Tuesday 18 October 2022

कविता छत्री

 

कविता छत्री

                       एकदा भारतसरकारचे प्रतिनिधिमंडळ घेऊन  प्रवीण म्यानमारला गेले असतांना तेथील अधिकार्‍यांनी इतर भेटवस्तूंसोबत म्यानमारची आठवण म्हणून एक सुंदरशी छत्री त्यांना भेट दिली. पांढर्‍या शुभ्र छत्रीवर फिक्या गुलाबी रंगाच्या फुलांचे print  मोठे मोहक होते. विविध रंगाच्या चित्तवेधी धाग्यांची सुबक कमळासारखी नक्षी छत्री उघडताच  छत्रीच्या आतल्या बाजूने छत्रीच्या विस्ताराला आधार देई. ही पावसात वापरायची छत्री नसून उन्हाची छत्री होती. जरा उन पडताच मी ही छत्री घेऊन बाजारात जाऊन येई. दिल्लीच्या 45 डिग्रीमधेही ही छत्री डोक्यावर धरली की जणु मला काऽऽही त्रास होत नसे. ही छत्री डोक्यावर धरताच माझी पावलं आपोआप ऐटदार चाल चालत. आजूबाजूचे ``अरे छाता देखो छाता देखो’’ करत भर उन्हात बघत उभे राहिले की मला धन्य वाटे. अलिशान गाड्यांमधून जाणारेही जाता जाता गाडी थांबवून छत्री बघून जात. कधी कधी शोफर ड्रिव्हन गाडीत बसलेल्या ललनाही गाडी थांबवून छत्री एकदा हातात घेऊन बघत. मीही माझ्या मश्रुम कटला हलके हलके झोके देत, रेबनचा गॉगल उगीचच ठीक केल्यासारखे करत कॅटवॉक करत त्यांच्यासमोरून निघून जातांना  ``हाय! ये छाता कहाँ मिलेगा’’ ह्या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना, हे काय -- ह्या पलिकडच्याच दुकानात! असे सांगावे तसे ``हाँजी यही म्याँमा का हैं।‘’ असे झोकात सांगत असे. अलिशान गाडीवाले क्षणभरासाठी आपले काम विसरत असत आणि मीही घरी राहिलेला कामाचा रामरगाडा विसरत असे.

त्या छत्रीपेक्षा अजुन एक सुंदर छत्री एकदा मला मिळाली आणि माझं उर्वरीत आयुष्यच तिने अनंदित करून टाकलं.-   

                   

( कविता गद्यात वाचली तरी चालेल किंवा आनंद फंदीच्या बिकट वाट वहिवाट- - --हया फटक्याच्या चालीवरही म्हणायला मजा येईल. )

कविता छत्री

 

दुःख कष्ट जरि असो भोवती । तापत्रय हे छळवादी

माथ्यावर मम छत्र धरे परि । कुणि कवितेचे आनंदी ।। 1

 

कनक कणांची चमचम छत्री । सोनेरी अति सुंदरशी

सूर्य धरे मम शिरी बघोनी  । कुबेर हेवा करे मनी ।। 2

 

सूर्य कोपता आग ओकता । माथ्यावर ही मरणाची

नील मेघ हे उघडुन धरती । काव्य-छत्र माझ्यावरती ।। 3

 

कडकडकड ध्वनी करोनी । वीज ढगातुन ये खाली

शब्दकुपीतच भरुन ठेवते । तेजस्वी बिजली ओली ।। 4

 

हळुच कुंचला बुडवुन त्याते । वस्त्र रंगवी हरिचे मी

मेघनील त्या हरिरंगा ये । उठाव बिजली-रंगानी ।। 5

 

कधी चांदण्यांचे हे विस्तृत । आच्छादन माझ्याच शिरी

मेघडंबरी कुणी उघडली । रत्नांची माझ्याच शिरी ।। 6

 

इवले इवले ओठ हलवुनी । डोळे लुकलुक मिचकवुनी

माझ्यासंगे गप्पा गोष्टी । करिति चांदण्या रात्रभरी ।। 7

 

शब्द ढाळती चवर्‍या मजवर आनंदा ये नित भरती

काव्य छत्र हे आनंदाची । मजवर नित बरसात करी ।। 8

 

बहरुन आला कल्पलतेचा । मांडव  शब्दफुलांनी हा

जिथे जातसे तिथे येतसे । अमृतमय हाची ठेवा ।। 9

 

कोण धरे माथ्यावर अविरत । काव्य छत्र हे मज न कळे

आनंदातची मीच निथळते । कैसे हे कोडे उकले?

 

तोच पाहिले वसुदेवाचे । चित्र सुरेखचि मी कोठे

उत्तर माझे मला मिळाले । हरखुन बहु हो मी गेले

 

 

मुकुंद पदकमलांचे कोमल । वसुदेवाच्या छत्र शिरी

कालिंदीचे रौद्र पात्रही । पार करुन नेई सहजी ।। 11

 

तसे मुकुंदा तुझ्या कृपेचे । छत्र मोदमय  नित्य शिरी

भवसागरही पार करवुनी । नेइल मज जे पैलतिरी ।। 12

-------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment