Monday, 5 December 2022

पैंजण -

 

पैंजण -

हे रुणझुण रुणझुणपैंजण कोठे वाजे

काहूरचि  कसले , माझ्या मनि हे माजे

ना थाऱ्यावरती, चित्त राही माझे

त्या नादाचा का  , नाद नाला लागे

 

ही वाट धुक्यातुन, न कळे कोठे वळली

परि ओढुन नेई, आस मला ही  कुठली

ती बुडली मागे, धुक्यात घर अन् नाती

ही रुणझुण मजला, नेते पुढती पुढती

 

 

हळु मागोवा मी, घेत तयाचा जाता

ही रुणझुण राहे, देह व्यापुनी माझा

तो------ दिसला मोहन, कदंबवृक्षाखाली

बैसला ठेउनी पाऊल थोडे वरती

 

ती वनमाला आपाद स्पर्शली पाया

अन् वीज चमकली, देहातुन की माझ्या

मधु किणकिणले ते, नूपुर त्याच्या पायी

अन् कोण असे मी, सांगे माझ्या कानी

 

हा नादचि नव्हता, नादवेध घेण्याचा

हा शोध दुजाचा, नसे शोध हा “मी” चा

जे हरिचरणांच्या, स्पर्शे पावन झाले

ते तीर्थ असे मी, पावन मजला कळले

———————

 

लेखणी अरुंधतीची -

 

 

No comments:

Post a Comment