Monday 26 December 2022

उनाड बोर

 

मित्र, मैत्रिणिंनो!

 बाजारात बोरं आलेली पाहून कुठच्या कुठच्या बोराच्या झाडांच्या आठवणी ताज्या झाल्या. फांद्यांचा पसारा पसरून बसलेली ना उंच ना बुटकी अशी मध्यम बांध्याची बोर डोळ्यासमोर साकार झाली. प्रत्येक झाडाला काही व्यक्तिमत्त्व असतं. बोरीचं जरा उनाडपणाकडेच झुकणारं! टॉम सॉयरसारखं!

 

चिंचा, बोरं आवळे, ह्यांची आहे दोस्ती

मुलं झाली सामिल त्यात, करायला खूप मस्ती

 

आई-बाबांना वाटत रहाते मात्र फार धास्ती

उनाड चिंचा बोरं आवळे मुलांची करतील फजिती

 

येईल खोकला, बसेल आवाज, फटाफट येतील शिंका

कडू औषध, वर इंजेक्शन देतील डॉक्टर काका

 

असं असूनही उनाड पोरं आणि बोरं जरा जास्तच लक्षवेधी असतात हेही खरच!

 

उनाड बोर -

 

फांद्या अस्ताव्यस्त पसरुनी

उनाड लोळे बोर आळशी

तेल न पाणी केसा कधिही

तसेच काटे सर्वा अंगी

 

पोर लोळता मातीमध्ये

उचलुन त्यासी घ्याया जावे

परी सोडुनी अंग सैल ते

आईलाही उचलू ना दे

 

तशाच फांद्या बहु सैलावुन

कुणास ना दे चढु अंगावर

उचलू जाता पोर चावते

तसेच काटे महा भयंकर

 

पोर असो ते किती शेंबडे

वात्रट अवखळ बहु लाडाचे

मातित लोळुन झाले काळे

तरी माय त्या कडे घेतसे

 

तसेच उचलुन धरणी धरते

परि शिस्तीच्या कडक पित्याने

चोप देऊनी सरळ करावे

जणु वेताच्या फोकाने ते

 

 

तसे झोडितो वारा त्यासी

हँ हँ हूँ हूँ  रडे पोरही

गाळे डोळ्यातुनी आसवे

तशीच टपटप पडती बोरे

 

उडेच झुंबड पोरांची ती

आंबट चिंबट बोरांसाठी

चण्यामण्या बोरेच शेंबडी

उष्टावीती बालसौंगडी

 

आसवातुनी बोरही हासे

फाद्या हलवुन पुन्हाचि नाचे

बोरांची पोरांच्या संगे

घनिष्ठ दोस्ती कायम रंगे

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment