Friday 21 October 2022

पुरुषिका -

 

पुरुषिका -

आई खूप सारी गाणी सुरेल आवाजात तालासुरात, ठेक्यात गात असे. ती लहान असतांना मेळ्यांमधे कवि गोविंदांची ``पुरुष कोण?’’ नावाची एक कविता गात असे

 शिरि थोर पागोटे ल्याला। म्हणुनिया काय तो झाला। पुरुष हो?

बहु मिशाभार राखीला म्हणुनिया काय तो झाला। पुरुष हो?

लेंढार पशूसम व्याला म्हणुनिया काय तो झाला। पुरुष हो?

असं मोठ्या ठेक्यात म्हणता म्हणता ती शेवटच्या ओळी गाई---

पुरुष ती झाशिची राणि। शौर्य मिळवोनि। जाहली साचि

तशि उमाहि दाभाड्यांची पुरुष ती

तशि भवानि बंगाल्याची

तिचं गाणं अंगात वीरश्रीचा संचार करून जाई. आपणही काहीतरी करून दाखवावं असं लहापणी वाटे. आज `पुरुष ती झाशीची राणी' ही कवितेची ओळ जिभेवर येतांना श्री आद्य शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी मनात उमटत आहेत.

 श्री आद्य शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी वाचतांना शंकरचार्यांचं भाषेवरील विलक्षण प्रभुत्त्व आज हजार वर्षांनंतरही अचंबित करणारं वाटत होतं. चांदीच्या बंद्या रुपयाची नवीन नाणी छन् छन् असा खणखणित आवाज करत टांकसाळीतून काढावीत असे त्यांनी निर्माण केलेले नवीन शब्द बंद्या रुपयासारखे खणखणित, अर्थगर्भ होते. किंबहुना त्याच्या सम तेच. त्या शब्दाशिवाय दुसरा शब्द तेथे बसणारच नाही. एखाद्या कंठीच्या पदकावर विविध आकाराची रत्ने बसविण्यासाठी विविध आकाराची कोंदणे बनवून कोंदणाच्या खाचेच्या आकाराचेच रत्न त्यात बसवून एक सुंदर नक्षी तयार करावी तसा आचार्यांच्या श्लोकांच्या लडीत बसवलेला प्रत्येक शब्द तेथील जागेसाठीच निर्माण झाल्यासारखा असतो. तेथे योग्य अर्थाचा बसणारा शब्द जर शब्दकोशात नसेल तर तो घडवण्याचं काम आचार्य फार कुशलतेने करतात.

सौदर्यलहरी हे श्री त्रिपुराम्बिका पार्वतीचं स्तोत्र. साक्षात महेश्वराची पत्नी. त्याची शक्ती. शक्तीच नसेल तर हात सुद्धा उचलता येणार नाही. हृदयाचं स्पंदन सतत चालू राहण्यासाठीही शक्तीचीच आवश्यकता आहे. शक्ती नसेल तर शिव नाही.

शिवाला शक्तीची जरि मिळते जोड लवही

तरी येई त्याला बहु विकलता पांगुळवि जी

कराया कृत्ये वा सहज घडण्या स्पन्दन-गती

असे का शक्तीसी तिजसमचि पर्याय जगती ।।

वेल चढण्यासाठी तिला वृक्षाच्या खंबीर आधाराची गरज असते. पण वृक्ष खंबीरपणे उभा राहण्यासाठी त्या वृक्षामधे त्याच्या जैविक तत्त्वातूनच एक उमदा जोम असावा लागतो. त्या ताकदीच्या जोरावर तो डौलात / (सुप्रतिष्ठित) उभा असतो.

 ह्या सुप्रतिष्ठित भक्कम वृक्षासारखा शिव  मंगलमय, कल्याणकारी, सर्वांना सुखी करणारा आहे. विश्वंभर आहे. सार्‍या विश्वाच असणं किंवा नसणं हे त्याच्यावर अवलंबून आहे. ह्या पूर्णपुरुषाच्या ह्या डौलामागे जी खरी पुरुषी ताकद आहे, जो त्याचा मूर्तिमंत अहंकार, जी पुरुषिका आहे, ती म्हणजेच त्रिपुरसुंदरी पार्वती.

 पुरुषिका हा शब्द काही केल्या मनातून हलत नाहीए. पुरुषिका असलेली पार्वती शंकराला बिलगून, शंकराच्या आधाराने, शंकराच्या कृपेवर हतबलपणे उभी नाही तर शंकराच्या कर्तृत्त्वाचा, अहंकाराचा Robust Gene किंवा DNA बनून त्याच्या धमन्या धमन्यांमधून अखंड वाहते आहे. नसानसातून सळसळते आहे. शिवाची चेतना शक्ती होऊन त्याला कार्यक्षम करते आहे.

येथे वापरलेला अहंकार हा शब्द आपण वापरतो त्या अहंकारापेक्षा पूर्ण वेगळा आहे. अहंकार आणि उद्दामपणा हे दोन पूर्ण वेगळे गुण आणि अवगुण आहेत. प्रचंड क्षमतेतून निर्माण होतो तो, `मी करू शकतो' हा अहंकार. तर अज्ञानातून जन्माला येतो तो उद्दामपणा. असीम क्षमतेतून निर्माण झालेल्या अशा अहंकारासोबत येतो तो नम्रपणा. सर्वांविषयी पराकोटीचं वात्सल्य. अशी ही विनीत असलेली साक्षात विश्वंभराची पुरुषिका आहे तरी कशी?  आचार्य म्हणतात,

जरी कार्ये मोठी हर हरि विधी पूर्ण करिती

परी सामग्रीची गरज करण्या पूर्ण सगळी

विधी घेई माते चरणकमळातून तुझिया

परागासी एका सकल जग साकार करण्या ।।

 

कणार्धासी गे त्या शिरि उचलिता तो लटपटे

सहस्राशीर्षांचा  सबळ हरिही तो डगमगे

पुर्‍या त्रैलोक्याच्या सहज प्रतिपाळास हरिला

पुरे होई माते कण चरणिचा एक तुझिया ।।

 

जगाच्या संहारा चरणरज माते उचलुनी

निजांगी भस्माचा शिव करितसे लेपनविधी ।। 2 ।।

अशा ह्या विश्वंभरा पार्वतीला आचार्य म्हणतात, मला इतर देवांकडे पाहून नवलही वाटत आणि हसूही येतं ते भक्तांना वर आणि अभय देण्याच्या हस्तमुद्रा करून मारे उभे आहेत. पण त्यांची चेतनाशक्तीच तू असल्याने  मला तर त्यांचा हा फक्त अभिनयच वाटतो.

करा उंचावोनी अभय वर मुद्रा चि बघता

गमे देवांचा हा अभिनयचि आकर्षक मला

तुझ्या वाचोनी का सुरसमिप सामर्थ्य कसले

विना शक्ती कैसे अभय वर हे संभव असे ।।

 

तुला बाकी देवांसम अभिनयाची गरज ना

तोलामोलाचे तुजसमचि जाण्या शरण वा

निवाराया भीती तव चरण हे सक्षम भले

मनीषेहूनीही किति अधिक देती पद तुझे ।। 4 ।।

शिवाला महान करणारी ही शक्ती, पुरुषिका, शिवाची कार्यशक्ती सतत माझ्या हृदयात मलाही चेतना देत राहो.

जिच्या सामर्थ्याने शिव करितसे विश्वचि सुखी

जगी ख्याती होई शिव नित असे मंगलमयी

असे कल्याणाची सगुण जणु मूर्तीच शिव हा

असे तू त्याचा हा सकलचि अहंकार बरवा ।। 7.4

 

शिवाचे ओजस्वीपण सकल उत्साह तयिचा

अगे माते तू त्या परम पुरुषाची पुरुषिका

तुझी मूर्ती राहो सतत नयनांच्याच पुढती  

सदा राही माझ्या हृदयकमली तूच जननी ।। 7.5

------------------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment