Tuesday 18 October 2022

उशाशी -

 

 उशाशी -

अर्धवट झोपेत उशाखाली हात गेला. हाताला आलेल्या मोबाईलचं बटण सवयीनी दाबलं गेलं. गजर बंद करत उठले. तर उशापाशी नातवाची खेळण्यातली एक गाडीही माझ्याकडे पाहून हसत होती. मलाही हसू आलं. वाटलं, खरच उशापाशी काय काय गोष्टी वस्तीला येतात. जरा जरा कळायला लागलेल्या मुलालाही हातात मिळालेला रंगीत खुळखुळा सोडायचा नसतो. झोप लागता लागता सैलावत चाललेल्या मुठीतून हळु गळून पडतो उशाशी. मिटणार्‍या डोळ्यांमधे कुठलं तरी रंगीत स्वप्न रेखाटत असतो जणु. अगदी नवजात तान्हुल्याचीही अशीच अवस्था असते.

 

उराशी धरे माय जेंव्हा शिशूसी

तिच्या स्पंदनांचीच भूपाळि त्यासी ।।

तिचा श्वास-उच्छ्वास ही एकतारी

तयासी गमे वाट ती राउळाची ।।

 

उशाशी असलेल्या गोष्टी वयानुसार बदलत जातात. बालस्तावत्क्रीडासक्त: ह्या उक्तीला अनुसरून बालपणी नवीन आणलेली बाहुली, गाडी, खेळ झोपतांना उशाशी सोबतीला येतात. शैशव सरता सरता हळुच त्यांची जागा गोष्टीची पुस्तकं घेतात. सिंदबाद, रॉबिन्सन क्रुसो, तेनालीराम, बिरबल एका आगळ्यावेगळ्या गुहेचा दरवाजा उघडतात आणि तरुणस्तावत्तरुणीरक्त:। म्हणत ती गुहा अजून गूढ गहिरी होते. उशाशी येणार्‍या हुरहुर वाढवणार्‍या कादंबर्‍या, प्रेमपत्र, इ.इ. नव्या नव्या गोष्टींसोबत नवी नवी स्वप्न खुणावत राहतात.

तुमच्या, माझ्याया किंवा अजुन कोणाच्या बाल्य, तारुण्य आणि वृद्धापकाळी उशाशी राहणार्‍या वस्तूंमधे एक कमालीचं साम्य असतं. एखाद्या रस्त्यावर असलेली घर, दुकानं, झाडं, खांब जिथल्या तेथेच असतात. तशा ह्या वस्तू जणु काही जीवनाच्या रस्त्यावर जेथल्या तेथे मांडूनच ठेवलेल्या असतात. गाडी पुढे धावते. पण झाडेच मागे मागे पळत आहेत असं वाटतं. काळाच्या पोटात बसून आपणही वेगाने जात राहतो आणि समोर आलेल्या वस्तू उगाचच काही काळ आपल्या उशाशी आहेत असं वाटतं. एक वस्तू मागे पडते. दुसरी वस्तू उशाशी आल्याचा भास होत राहतो. कोणी तरी आपल्याला खेळवत राहतं. आपण अजाणता खेळत राहतो. --

---------------------------------------

उशाशी -

उशाशी दडोनी मला साथ देती

किती वस्तु त्या मोजले मी न त्यांसी ।। 1

कधी खेळणी, बाहुली, लाल गाडी

कधी पुस्तके, शिक्षणाची निशाणी ।। 2

कधी मोगरा, धुंद चाफा उशाशी,

कधी अंगडी, टोपडी, बाळलेणी ।। 3

उशाशी असे काहिबाहीच आले

पुसाया कधी नेत्र माझेच ओले ।। 4

कधी औषधांच्याच रंगीत गोळ्या

सवे तो जलाचा उशाशीच तांब्या ।। 5

उशाशीच येता जपाचीच माला

दिसू लागला मोक्ष तो लोचनाला ।। 6

जशी पालटे वस्तु माझ्या उशाशी

तसे पालटे स्वप्न माझ्याच नेत्री ।। 7

निराकार स्वप्नास साकारण्यासी

फुटोनी उरी धावले व्यर्थ मीची ।। 8

परी सत्य येता कळोनी मनासी

न धावेचि बाहेर ते शांत राही ।। 9

नभी धावती मेघ ना चंद्र धावे

परी वाटतो धावतो तोचि वेगे ।। 10

जिथेच्या तिथे वस्तु तैशाच मार्गी

मला घेऊनी काळ धावेच वेगी ।। 11

जसा काळ धावे नवी वस्तु येते

उशाशी असे लोचना भासते रे ।। 12

नवी वस्तु देई नवे स्वप्न चित्ती

नसे सत्य काही परी त्यात अंती ।। 13

दुजा मार्ग घेता निराळीच दृश्ये

उशाशी तशी नांदती भिन्न स्वप्ने ।। 14

नको स्वप्नमाला उशाशीच मिथ्या

धरीले हृदी मी उमा-पावलांना ।। 15

------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment