Friday, 9 December 2022

अभिमन्यू

 

अभिमन्यू


जातांना रोजचि दिसतो  । तरु उमदा एक उभा तो

सळसळती पाने त्याची । तो स्वप्न उद्याचे बघतो  --- 1

 

लखलखती तांबुस वर्णे । नाचती प्रकाशित पाने

जणु लाल कोवळे तळवे । हलवून गुणगुणे गाणे --- 2

 

``ये  खेळाया ये बाले । हलवून हात तो बोले''

कारंजे आनंदाचे । तो, वृक्ष हवेवर डोले --- 3

 

किति वादळवारे येती । नच माहित याला भीती

घुसळून अंग हा घुमतो । कोसळतो धो धो हस्ती --- 4

 

कडकडा कडाडे बिजली । मुख प्रसन्न ह्याचे उजळी

जणु चक्रव्यूह भेदाया । अभिमन्यू सज्ज सकाळी --- 5

 

रोजचा मार्ग तो माझा । मी रोज तया न्याहाळी

परि आज घडी ही नव्हती । असतेच जशी दरवेळी --- 6

 

का भवती त्याच्या झाली । गर्दी ही गोल बघ्यांची

फुकटात तमाशा बघण्या । वाटे मरण मेजवानी --- 7

 

कुणि कभिन्न काळे प्राणी । निरखिती तया जवळूनी

दोरांची घेउन जाळी । करित चक्रव्यूह मांडणी --- 8

 

फांदीवर फेकुन फासे  । जखडती चहूबाजूंनी

कुणि अंगावरती त्याच्या । उन्मादे जाय चढोनी --- 9

 

घालति सपासप ते घाव । तरु घायाळ उभाचि वीर

`डगमगलो नाही चित्ती' । धरणीला म्हणतसे  धीर --- 10

 

ते रूप तयाचे पाही । विचलीत मने मी जाई

कामाची घाई मजला ।  भेटीन तुला सांजेसी --- 11

 

होताच सांज मी धावे । बघण्यासी तरूवर तेथे

हे काय काय मी बघते । नयनी नीर पूर वाहे --- 12

 

मज उजाड दिसली धरती । भगभगीत नभ ते वरती

बोडक्याच आकाशाचे । केश रेशमी का सरती  --- 13

 

धरणीवर तुडवित त्याचे  । ते लाल कोवळे तळवे

किती जयद्रथ ते जाती । अपमान न त्याचा बघवे --- 14

 

 

लादुन त्या गाडीवरती । घेऊन तयाला जाती

प्रतिज्ञेविना पार्थाच्या ।  तो वीर चालला अंती --- 15

 

 

रुतलेले माती मध्ये । रथचक्रचि अभिमन्यूचे

मज दिसले त्यावर माझे । मी हात ठेऊनी वदले --- 16

 

केलीस शर्थ तू बाळा । निधड्या छातीने लढला --- 17

परि माणुस कपटी मोठा । अभिमन्य़ू न कळे त्याला

 

श्रीहरिचा तू जरी प्राण । जरी पार्थाचा तू त्राण

  येताचि काळ चकवूनी  । गळे नात्यांचे अवसान --- 18 

------------------------------------------------ 

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment