Sunday 4 December 2022

मूर्ति

 

मूर्ति

 

 माझ्यामधुनी घडवत आहे ।  मूर्ति एक अज्ञात

कोणाची ना ठावे मजला । परि जाणी भगवंत

 

सतत घेतसे कष्ट केवढे  । मला घडविण्या तोच

हया दगडातुन काढुन टाकी ।  जे भाग नको तेच

 

तुला वाटते तुला दुखविती । क्षणोक्षणी कुणि आप्त

ते तर माझे छिन्नि हतोडे । तुला घडविण्या रास्त

 

निखळुन पडले एक एक ते । सकल आप्त संबंध

ईश्वर बोले घडण्या मूर्ती । आणित होते बाध

 

माय-बाप हे तुकडे दोन्ही । झाले अनावश्यक

छिन्नीने हरि छिनून काढी । अंशचि अनावश्यक

 

छिनला बंधू होते ज्यावर । मी सदा विसंबून

अलगद नेला काढुन हरिने । न राही अवलंबुन

 

चिरा भगिनिचा वाटे कणखर । सहज भंगला जाय

   उडून गेल्या काही ठिकर्‍या । मज वदे देवराय

 

देवा ही आकृती घडविणे । दुःखद तव हे कृत्य

सोसायाचे किती नच कळे । किती काळ पर्यंत

 

देव बोलला ठेव भरवसा । तव जीवन मम ठेव

कठिण वाटते दुःखदायि जे । ते अंति सुखकारक

 

कोरुन काढी एक एक ते । मित्र, मैत्रिणी सर्व

 नकोच सारे तुझ्यासवे हे । मज हवी मूर्ति एक

 

कुणी दुखविले, कुणी तोडिले । कुणा सोडिले मीच

काळासंगे कुणी हरवले । कुणी बदलले मार्ग

 

वादळ शमले सुखदुःखाचे । शांती एक अपार

तरंग जलिचे जली निमाले । जल नितळ आरपार

 

अनन्य झाले एकचित्त ते । मम नितांत मन शांत

घडणे मम जंव पूर्ण जाहले ।  मी झाले निःसंग

 

भगवंत आणि भक्त यातला । भेद पावला लोप

देहचि झाला एकतारी अन् । घुमू लागले बोल

 

मुक्कामाचे हरिपुर आले । मी आले गोपाल

मी तूपण हे सरले सारे । मी झाले गोपाल

-----------------------------

लेखणी अरुंधतीची - 


No comments:

Post a Comment