भकास -
ओडिशा पाहण्यासाठी पहिल्यांदाच गेलो होतो. गाईड आम्हाला एका सुंदर मंदिरापाशी घेऊन आला. बाहेरच्या गेटपासून मंदिरापर्यंत नेणारा किमान दिड दोनशे मिटरचा भव्य रस्ता होता. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार हिरवळ नेत्रांना सुखावत होती. त्या भव्य मंदिराच्या आजूबाजूची स्वच्छता, टापटिप मनाला प्रसन्न करून गेली. मंदिराच्या गोपुरावरून नजर हटत नव्हती. मनही इतक्या सुंदर मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणि आतील मूर्तीचं श्रीमुख पाहण्यासाठी अधीर झालं असतांनाच मंदिरातून चारपाच जणांचा एक गट बाहेर पडला. त्यांच्या पायात बूट चपला पाहून नापसंतीची एक तीव्र सणक डोक्यात उठली. बरोबर असलेल्या गाईडला विचारलं, "तुम्ही ह्या लोकांवर आक्षेप का घेत नाही?" तेंव्हा तो हसून म्हणाला, `` शूज पहनके अन्दर जा सकते हैं। अंदर भगवानकी मूर्ती नहीं हैं। इतक्या सुंदर मंदिरांमधे
देवाची मूर्ती नाही? नहीं जी! मुसलमानोंने
तोड दी! पण आता तरी परत मूर्ती बसवू शकता? नहीं वो पुरातत्त्ववाले
परमिशन नहीं देते।‘’
नंतर अशी अनेक सुंदर सुनी सुनी ओस
मंदीरं, त्यांचे सुंदर परिसर बघतांना मनात कालवाकालव
झाली. एवढा भव्य परिसर, स्थापत्य
कलेचा अजोड नमुना असलेली मंदिरं पण ---- पण येवढ्या मोठ्या रम्य परिसरातून,
एवढ्या भव्य मंदीरातून
फक्त देवाची दिडदोन फुटाची मूर्ती काढून घेतली की त्या परिसराची
एवढी अवहेलना व्हावी? त्या मंदीराचं
पावित्र्य
संपाव? तेथे येणारे ओसपण मनाला अस्वस्थ करत राहिले. दिडदोन फुटाची मूर्ती काढली की रस्त्यावरून
फिरणारे अपवित्र बूटही मुजोरपणे
आत जायला कचरत नाहीत. देव नाही म्हटल्यावर
बाहेर एकही फुलवाला, हारवाला बसत नाही; कारण देव नाही म्हटल्यावर
फुलंही आत प्रवेश करत नाहीत.
आपल्या आयुष्याचंही असच नाही का? माणूस आपल्या कर्तृत्त्वाची भव्य मंदिरं उभी करतो. यशाचे सोनेरी कळस त्यावर चमचमत राहतात. नाना कलांरूपी कोरीव कामाने त्यांना सजवतो. पण त्यात हृदयस्थ भगवंताची मूर्ती नसेल तर मनाला आलेलं ओसपण जाता जात नाही. अंधार्या खोलीतील छोटासा दिवा दूर नेला तर तेथे वेगळा अंधार आणून भरायला लागत नाही. चांगली गोष्ट नाकारली की वाईट गोष्ट आपोआप तिची जागा घेते.
व्यायामाची नावड नवे नवे रोग घेऊन आनंदाने शरीरात रहायला येते. नियमानी वागणे सोडले की गबाळेपणा आणि गलथानपणाला निमंत्रण द्यावे लागत नाही. तो आपणहून येतो. स्वच्छता सोडली की अस्वच्छता आणि उकिरडा कोणाची परवानगी न घेता रस्त्यावर नांदायला येतो. शिस्त मोडली की बेशिस्त बोकाळते. आपण आपले चांगले संस्कार सोडले की कुसंस्कार दबा धरून बसलेलेच आहेत. निर्वात पोकळी सहजपणे अस्तित्त्वात नसते. एखाद्या ठिकाणची हवा काढून घेतली तर शेजारील आसमंतातील हवा तेथे धुस्सकन शिरून ती पोकळी भरून काढते. निर्वात पोकळीला स्वतःचे अस्तित्त्व नसते. ज्ञानदेव म्हणतात साळी केळी आपोआप उगवत नाहीत. कष्ट करून त्यांची जोपासना करावी लागते. ओसाड रानातल्या गवताचं तसं नाही. जिथे जमिन कसली जात नाही अशा बरड माळरानावर ते मुबलक उगवतं. कुविचारांचं तसच असतं.
काही वर्षांपूर्वी आपल्या आई, वडिल, आजोबा कोणालाही अनेक स्तोत्रं पाठ असायची. परवचा म्हणण्यात मुलांचा कधी खंड पडायचा नाही. पाढे, पावकी, निमकी, रामरक्षा, कविता, अनेक गोष्टी तोंडपाठ असायच्या. मध्यंतरी आपण सुधारलो. निधर्मी झालो. देवाची लाज वाटायला शाळेतूनच सुरवात झाली. शाळेतील देवाच्या मूर्तींचे उच्चाटन झाले. निधर्मी शाळांमधे रामरक्षा, भीमरूपी शिकवायला बंदी झाली. मग ---- टि.व्ही अथवा फोन स्क्रीन हीच आमची मंदिरं झाली. सिरीयल्स् आणि त्याच्यातली भंपक पात्र आमच्या डोळ्यांसमोर देवमूर्तीसारख्या राहू लागल्या. मनाच्या कोनाड्यात चारित्र्यहीन नटनट्यांची स्थापना झाली.
काही वर्षांपूर्वी प्रवीणना भेटायला आलेली पुण्याची एक महिला पोलिस इन्पेक्टर डोक्याला हात लावून सांगत होती, (तिच्याच शब्दात देते)
----
"सर, पुण्याला
डेक्कन परिसरासारख्या
पॉश एरिआत माझी नेमणूक आहे. अनेक स्त्रिया
एकएकट्या
राहतात. संध्याकाळी
एकमेकींना
भेटल्या की ``अगं त्या सिरीयल मधल्या अमकीनी किंवा तमक्यानी
काय केलं सांग बरं माझं परवा पहायचं राहिलं.’’
अशा प्रकारे त्या पात्रांबद्दलच
सतत इतकं बोलत राहतात की काही दिवसांनी
त्यांना ती पात्रच जणु खरी आहेत, आपल्या जीवनाचा भाग आहेत असं वाटायला लागतं. टिव्ही सिरियल्स्
इथल्या नागरिकांचं
खरं जीवन झालं आहे. न पाहिलेल्या भागांसाठी त्या अत्यंत अस्वस्थ होतात. तेच खरं समजून त्यातल्या पात्रांशी त्या स्वतःला जोडून घेऊन आपल्या सुनांशी अथवा सुना आपल्या सासवांशी डूख धरून किंवा त्यांना धडा शिकवण्याच्या भावनेनीच वागतात. त्यांना कितीही सांगितलं तरी त्या त्याच्यातून बाहेरच पडू शकत नाहीत.’’
बहुतेकींनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. सर्वांकडे पैसे आहेत पण कोणतेही छंद नाहीत. पुस्तकांशी मैत्री सुटली की कुत्रमैत्री मैत्री बरी वाटू लागते. पुस्तकं सुद्धा फॉरिनची लागतात. साधी आपल्याकडची गावरान वाटतात. एकदा मला एका बाईंचा फोन आला. ताबडतोब या. ( तुम्ही एकटे रहात असाल वा म्हातारा-म्हातारी असले आणि आपल्या भागातील पोलीस स्टेशनमधे जर तसं सांगून ठेवलं असेल, तुमचं नाव नोदवलं असेल, तर पोलीस आपल्या भागातील वृद्धांना भेटून त्यांची खुशाली अधुन मधुन विचारत असतात. त्यांना लागेल ती मदत ही देतात.) मी कामात असल्याने माझ्या हाताखाली काम करणार्या लेडी पोलीसला त्वरीत त्यांच्याकडे पाठवलं. पण ``मला तिला नाही तर तुम्हालाच त्वरीत भेटायचं आहे. तुम्ही लवकर या.’’ म्हणून तिच्याबरोबर निरोप आला. हातातील काम आटपून मी जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर त्यांच्याकडे गेले. आतल्या खोलीत बाई एखाद्या लहान मुलाला सांगावं तसं सांगत होत्या, ``मी सांगितलं नाही का? की तुला भेटायला इन्सपेक्टर नक्की येणार आहेत. कित्ती घर डोक्यावर घेतलं होतस ना? आल्या बघ.’’ मी त्यांच्या आणि त्यांच्या सोबत कोण बाहेर येत आहे त्याची वाट बघत असतांनाच बाई त्यांच्या कुत्र्यासमवेत बाहेर आल्या.
``ताई हा तुमचीच वाट बघत होता. त्याला तुमच्या येण्याची
इतकी सवय झाली आहे की तुम्हाला
चार दिवस नाही पाहिलं तर त्याला चैन पडत नाही. मी कपाळाला हात लावला.’’
माझ्या मित्र मैत्रिणींनो, ह्या अनुभवापासून आपण लांब नाही. तुम्हाला तुमचे छंद जोपासायला इतके दिवस वेळ मिळाला नसेल. मला मान्य आहे. पण छंदांना वय नसतं. आवडेल ते काम अथक करा. कंटाळू नका. शरीराला कामाची तर मनाला शांत बसायची सवय लावा. तुमच्या मनात प्रकाशाची एक तरी पणती लावून ठेवा. नाहीतर अंधार पसरायला वेळ लागणार नाही.
काही नाही तर
संतांनी सांगितलेला
उपायही मानाचं दारिद्र्य
दूर करतो. तो म्हणजे भज गोविन्दम्
---- भज गोविन्दम्
---
दिवसानंतर सांज चि येई । सांज सरोनी ये रजनी
शिशिर सरोनी वसंत येई ।
थांबे ना ऋतुचक्र गती।।
खेळ असा काळाचा रंगे ।
सरते जीवन त्या संगे
आशा दावी स्वप्न जिवाला ।
मिथ्या असुनी ना भंगे।।1
हरि गोविंदा वद
गोविंदा जप गोविंदा भ्रांतमती
ठाके मरण पुढ्यातचि तेंव्हा ‘ डुकृञ् करणे’
काय करी।।ध्रु0
बाळपणीचा काळ सुखाचा । खेळामध्ये तो संपे
सळसळतेची तरुणरक्त ते । मोह वनाची सफर करे।।
संध्याछाया भिववी हृदया । चिंता निशिदिनि पोखरते
सरते आयू परी न
कोणी। ब्रह्म कळाया आस धरे।।7
हरि गोविंदा - - -।धृ0
रोज म्हणावी गीता सुंदर ।
नाम सहस्रा वा न चुके
चित्ती आठव रूप मनोहर ।
पुन्हा पुन्हा ते श्रीहरिचे
साठवि ना
तू धनसंपत्ती
। गोरगरीबा वाटुन दे
संतसज्जनांच्या संगे तू । घालवि वेळ सदैव सुखे।।13
हरि गोविंदा - - -।धृ0
लेखणी अरुंधतीची –
संपूर्ण स्तोत्रासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
ANUVADPARIJAT.BLOGSPOT.COM
(चर्पटपञ्जरिकास्तोत्रम् / मोहमुद्गरस्तोत्रम्)
No comments:
Post a Comment