Tuesday 11 October 2022

शिरीषाची झोप

शिरीषाची झोप

         पुण्याला बाणेर रस्त्यावर असलेल्यायशदामधे प्रवीणची बदली झाली. तेंव्हा यशदाचा आब वेगळाच होता. श्री. दोशी या नावाजलेल्या आर्किटेक्टनी खास नजाकतीनी बांधलेली खास आर्किटेक्चर असलेली यशदा संस्था म्हणजे पुण्यातल्या गजबजाटातलं नंदनवनच वाटे. तिथली जुनी जुनी खैराची, शिरीषाची, कडुनिंबाची प्रत्येक झाडं वाचवून त्याचा उपयोग परिसराचं सौंदर्य वाढविण्यासाठी खुबीनं केला होता. कमळांचं प्रशस्त तळं, आणि बाजूनी असलेले उंच उंच बांबू! आपण शहराच्या भर मध्यात नसून, शहरापासून  दूर, एखाद्या सुंदर वनात आल्याचा आभास निर्माण करीत. घर आणि ऑफिस एकाच आवारात समोरासमोर होते.

           ऑफिसच्या दरवाजात एक विशाल तरुवर होता. - -शिरिषाचा! त्याच्या प्रचंड आकारमानामुळे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असे. त्याच्या छायेत `यशदा' `सुखदा' वाटत असे. त्याच्या छत्र छायेत एक प्रशस्त ओपन एअर  अम्फि थिएटर उलगडलेलं होतं. त्याचा फांद्या पानांच्या विस्तृत पिसार्‍यातून झिरपणारं सकाळचं निळं आकाश, सूर्याची तापदायक उष्णता गाळून येणारा प्रकाश कोवळीक घेऊन खाली उतरे. सकाळी सूर्याच्या कोपाला लढवय्यासारखं तोंड देणार हे अवाढव्य झाड सूर्य अस्ताला जाता जातच त्याची पानं मिटून, लहान बालकासारखं शांत झोपलेलं असे. सूर्यास्तासोबत पानांच्या पापण्या हलके हलके मिटणं, आकाशाच्या खांद्यावर डोकं टेकवून झाडाचं गाढ झोपी जाणं, ह्या झोपलेल्या झाडाची रात्रीच्या निळसर काळ्या आकाशावर तयार झालेली वेलबुट्टी -- - सगळच कसं नितांत सुंदर असे.  चंद्राची किरणं त्याच्या कुरळ्या जावळामधून हळूच बोटं फिरवत राहत. माझ्या मनात अलगद उतरलेल्या ह्या तरुवरावर मी कधी प्रेम करायला लागले हे कळलच नाही.

               एकदिवस एका अनोख्या सुवासाने वेडावून मी बाहेर आले. सुगंधाचं मूळ कळेना आणि माझं गंधाचं खूळ पळेना. येणार्‍या प्रत्येक झुळकांवर स्वार होऊन येणारा हा गंध मला झुलवत राहिला. साईसुट्ट्यो म्हणण्यापूर्वी डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाला सगळे सवंगडी गोल गोल फिरवत अचानक सोडून देतात आणि कुठे कुठे जाऊन लपतात. तशा दाही दिशा मला  गोल गोल फिरवून पळून गेल्या. गंधाला घेऊन लपून बसल्या. जरा सुगंधाचा पत्ता लागतोय म्हटलं की मी त्याच्यापाठी धावत सुटे. आणि त्या मागच्यामागे पोबारा करत. सार्‍या दिशांनी माझी खूप गंमत करून घेतली. शाळेतील रे. टिळकांची कविता आठवली.

वन सर्व सुगंधित झाले

मन माझे माहून गेले  - - कितीतरी

मी सारे वन हुडकिले

फुल कोठे कळे फुलले- - मजतरी

स्वर्गात दिव्य-वृक्षास बहर ये खास

 असे कल्पिले असे कल्पिले

स्वर्गीय सुगंधाचा मागोवा घेत मी पहिल्यांदा त्याच्यापर्यंत पोचले तेंव्हा

मी सारे वन हुडकीले,

फुल दगडाआड दडाले लहानसे --------

अशी माझी अवस्था झाली.

                लपलेल्या सुगंधाचं गूढ अचानक प्रवीणनेच उलगडलं. अगं माझ्या ऑफिससमोर शिरीषाला बहर आलाय. सतत एक मंद सुगंध येत राहतो. तब्बल महिनाभर म्हणजे बरोबर एक मार्चला सुरू होणार्‍या त्याच्या परिमलोत्सवाची सांगता 31 मार्चलाच होई. एकदा वनवासात असतांना द्रौपदी ला एका अनोख्या सुगंधाने वेडं केलं. हे फूल मला अणून द्याच असा तिने भीमाकडे हट्ट धरला. त्या स्वर्गीय पुष्पाचा मागोवा घेत भीम थेट स्वर्गात पोचला. कदाचित तो ह्याच तरुतळी जाऊन पोचला असावा असं मला वाटायचं. ह्या झाडानी मला असं काही झपाटलं की सकाळी, दुपारी, रात्री अपरात्री, पहाटे वेळी अवेळी केंव्हाही मी घराबाहेर डोकावून त्याला डोळे भरून भेटून येत असे. पावडर पफ सारखी जराशा गाभुळलेल्या चिंचेसारखी किंचित हिरवट पांढरट फुलं सौंदर्यस्पर्धेत कदाचित टिकणार नाहीत. पण सुगंधस्पर्धेत नक्की सर्वांना मागे टाकतील. खरतर आपल्या देशाची मातीच गंधवती! इथल्या मृत्तिकेचा सुगंध तिच्यातून अंकुरणार्‍य़ा प्रत्येक अंकुरातून ओसंडत असतो. आपल्या देशात पुष्पप्रर्दशन किंवा पुष्पस्पर्धां सोबत सुगंधस्पर्धा घ्यायला पाहिजेत. एकाहून एक अमोघ असे सुमन-सुगंध मनाला घायाळ केल्याशिवाय रहाणार नाहीत. सुधारणांच्या तडाख्यात यशदातील हे सुंदर झाडं आणि अनेक इतर झाडे पार भुईसपाट झाली. पण अजुनही माझ्या डोळ्यांपुढचा तो सूर्यास्तासोबतच झोपी जाणारा आणि सूर्योदयासोबत उठणारा तो भव्य उमदा, सर्वांवर भव्य छत्र धरून उभा असलेला  शिरीष कोणी पुसू शकत नाही.

 

क्षितिजावर झुकला सूर्य

पेंगुळला बाळ शिरीष

झुळकेवर कलली मान

घे मिटून इवली पानं ।।

तो गाढ झोपला शांत

गुंगून जाय स्वप्नात

नभ उतरे पानांतून

लहर पवनाची त्यातुन

 

ते कुरळे मृदुल जावळ

बालका शिरी जणु विरळ

त्यातूनचि फिरवितो कर

चंद्र हलकेचि हळुवार ।।

 

ती रात्र सावळी सान

गातसे अंगाई गान

घालितेच त्या पांघरुन

तो चांदण शेला छान ।।

 

चांदणी कुणि चमचमती

अडकवून बसली जीव

बाळाच्या मृदु जावळी

ती राहुन गेली काय ।।

 

तो उषाच आली तेथ

चुंबून म्हणे ती त्यास

उघडीच बाळ रे नयन

तू हलके हलके जाण ।।

 

आणिला तियेने पंखा

खास तो मृदुल तंतूंचा

मृदु वारा घाली त्याला

अन्

अंगणी दिनमणी आला ।।

 

ती लाजून पळता उषा

तो पंखा विखरुन गेला

त्या पाना पानांमधुनी

शिरिषाच्या शिरी माळला ।।

 

किति आशीषाचे हात

फिरलेच मृदुल ते शांत

ते देऊन जाती त्यास

तो परिमल सौम्य सुमंद ।।

 

तो विशाल तरुवर ऐसा

फुलतोचि बघा हो जेंव्हा

स्वर्गीयचि सौरभ त्याचा

विहरतो फुलांवर त्याच्या ।।

-------------------------

 

लेखणी अरुंधतीची

 

 



No comments:

Post a Comment