Sunday 30 October 2022

- वासुदेव बळवंत –

 

-    वासुदेव बळवंत

                 17 फेब्रुवारी. वासुदेव बळवंत ह्या आद्य क्रांतिकारकाचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस. 4 नोव्हेंबर 1845 ते 17 फेब्रुवारी 1883. जेमतेम 38 वर्षांचा आयुष्याचा कालखंड. जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभ्या राहणार्‍या ह्या आद्य क्रांतिकारकाला काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असतांना एडनच्या तुरंगात मृत्यू आला.

                1983 ते 1985 मधे रायगड जिल्ह्याला DSP म्हणून  प्रवीणची  नेमणूक असतांना कर्नाळ्याचा किल्ला पाहिला. तेथे 1818 पर्यंत वासुदेव बळवंतांचे आजोबा किल्लेदार होते. इंग्रजांशी निकराची झुंज देऊनही किल्ला पडला. वासुदेव बळवंतांचे जन्मग्राम शिरढोण तेथून जवळच आहे.  तेथे त्यांची स्मृती अजूनही जपली आहे. अलिबागला समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या घरातून मी तेथून न दिसणारं एडन पहायचा प्रयत्न करायचे -

अलिबाग नाम गावी सज्जात मी उभी ही

अंधारल्याच रात्री भय ना शिवे मनासी

 

नव्हतेच चांदणेही तरि जाग सागरासी

`चल मित्र तूच माझा' वदलेच मी तयासी

 

`बोलूच अंतरंगी जे साठले दिसांचे

जे सांगण्यास कुणिही नव्हतेच योग्यतेचे'

 

लाटाच सागराच्या फुटता तटी निनादे

गंभीर गाज कसली तिमिरास भेदुनी ये

 

अस्वस्थ का करे ही माझ्या मनास ऐसी

तो नाद का श्रुतीसी पुसतोच प्रश्न काही

 

अंगावरीच माझ्या रोमांच का उभे हे

सांगे मलाच भासे सिंधूचि दुःख अपुले

 

``तू ऐकतेस नेमे ध्वनि जो जळात वाहे

खळखळाट तो माझा ध्वनि दूरचाच तो ये

 

मी सांधतोच भूमी मी जोडतो किनारे

मी पूर्व पश्चिमेचे सांगतो एक नाते

 

तट जोचि भारताचा येमेनशी जुळाला

तेथेच एडनमधे कारागृहीच तिथल्या

 

अजुनी उठे ध्वनी तो खळखळा जीवघेणा

त्या साखळ्याच पायी बेड्या मणामणांच्या।

 

कंठात लोह बेडी जखडेचि घट्ट जीवा

वनराज तोचि छावा भय दावि इंग्रजांना

 

तो वासुदेव फडके बळवंत पुत्र ऐसा

मृत्यूहि घाबरे त्या होता असा दरारा

 

टोपीकरांस भीती त्याचीच फार वाटे

स्वातंत्र्य भारताचे मिळविण्या वीर झुंजे

 

उठविले भारतीया झालेच लोक जागे

संग्राम थोर केला स्वातंत्र्य लाभण्या ते

 

फितुरीच शाप आम्हा वाटेचि खेद भारी

हा! हा! घात झाला आलाच सिंह हाती

 

त्यासीच एडनमधे यातना दिल्या असह्य

तरिही वदे हसोनी देहास दुःख बाह्य

 

संबंध भावनांशी नाहीच यातनांचा

का अग्निदिव्य करण्या भय कांचना मनी त्या

 

 जळुनीच हीण जाते । अग्नीमधेच सारे

करुनीच अग्निदिव्या । उतरे खरेचि सोने

 

शिरढोण गाव त्याचे माहीत ना कुणाला

तो पुत्र ह्याच भूचा माहीत ना कृतघ्ना

 

स्पर्शून रोज येतो कारागृहास तिथल्या

चरणावरीच भूच्या नमवी सदैव माथा

 

बेड्याच खळखळा त्या तोडून मृत्यु गेला

तो नाद त्या ध्वनीचे अप्रूप ह्या जलाला

 

वाहून आणतो `तो' ध्वनि तोचि रोज येथे

लाटांसवेच माझ्या शिरढोण ग्राम ऐके ''

 

झाला तटस्थ सिंधु देऊन वादळासी

माझ्या मनात लाटा उठती अनंत वेगी

नयनांचिया किनारी फुटतीच आदळोनी

नेत्रा झुगारिते का भरतीच भावनांची

 

पुसुनीच नेत्र माझे क्षितिजापलीकडे मी

पाहून वंदन करी वीचींस थोर त्या मी

 

करुनी प्रणाम त्याची रत्नाकरास विनवी

कर काम एक माझे करु नको मला मनाई

 

नित जोडतो किनारे गुज पोचवी मनीचे

दाही दिशात घुमतो ध्वनि त्यास सांग वेगे ।

 

आहेच क्षुद्र जरि मी कोणी अरुंधती रे

``हे क्रांतिवीर सिंहा घे वचन तूचि माझे

 

स्वातंत्र्य भारताचे टिकविण्या लेखणी ही

चालेल नित्य माझी हे ध्येय एक चित्ती


--------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment