Thursday 20 October 2022

देवी सप्तशती आणि एका महा दुष्काळाचा सामना

 

            देवी सप्तशती आणि एका महा दुष्काळाचा सामना

 दिल्लीच्या एका तपाच्या वास्तव्यात लोधी गार्डन मधला `जौगिंग ट्रैक' (तेथील लिहिलेल्या पाटीप्रमाणे ) आणि लोधी गार्डनचेच जणु अविभाज्य भाग असलेले India International center ह्या दोन जुळ्या आणि अनमोल रत्नांचा लाभ आम्हाला झाला. जॉगिंग ट्रॅकवर तासभराची दौड झाली की शरीर ताजं तवानं व्हायचं आणि मन ताज करायला आमचे पाय चला आज IIC मधे काय आहे ते पाहून जाऊ म्हणून तिकडे वळत. IIC मधे एकाचवेळी अनेक छोट्या-मोठ्या हॉल्समधे वेगवेगळे कार्यक्रम चालू असत. आपल्याला आवडेल त्या कार्यक्रमाला जाऊन बसण्याची कोणालाही मुभा असे. रोज कुठल्या ना कुठल्या महत्त्वाच्या विषयावर जाणकार माणसाचे भाषण असे. बर्‍याचवेळेला हे भाषण ऐकायला मोठे मोठे मंत्रीवरही आम जनतेबरोबर साधेपणाने मागे येऊन बसत.

 आज नवरात्रीच्या निमित्ताने अशाच एका भाषणाची मला आठवण झाली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे (Archeological Survey of India ) चे मुख्य श्री. देशपांडे यांचे भाषण होते. ते सांगत होते,

``भारतातील पाऊस हा जगातील अनेक घडामोडी, अनेक घटना, अनेक गोष्टींवर, अनेक मुद्द्यांवर अवलंबून आहे. त्यातीलच एक मुख्य म्हणजे नाईल नदीची पातळी. आजसुद्धा भारतात पाऊस किती पडेल याचे भाकीत वर्तवितांना, अंदाज करतांना नाईल नदीची पातळी हा महत्त्वाचा मुद्दा तपासला जातो. नाईल नदीची पातळी वाढलेली असेल तर भारतात चांगला पाऊस होतो आणि नाईल नदीची पातळी खालावली असेल तर भारतात दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते; असा सर्वसाधारण अंदाज आहे. हा अंदाज खरा आहे का नाही हे पूर्वीच्या उपलब्ध नोंदी तपासून आजही बघता येते.

                      सर्वात आश्चर्य वाटावी अशी गोष्ट म्हणजे इसवीसनापूर्वी दोन अडिच हजार वर्षे इतक्या पुरातन काळापासून नाईल नदीच्या पातळीच्या ठेवलेल्या नोंदी आजही उपलब्ध आहे. ह्या नोंदींमधे फार पूर्वी सलग शंभर वर्षे नाईलची पातळी खालावलेली असल्याची नोंद आहे. म्हणजे कधीतरी सलग शंभर वर्षे भारतात दुष्काळ होता की काय? भारतात अशी कुठे माहिती उपलब्ध होते का म्हणून शोध सुरू झाला. भारतावर सतत होणार्‍या परकीयांच्या स्वार्‍यांनी भारतातील तक्षशीला, नालंदा, काशी अशा अनेक ठिकाणची अनेक ग्रंथालये वारंवार जाळल्याने भारताच्या प्रगतकाळाची माहिती जशी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली तशी बाकीही अनेक महत्त्वाची माहिती नष्ट झाली होती. तरीही एक पुरावा सापडला ज्यात भारतातील शंभर वर्षांच्या दुष्काळाची माहिती उपलब्ध आहे.

 

            श्री मार्कंडेय ऋषींनी लिहिलेल्या देवीसप्तशती ह्या स्तोत्रात 11व्या अध्यायात नारायणी स्तुती मधील 46 ते 50 ह्या श्लोकांमधे ह्या भीषण दुष्काळाचे थोडेसे चित्रण सापडते. जेंव्हा देवीसप्तशतीतील ह्या घटनेचा काळ पडताळून पाहिला तेंव्हा तो बरोबर नाईल नदीच्या शंभर वर्षे खालावलेल्या पातळीच्या वर्षांशी जुळत होता.''

                  हे स्तोत्र दर नवरात्रीला आम्ही म्हणत असू पण स्तोत्र ह्या पलिकडे जाऊन मी कधी विचारच केला नव्हता. मधे बराच काळ लोटला. ते स्तोत्र आणि ते भाषण रोजच्या रामरगाड्यात आणि बदल्यांच्या धामधुमीत मेंदूत शांत पडून राहिले. जरा वेळ मिळाल्यावर मात्र सप्तशतीतील सर्व घटनांची आठवण होऊन त्याचे मराठीकरण केले. सध्यातरी नारायणीस्तुतीचे ते पाच श्लोक देत आहे.

भूयश्च शतवार्षिक्यामनावृष्ट्यामनम्भसि।

मुनिभिः संस्मृता भूमौ सम्भविष्यामयोनिजा।।46 

पडेल एकदा ऐसा । महा दुष्काळ भूवरी

पाऊस थेंब ना तेंव्हा। पडेल धरणीवरी ।।46.1 

जलथेंब ही कोणाला । मिळेल नच शोधुनी

चालेल ही अनावृष्टी । शतवर्षे भयंकरी ।। 46.2

व्याकूळ होऊनी तेंव्हा । आठवी मजला मुनी

अयोनिजा स्वरूपी मी । येईन पृथिवीवरी ।। 46.3

ततः शतेन नेत्राणां निरीक्षिष्याम्यहं मुनीन्।

कीर्तयिष्यन्ति मनुजाः शताक्षीमिति मां ततः।।47

माझ्याच शतनेत्रांनी । अवलोकीन मी मुनी

गुण गातील तेंव्हा हे। मुनी माझेच सर्वही

संबोधतील मजला।  ‘शताक्षी’ म्हणुनि मुनी ।।47  

ततोऽहमखिलं लोकमात्मदेहसमुद्भवैः।

भरिष्यामि सुराः शाकैरावृष्टेः प्राणधारकैः।।48

शाकंभरीति विख्यातिं तदा यास्याम्यहं भुवि।।49

त्रैलोक्य जन्मले सारे। माझ्या देहातुनीच जे

भरण पोषणा त्याच्या । उपलब्ध करीन मी

खाद्यपाने कंद आदि । नव जीवनदायिनी

प्रसिद्धीस तदा जाई । ‘शाकंभरी’ म्हणून मी।।48/49

तत्रैवच वधिष्यामि दुर्गमाख्यं महासुरम्

दुर्गादेवीति विख्यातं तन्मे नाम भविष्यति।।50 

तेंव्हा मी दुर्ग दैत्यासी । निर्दाळीन भयंकरी

‘दुर्गादेवी’च नामाने। होईन सुप्रसिद्ध मी।।50

--------------------------------------------------------

वरील स्तोत्रातील इतिहास थोडासा उलगडून पहायचा माझा प्रयत्न -

मार्कंडेय ऋषींनी आपल्या पूर्वजांचा लिहीलेला हा इतिहास फारच रोमहर्षक आहे.

खूप वर्षे दुष्काळ पडला. `दुष्काळाला तोंड द्यावे कसे?' ह्या विचाराने सार्‍या भारतवर्षातील लोक एकत्र आले. काय करावे? कसे करावे? मोठाच खल झाला. `वादे वादे जायते तत्त्वबोधः।' म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यामधूनच अंधारातही प्रकाश किरण दिसावा तसा काहीतरी योग्य मार्ग सापडतो.  सर्वांना तारून नेणारी मार्ग दाखविणारी हीच ती अयोनिजा देवी नारायणी. सर्वांच्या हृदयांचे मंथन करून त्यातून बाहेर पडलेली. योनी मार्गाने नव्हे तर सर्वांच्या एकमताने सर्वमुखाने सर्व हृदयातून बाहेर पडलेले विचार. तीच ही नारायणी देवी. नर म्हणजे माणूस (स्त्री पुरुष सर्व) अयन म्हणजे मार्ग, पथ.(जसे दक्षिणायन उत्तरायण, रामायण इ.) सर्व नरांनी अनुसरलेला पथ किंवा सर्वांच्या सम्मतीने तयार झालेला मार्ग आणि आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनुसरलेल्या पथाचा, यशाचा इतिहासपथ! हीच ती देवी नारायणी.

                तेंव्हा ह्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी सर्वांनी मिळून तेंव्हाच्या हुशार जबाबदार पन्नास अभियंत्यांची शोध समिती नेमली नाव दिले `देवी शताक्षी प्रकल्प.' पन्नास हुशार इंजिनीअर्सचे शंभर डोळे कामाला लागले. पाण्याचे स्त्रोत कुठे आहेत? कुठून नियमीत पाणी मिळू शकेल? आणि सापडला! पाण्याचा स्त्रोत सापडला. पण हिमालयापलिकडे. गंगा वहात होती. तिचा ओघ भारतात वळवून आणायचा आरखडा पक्का केला त्यांनी.

              तोपर्यंत दुसरा प्रकल्प राबविला गेला. `देवी शाकंभरी प्रकल्प!' सारे वनस्पती तज्ज्ञ पुढे सरसावले. कुठली पाने, जमिनीतील कुठले कंद खाऊन तहान भूक भागविता येते ह्याचा शोध सुरू झाला दुष्काळ पडला म्हणून काय झाल? आत्महत्या नाही केल्या कुणी. वनस्पती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जनतेची तहान-भूक भागवली जाऊ लागली.

                      गंगेला वळवून भारतात आणायचा प्रकल्प मोठाच महत्त्वाकांक्षी होता. इतरवेळेला देवतात्मा वाटणारा हिमालय जणु दुर्गदैत्याचं रूप घेऊन मधे उभा होता. मग तिसरा प्रकल्प उभा राहिला. `दुर्गादेवी प्रकल्प' हिमालय फोडून गंगा भारतभूमीवर अवतीर्ण होणं सोपं काम नव्हतं. हिमालय रूपी दुर्ग दैत्याचा पराभव करणं एक अशक्यप्राय काम होतं. खूप पडझड झाली. पण कोणी मागे नाही हटले. `मागे वळून बघू नका. कोण कोण कामी आले ह्याचीच मोजदाद करत राहिलो तर प्रकल्प पूर्ण कसा होणार? काम करत रहा'. एका प्रखर जिद्दीने सारे काम करत राहिले. दुर्गादेवी प्रकल्प पूर्ण झाला. गंगा अवतरली.

                आपल्याकडे प्रकल्प पूर्ण झाला की तो लोकार्पण केला जातो. तेंव्हा प्रकल्प सुरू करतांनाच तो देवार्पण करायची प्रथा असावी. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा! ह्या उक्तीप्रमाणे प्रकल्पाचा भार व्हायला देव समर्थ आहे म्हटलं की सर्वजण ह्या देवकार्यात गोवले जातात. तीच देवपूजा होऊन जाते. 

                       स्वच्छता अभियान लोकार्पण झाले की, `कुठे आहे स्वच्छता?' म्हणत लोक सरकारच्या नावाने बोटं मोडत आणि रोज नवीन घाण करत मोकाट फिरतात. क्षणोक्षणी टाकलेल्या प्लॅस्टिकला सरकार किती उचलणार? लाज सरकारला नाही आपल्याला वाटायला पाहिजे.

                     कुठे गेले अच्छे दिन अशी निर्लज्ज विचारणा होते. भारताला अच्छे दिन पाहिजे असतील तर आपल्या सर्व मौजमजेवर पाणी सोडून आपण  `निर्मलादेवी'च्या पूजेसाठी उभे राहिले पाहिजे. निर्मल अभियान, स्वच्छता अभियान. जोपर्यंत भारत स्वच्छ होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ह्या संकल्पनेने झपाटून गेले पाहिजे. आपण सारे लहान लहान आणि भारत पाहिजे महान हे कसे संभवते? त्यासाठी प्रकल्प सुरू करतांनाच एक देवकार्य म्हणून सुरू झाला पाहिजे. कुठल्या कुठल्या ठिकाणी लागणार्‍या रांगा ह्या देवकार्यासाठी लावल्या पाहिजेत.

                                   असो अनेक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असा वर वर गोष्टीरूपात,स्तोत्ररूपात लिहून आपल्या पूर्वजांचा पराक्रम अजरामर करणार्‍या श्री मार्कंडेय ऋषींनी केवढं मोठं काम केल. त्यांना शतशः नमन! थोडक्यात सांगायचं तर ही स्तोत्र म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे पोवाडे आहेत.

 इतिहास असा सर्वांनी मुखोद्गत करून आगीपासूनही सुरक्षित ठेवता येतो हे पाहून परत एक प्रश्न मनात आला मॉरिशससारख्या अनेक देशांमधे मौखिक इतिहासाला (Oral History) महत्त्वही आहे आणि मान्यताही आहे. भारतातही अशा अनेक गोष्टी पुरातन कालाची साक्ष देत असतात. त्यांना मान्यता का बरे मिळू नये?

------------------------------------


No comments:

Post a Comment