यस्त वृत्तिने मी
हे श्वेत
वस्त्र माझे । पोतास जाडभरडे
वैराग्य
चित्ति येता । श्रमणासही रुचे ते ।। 1
आवेग भावनांचा
। साहेच घट्ट मन हे
सुखदुःख
सारखेचि । कवचासमान मन हे
भुलवे न माय
माया । परिवार ओढ वाया
मज नाळ ही न
चिकटे । हो विनापाश सुटका ।। 2
परि अंतरीच
माझ्या । हे बीज अमृताचे
करण्या
परोपकारा । मी जन्म घेतलासे
रुग्णांस मी
दिलासा । राखे निकोप इतरा
जातो घरोघरी
मी । महाशिवरात्र येता ।। 3
----------------------------------------
No comments:
Post a Comment