Friday 21 October 2022

बर्फी

 

बर्फी

माझी आई अन्नपूर्णा होती. सासूच्या हाताखाली अनेक वर्ष सतत पन्नास माणसांचा स्वयंपाक करूनही, ``कंटाळा आला आता मला स्वयंपाकाचा!'', ``आजच्या दिवस काहीतरी करून टाकते.'' किंवा ``बरं नाही मला, स्वयपाकाच पहा कोणी. मी जरा पडते.'' असं एकदाही तिने म्हटल्याचं आठवणीत नाही. तिचं विळीवर भर भर भर भाजी बारीक चिरणं असो वा आम्ही तिन्ही खादाड मुलं एकदम भूक भूक करत जेवायला बसल्यावर भराभर गरम गरम पुरणपोळ्या करून कोणाचंही पान रिकामं राहता त्यांना वाढणं असो. तेंव्हा कधी कौतुक वाटलं नाही. आज मात्र आश्चर्य वाटत.

माझं लग्न झाल्यावर मी तिला विचारायला लागले, ``आई चिवडा कसा करतात?'' ``आई लाडू कसे करतात?'' ती सांगायची, अगदि बारिक सारिक तपशीलासह. जितका आनंदानी स्वयंपाक करायची तितकच भरभरून सांगायची. तिचं ते सांगणं ऐकायलाच मी कित्येक वेळेला विचारत रहायचे.

``आई नारळाची बर्फी कशी करतेस?'' तिचे डोळे आनंदानी फुलून येत. ``हे बघ नारळ अगदि सावकाश कमी जोर देऊन खोवायचा. बारीक खोव पडला पाहिजे. जोरात जोरात नारळ खरवडलास तर धसड्या धसड्या पडतील. खोबर्‍याच्या पाठीचं काळं पडता कामा नये.'' तेंव्हा मिक्सर नव्हते. हाताच्या कौशल्यावरच सुगरणपणा अवलंबून असे. ती मन लावून सांगत असतांना मला वाटे, स्वयंपाक करणारी माझी आई आणि तो पदार्थ बनविण्याची कृती ह्या दोघींचं इतक गुळपीठ आहे की, ती कर्ती आणि कृती जणु एकजीवच झाल्या आहेत. त्यामुळे तयार होणार्‍या पदार्थाच्या प्रत्येक कणाकणावर, आणि तो तयार होतांनाच्या क्षणाक्षणावर तिच्या अस्तित्त्वाची मोहोर उमटलेली असे - -राजमुद्रेसारखी.

परत भानावर येत मी म्हणे, `` हं मग पुढे? '' तिचा तो हुरूप पाहून माझे प्रश्न चालू रहात. `` आई गं, बर्फी झाली हे कसं समजायचं? '' `` सोप्प आहे. नारळ, साखर, खवा, पहिल्यांदा एकत्र केल्यावरही वेगवेगळेच राहतात. हळु हळु सारे एकत्र मिळून यायला लागतात. एकजीव होतात. मग गॅसची आच कमी करायची. सतत हलवत मात्र रहायचं. त्यांचा गोळा व्हायला लागतो. बर्फी तयार व्हायला लागली की पातेल्याला चिकटता कडे कडेनी मिश्रण सुटुन यायला लागते. धग फार नको हं, नाहीतर मिश्रण बुडाला लागेल.(म्हणजे जळेल) धग फारच कमी केलीस तर वेळही लागेल आणि रंगही जास्त गडद होईल''.

त्याच्यात केशर कधी घालायचं, वरील सारणात पडायच्या तयारीत असलेली खलबत्यातील वेलची पूड कधी घालायची, ताटात वड्या थापतांना घ्यायची काळजी, प्रत्येक बर्फीवर येईल असा एक एक बेदाणा, काजू आणि बदामाचा काप आणि नंतर ताटलीमधे सजलेली बर्फी ! पहिल्यांदा देवापुढे बसायची. नैवेद्याचे सोपस्कार भराभर उरकून आमचा हात बर्फीवर पडायचा. साखरेला जशी एकाच वेळी गोडीही असते, शुभ्र रंगही असतो आणि दाणेदारपणाही असतो, तसा त्या बर्फीला आईच्या हाताचा स्पर्श, मनाचा उत्साह आणि प्रेमळपणाही असायचा. त्या बर्फीत साक्षात आई उतरलेली असे.

आज इतक्या वर्षांनी तिचे ते शब्द आठवले, `` बर्फी तयार व्हायला लागली की मिश्रणाचा गोळा पातेल्यापासून हळु हळु सुटून यायला लागतो'' आणि वाटल जाता जाता जीवनाचं तत्वज्ञानच शिकवून गेली. एक पक्व, परिपूर्ण आयुष्य बनवायचं असेल तर परिवाराविषयी वाटणारी आस आणि आच थोडी थोडी कमी करायला पाहिजे. जास्त प्रेम हृदयाच्या बुडाला चटके देत जाळल्याशिवाय रहात नाही आणि अचानक गॅस मिणमिणता केल्यासारखं संसाराला दूर लोटणं मनाचा रंगच काळवंडून टाकतं.

               परिपक्व आयुष्याची रेसिपी जमली की संसाराच्या `झमेल्या'पासून सहजपणे सुटत सुटत माणूस अंतर्मुख होतो. सहज बर्फी तयार होते त्याची. - - - मधुर, खुटखुटीत, हाताला चिकटणारी, समाधानाच्या वेलदोड्याचा सुगंध देणारी, सहज हास्याचा बेदाणा काजू चिकटलेली. कधी कधी लहान मुलाच्या उत्साहाने कोणीतरी स्मिताचा बेदाणा काढून घ्यायचा प्रयत्न करतात. अशावेळी खुदकन् हसणार्‍या बर्फीला जसा नाजुक खड्डा शिल्लक राहतो तशी पक्व झालेल्या माणसाच्या गालावर खळीची खूण उमटल्याशिवाय रहात नाही. नखलुन बेदाणा घेतल्यावरही - -समाधानाची!

आणि मग एका पुढच्या पायरीवर ठेवण्यासाठी पाय सहज उचलला जातो. हृदयाची एकतारी छेडली जाते. मन म्हणतं , -----------

आधार भार वाटे

तम हा उदार भासे

प्रत्येक श्वास माझा

मजला उधार वाटे-----1

आता धीर मजला

हरि हात तू धरी रे

झाले अधीर मन, मी

संसार मोडला रे------2

नाती कधीच पडली

गळुनी कुठेच मागे

कवठासमान आता

चिकटे देठही रे -------3

कर्पूर जीवनाचा

उडुनी क्षणात जावा

मागे तो उरावा

कधि अल्प अंश माझा -------4

हरि पुण्यनाम नौका

पाहेच वाट माझी

बसले तयात आता

हरिरूप राहिले मी--------5

-------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment