Tuesday 13 December 2022

वादळ

 


वादळ 

नसतेच वादळाला संस्कृती, परंपरा किंवा नातं ---!

असतं ते चार असामाजिक तत्त्वांनी

संधीचा लाभ घेत एकत्र येणं !

आणि----

जे मिळत नाही, --- जे तयार करता येत नाही, ---

ते सगळ्यांनी मिळून ओरबाडणं!

 

मला नाही तर -- तुलाही नाहीचं एक भणाण थैमान नुसतं,

ओरबाडलेल्याचाही उपयोग करण्याची क्षमता नसणं !

आक्रमण, हिरावून घेणं, हीच धारणा --- हीच शिकवण ----!

नसतच कुठलं सुजाणपण!

 

असतो त्याला फक्त एकच डोळा सर्वांवर रोखलेला,

 हृदयात हलाहल आणि वरवर शांतीचा पुरस्कार करीत

 किनारे शोधणारा!

थैमान घालण्यासाठी मनातून आसुसलेला !

 

नसतात वादळाला मुळं, पानं, फुलं, फळं ---,

नसतच माहीत त्याला एकमेकांना अन्न-आधार देतं –

गगनावरी वेलु चढवणं !

मूळांनी खोडाला, खोडानी फांद्यांना ----

फांद्यांनी पानाफुलांना सुखावणं ----सजवणं!

परत पानांनी सगळ्यांना अन्न देत जगवणं

 

नाहीच पटत वादळाला एकमेकांच्या --

खांद्यावर मान टाकून विसावणं !

नाहीच भावत त्याला शांतीप्रस्तावाचं बोलणं

 माहीत असतं त्याला फक्त मुंड्या मुरगाळणं!

 

म्हणूनच-------!

अटळ असतं वादळाचं क्षीण होत संपणं

अटळ असतं वादळाचं असं अल्पजीवी मरणं !

तर------!

अमर असतं निसर्गाचं मातीत पाय रोवून

 

‘‘ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् ।।’’

 

असं भारतीय संस्कृतींचं सूक्त म्हणत,

एक दुसर्‍याला आधार देत खंबीर उभं राहणं!

स्वतःही फुलणं, फळणं, स्वतःही उंच चढणं!

अमर असतं चैतन्याचं चिरायु राहणं!

---------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment