Monday, 5 December 2022

चला करूया आनंदाने । परम-भयावर मात

 

चला करूया आनंदाने । परम-भयावर मात

 

मनातले जे मणामणाचे । ओझे करते घात

संशय मत्सर द्वेश निरंतर । त्यावर करु आघात

चला करूया आनंदाने । परम-भयावर मात

 

नवतारुण्ये जसा सळसळे । सर्प टाकुनी कात

तसे त्यजूया विचार अवघे । क्षुद्र दरिद्र जुनाट

चला करूया उत्साहाने । परम-भयावर मात

 

वृध्दत्वाचा शाप शरीरा । मन चैतन्य निधान

चंद्र उणावे कलाकलांनी । तेज न होत लहान

चला करू नवचैतन्याने । परम-भयावर मात

 

गळुनी पिचुनी मना माझिया । नको टाकु निःश्वास

धर्म सनातन पुन्हा जागवी । ठेव तयी विश्वास

चला करूया विश्वासाने । परम-भयावर मात

 

 

चैतन्याची असेच तू रे । ठिणगी एक लहान

तेजोमय त्या चैतन्याचे । तेज तुझ्यात महान

चला करूया धैर्याने हो । परम-भयावर मात

--------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment