Tuesday 11 October 2022

संक्रांतवेल

 

संक्रांतवेल

               शिशिराच्या  थंडगार शिरशिरीने अजूनही सारा निसर्ग गाढ झोपला आहे. निष्पर्ण उभा आहे. तरीही संक्रांतीचं स्वागत करण्यासाठी संक्रांतवेली सजल्या आहेत. सूर्याच्या स्वागताला दिमाखात उभ्या आहेत. मांडवावरून दिमाखात  खाली उतरणार्‍या त्यांच्या नाजुक नाजुक फांद्याही तजेलदार भगव्या, केशरी, नारिंगी रंगाच्या फुलांनी लगडल्या आहेत. त्यांचा रंग लांबवरूनही नजरेत भरतो आहे.  हवेच्या झुळकांवर त्यांच आंदोळणं मोठ मनमोहक आहे.

                 संक्रांतवेलीवर मोहित झालेला सूर्य देव नभात जरा जास्तच रेंगाळत आहे. तिच्या साठी त्याने आपली वाटही बदलली. दक्षिणपथ सोडून उत्तरपथावर प्रवास सुरू केला.

( वृत्त – भुजञ्गप्रयातम् )

शुभांगी सुमांगी किती कोमलांगी

लपेटून घे पुष्पवस्त्रास अंगी

सजे अप्सरा लेउनी एकरंगी

अलंकार हे पोवळ्याचे निजांगी

 

तिच्या तन्मणी, मेखला, पैंजणांसी

उषा रंग नारिंगि देई प्रसंगी

डुले घोस डौलात कानी तिच्या हे

प्रवाळाचिया लोंबत्या लोलकांचे

 

हवेच्याच झोक्यावरी हेलकावे

तिचे केशरी वस्त्र हे पोवळ्याचे

निसर्गास ना जाग आली अजूनी

तरी वल्लरी ही सजे गोड तन्वी

 

पुरा साजशृंगार झाला बघोनी

लता हर्षली गोजिरी अंतरंगी

बघे वाट उत्कंठतेने रवीची

कधी भेट होईल त्याची नि माझी

 

सुतेजे प्रफुल्लीत चैतन्यमूर्ती

दिसे व्योमनाथास संक्रांतवेली

बघोनीच लावण्य स्वर्गीय भारी

नभी रोज रेंगाळु लागे तमारी

 

करे स्नेह वर्षा सहस्रा करांनी

म्हणे काय वर्णू तुझी अंगकांती

निघे ना रवीचा नभातून पाय

हळू उत्तरेच्या पथा घेई सूर्य

 

-------------------------------------

#लेखणीअरुंधतीची


 

 

 

 

 

 


 

 

 

 

 

No comments:

Post a Comment