माणिक मोहर
``प्रथम तुज पाहता जीव
वेडावला ----’’ असं काहीसं त्याला पाहून माझं झालं होतं. मी पाहिलं त्या तरुवराला. सागरतीरी
उभं असलेलं---
फुललेलं
- - - - डाळींबी लाल पाकळ्या हिरव्या मखमलीवर अशा सुसंगतीने रचल्या होत्या की पुरता वृक्षच जपानी इकेबाना वाटावा. वरपासून खालपर्यंत लोंबणार्या डहाळ्या म्हणाव्या का पाचू माणकाचे गजरे! हा तर माणिक मोहोर! एखाद्या नववधूने त्याच्याकडे पाहून शृंगार कसा करावा ते शिकावं. तो एक देखणा गुलमोहर होता.
कधीतरी परत तो दिसला;
जेंव्हा
सारे गुलमोहर
फुलले होते.
तो पार खचून गेलेला.
फुलं तर सोडाच.
एक पानही शिल्लक
नव्हतं
त्याच्यावर.
लहानपणी
ऐकलेले
बेरीबेरी,
मुडदुस
सगळेच रोग लागल्यासारखा!
हातपाय
काड्या---
बघवत नव्हता.
कोणी विष तर नाही कालवलं
त्याच्या
आयुष्यात
जरा धसकले मी मनात.
डिसेंबर मधे भर थंडीत नुकतं नुकतं
परत एकदा तिथून जातांना
पाचूच्या
कोंदणांमधे
माणिक फुललेले
दिसले.
फार फार आनंद वाटला.
आणि लक्षात
आलं,
ग्रीष्मातल्या
खार्या
आणि प्रचंड
बाष्पयुक्त
हवेवर त्याने
आपला पर्याय
शोधून काढला आहे.
ऋतुचक्रावर
मात करणारा
हा तरुवर नेहरू तारंगणाशेजारी
बापनु घर आणि कॉपर चिमणी हॉटेलच्या
मधे असलेल्या
पेट्रोलपंपावर
कोपर्यात
उभा आहे.
आता त्याच्या नजाकतीने खालपर्यंत उतरणार्या लवचिक डहाळ्या कापून त्याला आखुड जरी केलं असलं तरी डिसेंबरमधे त्याचं फुलणं पाहून ह्या कालजयी तरुवराला मी कायम मनोमन नमन करत असते.
माणिक मोहर
( मात्रा - 14 : 14 )
तरु कितीक फुलले बाई । वस्तीत कुठेही
मार्गी
केशरी लाल डाळींबी । मम लक्ष वेधुनी घेती
ते प्रखर सूर्य तेजाचे । आनंदे स्वागत करिती
धगधगीत ज्वाळा पिउनी । आरक्त शांत ते गमती
भीती न तयां ग्रीष्माची । मिरविती सूर्यवंशासी
अग्निगर्भ तापे जितुका । अनुरक्तचि तितुके होती
परि तटी समुद्राच्या मी । पाहिलेच त्या वृक्षासी
तो उभा मौनची राही । जणु मग्न समाधीमाजी
का भग्न वास्तु अपशकुनी । उमटवी प्रश्नचिह्नासी
वा त्यजुनि भूषणे सारी । बैसलीच का कैकेयी
वैराग्य म्हणावे का हे । का मत्सर भरला देहे
का काळ निकट आल्याची । अवकळा पसरली अंगे
पाहिले एकदा त्यासी । वैभवात झुलतांना मी
नखशिखांत माणिक पाचू । जणु रत्नहार ओघळती
तो डौल आब तो तोरा । कमनीय तयाचा बांधा
हा! हाय!! आज ना काही । हा भणंग झाला पुरता
पाहून तयाची दैना । मी वदले तरुवर राणा
गेलाच कुठे तव बाणा । तू सूर्यपुत्र शोभे ना
तुज अग्निपुत्र म्हणवीसी । ग्रीष्माचे भय तू धरसी
पाहीच तुझ्या सुहृदांसी । बहरले अग्निच्या खायी
तो सांगे मजला त्याची । ती क्रूर कहाणी मोठी
"मी सूर्यपुत्र
तेजस्वी
। मरणाचे
भय ना मजसी
वार्याच्या वारूवरुनी । मम वैभव लुटण्या येती
जणु टोळ्या परकीयांच्या । ते क्षार सागरीचे की
बहु खारे वादळवारे । पानांची कत्तल करिती
आरक्त पुष्प संभारा । ते चोळामोळा करिती
तलवारी बरच्या भाले । सुटताच नभातुन वेगे
ते छिन्न भिन्न मज करता । मम टिकाव कैसा लागे?
पाहून शिगेस वैभवा । येतीच वि`खारी' स्वार्या
मी ओळख लपवुन माझी । झेलतो संकटा सार्या
मातीत पाय रोवूनी । मी उभा इथेची राहे
जय मिळण्या मोठा अंती । संकटी घेतसे नमते ।
लाभताच काळ अनुकूल । करुन यत्नांचीच शिकस्त
बहरतोच शिशिरामाजी । ऋतुचक्रा करि मी परास्त"
पाचूंची कोंदण नक्षी । डाळिंबी माणिक रक्षी
नित कालजयी ह्या वृक्षा । मम काव्यांजलि ही साक्षी
-------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -