Sunday 30 October 2022

तीर्थ

 

तीर्थ

एकदा एका 12 जानेवारीला देऊळगावराजा वरून लोणारकडे जाणार्‍या रस्त्याला वळल्यावर बुलढाण्यातल्या ह्या एका छोट्या गावात कसलीशी जत्रा भरलेली दिसली. बरेच लोक देवदर्शन घेऊन येत होते. ``हे कुठलं गाव?’’ मनातच असलेल्या प्रश्नाला उत्तर देत बरोबरचे अधिकारी म्हणाले, ``सिंदखेडराजा!’’ तेव्हा गावाच्या नावातच राजा असलेलं हे गाव कधी ऐकलं नव्हतं. देऊळगावराजा ह्या नावाचं अप्रूप वाटत असतांनाच सिंदखेडराजा लागलं होतं. अधिकारी पुढे म्हणाले, ``हे जिजाऊमहाराजांचे जन्मस्थान! आज जिजाबाईंची जयंती आहे.’’ इतक्या पावन दिनी आपण ह्या गावात आहोत हयाचा काशीला पोचल्यासारखा आनंद झाला. जिजाऊंचा वाडा, डोंगरावर असलेले ते देवस्थान ह्याचे देवदर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो. पण आजही 12 जानेवारी आणि सिंदखेडराजा माझ्या मनात रत्नांसारखे कायमचे जडवले गेले. ज्या जिजाबाईंचे नाव आपण इतके आदरानी आपल्या मनात जतन केले आहे, त्यांचे जन्मगावही आपल्या वयाची इतकी वर्षे गेली तरी माहिती असू नये ही खंत मात्र कायम राहिली.

खरतर हया भारतभूमीचा असा कुठलाही इंचभर भाग नसेल, जमिन नसेल, जिथून परकीयांना देशाबाहेर करण्यासाठी उठाव झाले नसतील, क्रांती झाली नसेल, लोक लढले नसतील.

हं!!! अयशस्वी झाल्याने लोक थोडा काळ दबले असतीलही पण स्वातंत्र्याच्या विचारांनी त्यांना कधी स्वस्थ बसू दिलं नाही.

आजही शाळांमधे मुलांना कोलंबस क्लिओपात्रा, अलेक्झांडर हे जितके परिचित असतात त्याच्या एकशतांशही आपले स्वातंत्र्यसेनानी माहित नसतात. आपल्याला रोम माहित असते. पण सिंदखेड नाही ह्याची खंत मनात आहेच!

पण! ह्या स्वातंत्र्य सेनानींचा तो स्फूर्तीदायक, सत्य इतिहास आजपर्यंत आपल्यापासून भले कितीही लपवून ठेवला तरी,----! तो न कळता आपण आजही इंग्रजांचे, मुघलांचे गोडवे गात बसावे अशी अनेकांची इच्छा असली ----तरी,!  तरूण पिढी नक्कीच त्या सोनेरी पानांचा शोध घेईल.

 

तीर्थ

चालला झपाझप हा कोण । करुनी कषाय वस्त्र परिधान

काटेकुटे मोडती पायी । परि त्याचे न त्यास हो भान

 

हेलकावे कमंडलु किती । ती रुद्राक्ष कुंडले कानी

ही स्वयंस्फूर्ति ना चरणांची । ही सांगते मनाची गती

 

परि नवयुगाची दिसे खूण । डोकावे टॅब झोळीतून

 अन लागला कानाशी फोन । हे वैराग्य दिसतसे नविन

 

बोलला पथिक एक थांबुन । ``व्वा! कैसे हे सन्यासीपण

पर्वा ना तुज वैराग्याची । करिसी कषाय वस्त्र अपमान!

 

 

अरे! दिसतोस बांड तरुण । केले केसांचेही मुंडण

तुज लागली भेटीची ओढ । तव नेत्रात दिसे मज खोट

 

तव लगबग लगबग ही चाल । पंचक्रोशीत न तीर्थस्थान

ह्या फसव्या नेत्रातच तुझिया । मज कळले तव लटिके सत्य

 

जरि लपविशी फुले झोळीत । सांग लपेल का कधी सौरभ

कळले तव प्रेमाराधन मज । हा नवप्रेमाचा आरंभ

 

तव भाव मुखीचे ताडून । सांगतो सत्य एक मी जाण

तू नव प्रेमपिसा सन्यासी । मोहाच्या झालास अधीन’’

 

बोलला तरुण यती हासुन, । ``तू बहु केलेस योग्य विधान

असलो सन्यासी मी तरिही । हुडकितो देशतीर्थे जाण

 

अहो ही देश धरा पावन । करते त्यागाच्या कथा कथन

 हे ढासळले बुरुज पाषाण । मजला सांगती त्यांचे मन

 

मज ना ग्राम शहर ना रान । ना भेटली भूमि एक इंच

ना सांडले भारतीय रक्त । जिथे ना विरोध फिरंग्यांस

 

आसेतु हिमालय मेदिनी । मी रात्रंदिन तीर्थे फिरुनी

वीरांच्या पदस्पर्शे झाली । हो जमवितो पुनित ती माती

 

न कळे जाहले आज काय । उचंबळले माझे हे हृदय

ना  वाटे पायांसी अंतर । हृदि जागे पूजेची आस

 

भेटण्या जिजाऊ मातेस । चाललो सिंदखेडराजास

मम हृदय अधीरचि बहु झाले । भेटायाच जगन्मातेस

--------------------------------------------

लेखणी अरुंधतीची –

 


No comments:

Post a Comment