Tuesday, 11 October 2022

जकरंडा/ सुनीलमोहर

 

जकरंडा/ सुनीलमोहर

सुहृदहो,

फेब्रुवारी महिन्याच्या माझ्या आठवणी एका सुंदर झाडासोबत गुंफल्या गेल्या आहेत. हे झाड भारतीय वंशाचं नाही पण गुलमोहराप्रमाणे इथल्या  वातावरणात सहज मिसळून गेलं आहे.

त्याची आणि माझी पहिली ओळख झाली नगरच्या बंगल्यात. 40-42 वर्षांपूर्वी. एप्रिल - मे महिना होता. गुलमोहराच्या जातीची पण वेगळीच नाजुक बारीक पानं; वाढतांना मात्र बुचाच्या झाडांसारखी उंच सरळसोट वाढलेली. 8-10 झाडं एका रेषेत उभी होती.  त्याचा बहर ओसरून गेला होता. झुरमुट थोडी निळी फुलं शेंड्यावर बाकी होती. ``काय नाव ह्या झाडाचं?’’ आणि माळी म्हणाला, ``जकरंडा!’’ एखाद्या  छानशा हरणाच्या चित्रापुढे चुकून रानरेडा नाव चिकटवलं जावं तसं काहीसं वाटलं.

परचक्रात ऐश्वर्य लुटलेल्या, परागंदा झालेल्या राजासारखे काहीसे दिसत होते ते वृक्ष. नंतर एकदा फेब्रुवारीत पुण्याला बाणेरच्या रस्त्यावरुन पहाटे धुक्यात फिरायला जातांना  लांबून असं वाटत होतं की समोर निळा ढग उतरलाय का आकाशाचा तुकडाच जमिनीला भेटायला खाली आलाय. त्या निळ्या रंगाच्या ओढीने पायही भरभर चालू लागले आणि  -- आणि  अचानक खंद्यावर हलकेच काही असल्याची जाणीव झाली. हात लावून पाहिल तर एक छानसं नाजुक निळं फूल हातात आलं. निळ्या फुलांनी मोहरून आलेला हा तरु पाहून काय वाटलं हे सांगणं अशक्य आहे. काही काळ सारं सारं विसरून त्या निळ्याची श्रीमंती बघण्यात रंगून गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही झाडं श्रीमंत करत होती . दातपाडी, उंदीरमारी, गराडी, भेर, सुबाभुळ, अशा झाडांच्या उतरंडीतलं जकरंडा हे नाव त्याला अगदीच शोभत नाही असं वाटलं. हा तर सुनीलमोहर--- नीलमोहर---निळं धुकं! आहाहा! पुढचे अनेक दिवस मी पहाटेच शांतपणे त्याला निरखण्याच्या ओढीने येत राहिले.  हा बहर फेब्रुवारीचा पूर्ण महिना जोमात होता. नंतर हळु हळु हा बहर ओसरत वर्षभर झाडावर झाडाचं नाव कळण्याइतकी नावाला फुलं शिल्लक असायची. आता ही झाडं त्या रस्त्यावर आहेत का नाहीत माहीत नाही.

वृत्त - भूपति वैभव

+ + +   २२=

 

हे फूल निळे का उतरुन खाली आले

मम खांद्यावरती अलगद बसले  मौजे

लडिवाळ बाळ का हासत मजला पाहे

ना ओळख पाळख त्याला कुठली लागे ------1

 

ते प्रसन्न हासू मजला काही सांगे

 मी हासुन वरती सहज कौतुके पाहे

तो ``सुनीलमोहर’’ नखशिखांत सजलासे

का नीलमेघ हा उतरे तरुवर भासे  ------ 2

  

 ते फूल घेऊनि हाती निरखे मीची

तो धरणीवरती दिसली मजला नक्षी

त्या निळ्या तरूने चितारली ती होती

ते प्रतिबिंबच का त्याचे मोहक खाली ------ 3

 

मी बिंब पाहु प्रतिबिंब पाहु ना समजे

हे नील स्वप्न मज आज अचानक भेटे

का अडवुन माझी वाट हसे वनमाळी

मी कुठे चालले हेच विसरले भोळी ------ 4

---------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment