Tuesday 11 October 2022

कमल उमलले

  कमल उमलले 

किती गोऽऽड बाऽऽई बाळ जसे कमळ उमलले

जाईच्या शुभ्र कळ्या दात ही तसे ----ऽऽऽ---                                                                 लहानपणी मला बरं नसतांना आई तिच्या गोड आवाजात गाणं म्हणून थोपटत असे. आणि तिच्या त्या गाण्याच्या शब्दांमधे , सुरांमधे कधीतरी गाढ झोप लागत असे. सासरी माहित नाही पण लहान मुलांना सोपा श्लोक म्हणून पुढील श्लोक शिकवत असत.     

 करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम्

वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनासा स्मरामि ।।

मी तो माझ्यापुरता मराठी करून घेतला -

करकमळाने पदकमळासी

धरून घाले मुखकमळाते

वटपत्रावर सुखे पहुडला

बाल मुकुंदा त्या मी स्मरते ।।

अशा सुंदर बालमुंदाला पाहून कोणाचे हृदयकमळ फुलून येणार नाही? आपल्याकडे कञ्जनेत्र, कमलानन, करकमल, चरणारविन्द अशा प्रकारे डोळे, चेहरा, हात, पाय --सर्वांना दिलेली कमळाची उपमा बाकी कुठल्या संस्कृतीत दिसत नाही.

इतकेच कशाला, आपल्या शरीरात सहा चक्रे किंवा सहा कमळे असल्याचा उल्लेख वारंवार येतो. त्यांना किती पाकळ्या आहेत ह्याचेही सविस्तर वर्णन असते. मूलाधारचक्राच्या पद्माला चार दळे तर स्वाधिष्ठान चक्राशी स्थित कमळाला सहा दळे, मणिपूर चक्रापाशी असलेल्या कमळाला दहा पाकळ्या, हृदयस्थ अनाहत चक्ररूप कमळाला बारा दळे असतात. कंठस्थ विशद्धिचक्ररूप कमळाला सोळा पाकळ्या असतात. तर दोन्ही भुवयांच्या मधे म्हणजेच भ्रूमध्यात असलेल्या आज्ञाचक्ररूपी कमळाला दोनच पाकळ्या असतात. ह्या सर्वांच्या वरती षट्चक्रोपरि संस्थिता म्हणजे ह्या साही चक्रांच्या वर सहस्र दल कमलात चित् शक्ती रूपी कुंडलिनी स्वरूप श्री त्रिपुराम्बिका राहते. केवढी ही कमळं!

बाह्य अवयवांनाही कमळांची उपमा आणि शरीरातही अशी सात सात कमळे म्हणजे मला आपण कमलमय झाल्यासारखे वाटतं. किंवा आपण म्हणजे एक नलिनीवन तर नाही? हे सर्व वर्णन एखाद्या सर्जनला सांगितले तर तो आपल्याला वेड्यातच काढेल हे नक्की. शरीर हे रक्त, मांस, अस्थी आणि काही इंद्रियांचे आहे. त्यात कुठली कमळे आणि त्यात कुठली फुले?

मग ही कमळे----- हे वर्णन? आपल्या पूर्वसुरींनी का बरे केले असावे? कवी कल्पना म्हणावी तर संत आपल्या अनुभवाचे बोल आहेत म्हणतात. विचार करतांनाच माझा छोटा मित्र मनीष आला आणि मला त्याच्या कडच्या कमळांबद्दल सांगू लागला- ``काकू! माझ्याकडची काही कमळं पहाटेच उमलतात. काही रात्री तर काही सूर्य डोक्यावर आला की दुपारी उमलतात.’’ ``अरे वा ही तर माध्यादिन शुक्ल यजुर्वेदी दिसतात.’’ मी हसत हसत मनाशी म्हणाले. ``प्रत्येक प्रकारच्या कमळाची उमलण्याची वेळ वेगवेगळी आहे.’’ मनीष.

माझ्या मनात आलं की एक साधी परीक्षा आहे. जर आपलं शरीर कमलवन असेल तर एक तरी कमळ उमलल्याचं कळायला नको का? तशी सूर्योदयापूर्वी निशाचर सोडून सगळ्यांनाच जाग येते. म्हणजे ही नेत्रकमळं सूर्यामुळे उमलत असतील का?

हळु हळु हळु दिनमणी हा उदयाचली आला

फुलवाया जणु माझ्या भाग्य पंकजाला ----

शाळेत कविता होती. एका सजीव नसलेल्या विहीरीलाही हा दिनमणी आपल्या भाग्यपंकजाला फुलवायला येतो असं वाटतं. लिहीणारा कवी हा माणुसच असल्याने त्यानेही हा दिनमणी येताच विहीरीचेही भाग्यपंकज फुलल्याचा अनुभव घेतला असेल का? परत दुसरं मन म्हणत होतं, काहीतरीच काय? एवढा प्रकाश पसरल्यावर आणि उन तापायला लागल्यावर कोण लोळत पडेल? काही दिवस बदल्यांच्या, नवीन घरांच्या लावालावीत हा विषयही मनाच्या कोपऱ्यात पडून राहिला.

 

``ले’’ च्या पूर्वाभिमुख घराचा पुढचा भाग संपूर्ण काचेचा होता. रात्री जाड दुहेरी पडदे सरकवून बाहेरच्या थंडीला बाहेरच थोपवावे लागे. पण मी मी म्हणणाऱ्या उणे थंडीत चांदोबा गोलबकांग्रीच्या भव्य दिव्य हिमरांगेवरून डोकवायला लागला की पडद्याच्या फटींमधून आत येई. अपसूक जाग येई. पावलं कळत काचेच्या खिडकीकडे जात. चंद्रप्रकाशात निथळणारी गोलबकांग्रीची भव्य पर्वतरांग सजीव झाल्यासारखी चैतन्यमयी वाटे. आपल्या हृदयातील कमळं उमलतात का समोरच्या अचल हिमालयाच्याही हृदयात कमलदले उमलत असावीत? सूर्योदयासोबत विहीरीचं भाग्यपंकज उमलतांनाचा अनुभव कवीनी घेतला असेल तर येथे हिमावलीच्या सचेत होण्याचा अनुभव मी घेत होते.

बदलीसोबत येणाऱ्या नवीन घरात मी माझी जागा शोधत असते. खिडकी शेजारची. पलंगही खिडकीला लावून विशाल आकाश निरखत आकाशाची गम्मत पहात झोपायला मला आवडतं. एक दिवस प्रसन्न जाग आली. कमळ फुलल्यासारखी. डोळे उघडले तर पौर्णिमेचा चंद्र डोळ्यासमोर उभा होता. बराच वेळ अमृत बरसविणाऱ्या त्या चंद्राकडे बघत बघत कधी प्रसन्न शांत झोप लागली ते कळलच नाही. पुढचे दोन तीन दिवस चांदोबानी त्याच्या किरणांच्या स्पर्शानी उठवणं चालू केलं. किरणांना कर म्हणजे हात म्हणतात. आपल्या पूर्वजाचं कौतुक वाटलं. चांदोबाचे रुपेरी जादुई हात रोज कुठल्याशा कमळांना जागवत होते. मी जागी होत होते. प्रसन्न! हृदयकमल उमलल्यासारखी. आज मात्र ठरवलं चांदोबा येतो तिकडे पाय करून झोपू या. मग कसा उठवेल? रोज थोडा थोड उशीरा उगवणारा चांदोबा आता गोल गरगरीत राहता बारीक व्हायला लागला होता. पहाटेचे तीन वाजले असतील आणि-- प्रसन्न जाग!----कमळ उमललं!!--- मी उठले. पायावर चांदोबाचा रुपेरी कवडसा पडला होता. प्रकाशाची जाणीव फक्त डोळ्यांनाच होते असं वाटत होतं. तसं नाही. पायांनाही(पदकमल) चांदोबा कळला का? मग कमल-कळ्यांनाही डोळेच असायला पाहिजेत असे नाही. सर्वांगच डोळे होत. माहित नाही पण प्रसन्नतेची अनुभूती शांत पाण्यात उठणाऱ्या तरंगांसारखी हृदयातून शरीरात चोही दिशी पसरत होती. मन उचंबळून आलं. समुद्रालाच भरती येते असं नाही. माझ्याही मनात दिसणारा अदृश्य समुद्र भरतीनी तुडुंब भरला होता. तो अंबरमणी शांत, सौम्यपणे हसत होता. शरीरातील नलिनीवन उत्फुल्ल झाल्याचा प्रत्यय परत परत येत होता.

बदल्यांसोबत परत घर बदलण्याचा उपक्रम चालू राहिला. नवीन घरातून चांदोबा कधी डोकावतो ते माहित नव्हतं. पण एक दिवस चांदोबानी खिडकीतून हळूच त्याचे चंदेरी हात लावून प्रसन्न जाग आणली. कमळ उमललं. दुसऱ्या दिवशी मी खिडकीचा पडदा ओढून घेतला तर हा वेगळ्याच वेळेला तिसऱ्याच खिडकीतून त्याचे चंदेरी हात फिरवून गेला. सर्व कमळं उत्फुल्ल झाल्यासारखी तीच प्रसन्न जाग अनुभवत मी आकंठ चंद्रप्रकाश अनुभवला.

काही दिवस दक्षिणायन उत्तरायणाच्या नियमांनी चंद्राचा मार्ग बदलला. आता काही दिवस तो मला उठवणार नव्हता. मग ही कसली प्रसन्न जाग? मी घड्याळात डोकावले अजून साडेबाराच वाजतायएत. तास दिड तासच झाला झोपून. मग ही कमळ उमलल्याची प्रसन्न जाग? --- घरात सगळीकडे हिंडून प्रत्येक खिडकीतून चांदोबाचा शोध घेतला तर तोही नाही. जाऊ देत झोपू या. म्हणत उशीवर डोकं टेकवायला आणि नजरेसमोर टप्पोरा तारा सारखे रंग बदलत होता. लाल, केशरी, पिवळे, निळे त्याच्या प्रकाशाच्या भाषेत त्याचे इवले इवले ओठ हलवून अखंड बोलत होता. उशीवर डोक ठेऊन त्याच्याकडे बघत आमचा शब्देवीण संवादू चालू झाला. आवाज वाहून नेण्यासाठी माध्यम लागतं. शब्द आणि भाषा कुठल्याही माध्यमाविना एकमेकांपर्यंत पोचतात. काही दिवस तो इवलासा तारा त्याच्यावेळेला येऊन शरीरस्थ नलिनीवन फुलवत राहिला. आणि मी प्रसन्नतेचे तरंग अनुभवत राहिले. ही प्रसन्नता विकत मिळत नाही. ते खरं ऐश्वर्य! ती खरी कमलात विराजमान असलेली लक्ष्मी. ह्या साही कमलांच्या वर असलेल्या सहस्रदल कमलात विराजमान असलेली त्रिपुरांबिका! त्या कमलेचा एक सुंदर श्लोक खाली देते अर्थासह!

कमलासन कमलेक्षण कमलारिकरीट कमलभृद्वाहैः

नुतपदकमला कमला करधृतकमला करोतु मे कमलम् ।।

कमलासन म्हणजे कमलात बसलेला ब्रह्मदेव,

कमलेक्षण म्हणजे कमळाप्रमाणे सुंदर टपोरे नेत्र असलेला विष्णू,

कमलारि-किरीट अरि म्हणजे शत्रू सूर्यविकासी कमळांना मिटवणारा म्हणजे चंद्र तो ज्याच्या किरीटावर/मुकुटावर आहे असा शिव

कमलभृद्वाह ज्यांच्या हातात कमळ आहे असे सर्व देव हे जिच्या पदकमलावर नुत म्हणजे नतमस्तक आहेत अशी करधृतकमला म्हणजे हातात कमळे घेतलेली कमला म्हणजेच लक्ष्मी माझे (मे) कमलम् म्हणजे कल्याण करो.

लेखणी अरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment