Thursday 20 October 2022

शुभ दीपावली

 

शुभ दीपावली

दिवाळी आली की, माझं मन बासरीतून निघणार्‍या सूरांसारखं वार्‍यावर तरंगत तरंगत सार्‍या वस्त्या वस्त्यांमधून, रस्त्या रस्त्यांमधून अलगद तरंगत असतं. मनाच्या सोबतीला दोन मैत्रिणीही असतात—हात धरून! ---- डोक्यावर आकाश-कंदिलांनी सजलेली उर्ध्वा आणि पायाखाली रागोंळ्यांच्या झेल्यांनी सजलेली धरा!

वसंतऋतु आला की पर्णहीन, निस्तेज झाडांवरही नवी नव्हाळी दिसायला लागते. इतरवेळी अनोळखी वाटणारे तरु त्यांच्या फुलाच्या माध्यमातून आपली ओळख वाढवतात. तशीच इतरवेळी मोडकळीला आलेली रंगहीन घरही प्राण भरल्यासारखी जिवंत होऊन जातात. रंगांनी बहरून येतात दिवाळीत.

घरावरचं छप्पर मोडकळीला आलं असलं तरी, दिवाळीत स्वतःपुरतं रंगीत आकाश बनवून ते प्रकाशानी भरून टाकणारा आकाश-कंदील लावायची रीत मनाला अनुपम वाटते. प्रकाशाचा रंगहीन भगभगीतपणा सुंदर रंगांमधे परिवर्तित करणारे रंगिबेरंगी आकाश-कंदील, घराघरानी निर्माण केलेलं सुंदर आकाश सादर करत असतात. प्रत्येक घराच्या आकाशाचा वेगळा रंग असो अथवा सार्‍या चाळीच्या आकाशाचा गुलमोहोर फुलल्यासारखा एक रंग केशरी असो! मनात एक विस्तीर्ण सुंदर आकाश उर्ध्वा रेखाटत जाते.

आकाश कंदिलांच्या मऊ रेशमी झिरमिळ्या वार्‍यावर सळसळत राहतात. पाण्याखाली असलेल्या प्रवाळाच्या वस्तीच्या सांदिसापटीतून हळुवार नजाकतीने आपले fins हलवत फिरणार्‍या माशांसारखं माझं मनही आकाश कंदिलांच्या झिरमिळ्या झिरमिळ्यांमधून फिरून येतं. अंगावर पडणार्‍या आकाश कंदिलांच्या रंगिबेरंगी कवडशांची बरसात झेलत मन प्रकाशात न्हाऊन निघतं उर्ध्वेचा हात धरून.

इतर वेळेला ताई, माई अक्का वाटणार्‍या गृहिणी कोर्‍या करकरीत रंगात पद्मिनी, मस्तानी वाटत असतात. तर नेहमीचे कुठल्यातरी मळकट रंगातल्या `ईजारीं'मधले पुरुष रेशमी रंगीत झब्यांमधे गुढ्यांसारखे सजलेले असतात. शाळेच्या गणवेशात एकछाप दिसणारे बाळ गोपाळ फुलपाखरांसारखे रंगिबेरंगी होऊन इवले इवले पंख हलवत सगळीकडे उडत असतात जणु.

मनाच्या दुसर्‍या हातात हात गुंफलेली धरा म्हणते, `माझ्याकडेही पहा ना!' पाया खालची रोजची काटेरी वाट शेणानी गुळगुळीत सारवून गेरूनी आपल्यापुरता सुबक चौकोन बनवून त्यावर रेखाटलेली रांगोळी आणि त्यावर ठेवलेली पणती माझ्या मनातील धरा सुंदर करून टाकतात.

गावागावत शेणाने सारवलेल्या जमिनीवर ठिपक्या ठिपक्यांना मनाच्या रेघांनी जोडत जाता जाता फुलांचा झेलाच जमिनीवर उमटलेला असतो. फुलांवर रंगांची पखरण झालेली. मन म्हणतं, संसारातही ह्या गृहस्वामिनीने अनेक दूरदूरच्या ठिपक्यांना आपल्या मायेच्या रेघांनी सांधत नात्यांचा एक छानसा झेला साकारलेला असणार. त्यात नात्याच्या प्रेमाचे विविध रंग अलवारपणे भरलेले असणार.

शहरातल्या दरवाजांसमोर गेरुच्या लाल गालिच्यावर रांगोळी आपलं सौंदर्य खुलवितांना दिसते. ह्या रांगोळ्यांच्या रेघा म्हणजे गृहस्वामिनीच्या कौशल्याचा आलेखच जणू! दोन बोटांच्या चिमटीतून ओघळणारी रांगोळीची रेघ जितकी बारीक, एक सारखी, बाकदार आणि झोकदार तेवढी संसारची रांगोळी सुबक.

स्नेहाने परिपूर्ण अंजुली जोडून रांगोळीवर विराजमान झालेली पणती सारा आसमंत पावित्र्याने भरून टाकते. मग तेजालाही आपला मोठेपणा विसरून दत्तात्रया सारखा बालपणा धारण करून पणतीच्या टोकावर इवलसा तेजाचा ठिपका होऊन बसायला लागत. पावलापुरता प्रकाश निर्माण करणाऱया शांत प्रसन्न उजेडाच्या ठिपक्यांची दीपावली मनाला पावला पावलागणिक साथ देत राहते. आपल्या सर्वांना अरुंधतीची शुभ दीपावली

---------------------------------------------------------------

 लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment