Friday 23 December 2022

अभिमन्यू

 

अभिमन्यू


जातांना रोजचि दिसतो  तरु उमदा एक उभा तो

सळसळती पाने त्याची तो स्वप्न उद्याचे बघतो  --- 1

 

लखलखती तांबुस वर्णे नाचती प्रकाशित पाने

जणु लाल कोवळे तळवे हलवून गुणगुणे गाणे --- 2

 

``ये  खेळाया ये बाले हलवून हात तो बोले''

कारंजे आनंदाचे तो, वृक्ष हवेवर डोले --- 3

 

किति वादळवारे येती नच माहित याला भीती

घुसळून अंग हा घुमतो कोसळतो धो धो हस्ती --- 4

 

कडकडा कडाडे बिजली मुख प्रसन्न ह्याचे उजळी

जणु चक्रव्यूह भेदाया अभिमन्यू सज्ज सकाळी --- 5

 

रोजचा मार्ग तो माझा मी रोज तया न्याहाळी

परि आज घडी ही नव्हती असतेच जशी दरवेळी --- 6

 

का भवती त्याच्या झाली गर्दी ही गोल बघ्यांची

फुकटात तमाशा बघण्या वाटे मरण मेजवानी --- 7

 

कुणि कभिन्न काळे प्राणी निरखिती तया जवळूनी

दोरांची घेउन जाळी करित चक्रव्यूह मांडणी --- 8

 

फांदीवर फेकुन फासे   जखडती चहूबाजूंनी

कुणि अंगावरती त्याच्या उन्मादे जाय चढोनी --- 9

 

घालति सपासप ते घाव तरु घायाळ उभाचि वीर

`डगमगलो नाही चित्ती' धरणीला म्हणतसे  धीर --- 10

 

ते रूप तयाचे पाही विचलीत मने मी जाई

कामाची घाई मजला   भेटीन तुला सांजेसी --- 11

 

होताच सांज मी धावे बघण्यासी तरूवर तेथे

हे काय काय मी बघते नयनी नीर पूर वाहे --- 12

 

मज उजाड दिसली धरती भगभगीत नभ ते वरती

बोडक्याच आकाशाचे केश रेशमी का सरती  --- 13

 

धरणीवर तुडवित त्याचे  ते लाल कोवळे तळवे

किती जयद्रथ ते जाती अपमान त्याचा बघवे --- 14

 

 

लादुन त्या गाडीवरती घेऊन तयाला जाती

प्रतिज्ञेविना पार्थाच्या  तो वीर चालला अंती --- 15

 

 

रुतलेले माती मध्ये रथचक्रचि अभिमन्यूचे

मज दिसले त्यावर माझे मी हात ठेऊनी वदले --- 16

 

केलीस शर्थ तू बाळा निधड्या छातीने लढला --- 17

परि माणुस कपटी मोठा अभिमन्य़ू कळे त्याला

 

श्रीहरिचा तू जरी प्राण जरी पार्थाचा तू त्राण

   येताचि काळ चकवूनी  गळे नात्यांचे अवसान --- 18 

 

----------------------------------------------------------------

 

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment