Sunday 4 December 2022

एकरस

 

🍃🍂एकरस🍂🍃

तो मला कधी देवळात भेटतच नाही
वाट बघत उभा असतो केव्हाही कुठेही
कधी तरुतळी कधी फुलात कधी एखाद्या चेहऱ्यात

 कधी नभात कधी जळात….
विरघळवत मला त्याच्या मंद स्मितात!

कधी नेतो ओढून अचानक , धरून हात
ये भेट मला प्राजक्ताच्या रिमझिमणाऱ्या सड्यात!
झेलत धवल केशरी बरसात त्याच्या गाढ सहवासात…..
त्या असीम आनंदात विरता विरता
कळत नकळत
एक अनुपम आनंदाची लाट
जाते शिरशिरी उमटवत तनात मनात

रंगतो तेथेच आमचा रास
एक होतात अधीर श्वास
संपून जातात मिथ्या भास
वादळही पुरं शमलेलं …..
मी नसतेच माझ्यात!

फुटतो अचानक माथ्यावरचा घट
त्याच्या नजरेचा अचूक खडा लागून…..
उरत नाही काहीच ….
घट मातीत! पाणी पाण्यात !आकाश आकाशात!
मी मात्र चिंब भिजलेली!
त्या एकरसात!


🍃🍂🍃🍂🍃🍂
लेखणी अरुंधतीची-

No comments:

Post a Comment