Tuesday 18 October 2022

इवलीशी

 

इवलीशी

               कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती  संस्थेत येणार असते. दुतर्फा त्याला पहायला गर्दी जमलेली असते. कोणाला तरी ती व्यक्ती आल्याची चाहूल लागते. दिसते. आणि ``आलेआले’’ – एकच आवज उठतो. दुतर्फा उभे लोक पाहुण्यांच्या पायावर पाणी घालून ,  हातातील फुल उधळून,  त्यांचं स्वागत करतात.

तशी  गवताची पाती डोक्यावर जलबिंदूचा घडा घेऊन कोणाचं तरी स्वागत करायला उभी असतात. वारा जणु वर्दी देतो ``आले आले’’  आणि आलेल्या सन्माननीयांच्या पायावर गवत पाती डोक्यावरचा जलबिंदूचा घडा रिकामा करतात. हा निसर्गातील स्वागत समारंभ मी बघत असतांना मला प्रश्न पडतो, -

ही आत्ता आलेली सन्माननीय व्यक्ती कोण? इतक्या सगळ्या गवत पात्यांनी कमरेत वाकून अभिवादन करावं आणि ती व्यक्ती मला दिसूच नये? गवताच्या असंख्य पात्यांना जी दिसली  ती मला कशी दिसावी? मी माझा अहंकार सोडून गवत होऊन डोक्यावर जलबिंदूचा घडा घेऊन उभी राहिले, गवताइतकी नम्र झाले, माझ्याकडचा एकमेव जलबिंदूही दिला, तेंव्हा मला कळलं अरे ही तर निसर्गदेवता उमा. उमाची व्याख्याहि फार सुंदर आहे. `उयते सा उमा ! जी सगळ्यांना आपल्यात ओवून ठेवते ती उमा. ते सुद्धा `सूत्रे मणिगणा इवम्हणजे सोन्याच्या तारेत सोन्याचे मणि ओवावेत तशी. निसर्गातील प्रत्येक गोष्ट उमाच आणि त्यांच्या सामुदायिक कृतीतून प्रत्ययाला येणारीही उमाच. हिमालय, समुद्र ह्या भव्य गोष्टींमधे ईश्वरत्वाचा जो प्रत्यय येतो. तोच प्रत्यय छोट्या छोट्या सूक्ष्म गोष्टींमधेही येतो.

मला गीतेच्या 13व्या अध्यायातील 30 वा श्लोक आठवत आहे.

यथा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति तत एव विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा ।।

When they see the diverse variety of living beings situated in the same material nature, and understand all of them to be born from it, they attain the realization of Brahman.

15 - 7; 8

कधी कधी काय होतं,

मन माझं मोहरून येतं

आकाशात झेप घ्यायला

पंख असून विसरून जातं 1

 

नाहीच उरत भान त्याला

पाहून चिमणी इवलीशी

खेळत बसतं संततधार

बरसणार्‍या धारांशी 2

 

बोट लावताच गोगलगाय

अंग घेते आत कशी

उत्सुकतेने बघता बघता

गवताचीच करते उशी 3

 

कुत्र्याची ही हस्तिदंती

छत्री इथे आज कशी

डोक्यावर बघता धरून

मीही होते इवलीशी 4

 

ठिपक्याएवढे गवतफूल

 माळून करते जाहीर खुशी

रांगेत फिरते मुंगीसोबत

लगबग  मी इवलीशी 5

 

गवतासंगे डोलता डोलता

मन माझं होतं गवत

डोक्यावरती इवला कलश

दवबिंदूचा राहतो झुलत 6

 

वार्‍याची एक झुळुक

सांगते आली उमा राणी

कमरेमधे वाकून मी

रिता करते कलश पायी 7

------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

No comments:

Post a Comment