Friday 11 August 2023

पाऊस आणि ती -

 

पाऊस आणि ती -

दोन चार दिवस पाऊस लागून राहिलाए. हटायचं नावच घेत नाहीए . सकाळ नाही रात्र नाही, विश्रांती नाही. रप- रप -रप - रप ! घरात येणार्‍या ओलाव्याने कपडे वाळत नाहीएत. टेबलावर नुसता हात फिरवला तरी ओलसर धूळ बोटाला चिकटतीए. पाऊस आत येऊ नये म्हणून खिडक्या दरवाजे बंद बंद ठेऊन उगीचच उदास वाटत राहतं. बाहेर चिखलातही जावसं वाटत नाही. दरवेळी उगीचच `ती' डोळ्यासमोर उभी राहते. कोण कुठली माहित नाही. पण असा पाऊस लागून राहिला की मला `तिची' आठवण येते.

दिल्लीला रहायचो आम्ही. ट्रेन दिल्लीकडे धावत होती. मधेच पाऊस सुरू झाला. पावसामुळे सगळ्याच गाड्या सुरवंटासारख्या हळुहळु चालल्या होत्या. मधेच थांबत. सगळे गाफिल असतांना एकदम् - - `खड्क!' -- एक धक्का! एकमेकांवर कोलमडणारे उतारु. परत सुरवंट हळुहळु चालु. पावसाने बाहेर मात्र बहार आणली होती. सगळीकडे हिरवंगार! आतल्या बंद AC पेक्षा बाहेरची हवा मस्त गारेगार! शेवटी दरवाजात येऊन उभे राहिलो. पावसाच्या पडद्यातून हळु हळु  नजरेसमोरुन हलणारं समोरचं चित्र बघत उभे असतांना `ती' दिसली. कुठलच स्टेशन नव्हत. सुरवंटावरून पुढे पुढे जात असतांना डोळ्यासमोर साकारत असता असताच `ती' मागे मागे पडत गेली. रप रप पावसात झोपडीच्या दाराशी पायरीवर बसून, शांतपणे आभाळाकडे बघत बसलेली. तिच्या मोडक्या झोपडीवर कौलंही ठिकठिकाणाहून ढासळलेली. हिच्या झोपडीत केवढा पावसाचा कहर असेल. आत गळणार्‍या पाण्यासाठी बादल्या, तपेली, पेले काय काय मांडून ठेवलं असेल? पण ही अशी शांत बसलेली.

               वार्‍याबरोबर खिडक्या खिडक्यातून आत येणारा पाऊस माझी काय त्रेधा तिरपिट उडवतो. ओरडत असते नुस्ती मी, ``अरे ती खिडकी बंद करा नाहीतर गादी ओली होईल. अरे इथे  कॉम्प्युटरवर पाऊस येईल, अरेरे! सगळे वाळलेले कपडे ओले झाले.''

                           सगळं नीट आवरुन बसली असेल? का आवरण्यासारखं आत काहीच नसेल? का पावसाने भिजवायचं अजून काही शिल्लकच ठेवलं नसेल? पावसाशी बोलत असेल? का पाऊसच तिच्याशी हितगुज करत असेल? तिचं असं शांत बसण!

                       बेलारूसचा मित्र साशाने सांगितलेली चंगीझखानाची गोष्ट आठवली. चंगीजखानाच्या स्वारीत त्याच्या सैन्याने सर्व सामान्य माणासांचीही लूट केली. खानानं सैन्याला विचारलं, `` माणसं काय करताएत?'' ``ओक्साबोक्शी रडताएत खानसाहेब'' `` जा परत जा! त्यांच्या घरात अजून खूप संपत्ती दडलेली आहे. खणून काढा.'' सैन्यानी निर्ममपणे परत एकदा धाडी घातल्या. रं खणली. परत तेवढीच लूट जमा झाली. `` खरं आहे जहापनाह! लोकांकडे खूप काही दडवलेलं होतं.'' `` लोकं काय करताएत?'' ``छाती पिटून पिटून रडताएत जहापनाह!'' `` जा परत जा! नक्कीच अजून बरच काही आहे त्यांच्याकडे.'' सैन्याने घराघराची, माणसा माणासाची झडती घेतली. चंगीजखानाकडे आले. अजूनही थोडबहुत मिळालं खानसाहेब!'' `` वा! बहुत खूब! माणसं काय करताएत? '' ``कुणास ठाऊक पण रडणारे सगळे लोक अचानक हसताएत. नाचताएत. गाताएत. '' `` बहुत खूब! आता त्यांच्याकडे रडण्यासारखं काहीच राहिलं नाही.'' 

तशी शांत शांत बसली होती का ती? पाऊस काय म्हणत असेल तिला? - - पाऊस आणि ती -

 

माझ्या आगमनासाठी

होते सारे आतुरले

रित्या आभाळाकडे

होते सर्वांचे लागले डोळे

कळताच मला मी

सात समुद्र पार केले

किती महाल बंगले इमले

परी होते त्यांचे

बंद खिडक्या दरवाजे

दार दार वाजविले

खिडकीतून डोकाविले

साद घालून बोलाविले परी,

कोणी स्वागता ना आले

मला पाहून कोणी

मिटून घेतले डोळे

निपजतील तयांची

जन्मजात आंधळी बाळे

कितीकांनी भयाने

कोंडून स्वतःला घेतले

कसे जन्मावे त्या घरी

एखादे धिटुकले?

आंधळे पांगळे दुबळे

काय जगले काय मेले

माझ्यासाठी सारे

जन्मा आधीच मेले

हिंडतांना दिसली तुझी

झोपडी चंद्रमौळी

शांत बसलेली तू

लावून नजर आभाळी

माझ्या आगमनासाठी

सारे घर तू आवरीले

किति पातेली तपेली पेले

माझ्यासाठी तू मांडिले

वाजविन आनंदे त्यावर

वाजंत्र्या ताशे चौघडे

माप भरीन परीपूर्ण

तुझ्या घरात जीवनाने

आणिले तुला पांघराया

डोंगरमाथीचे वारे

रंगहीन भिंतींना सजवाया

मऊशार मखमाली शेवाळे

आज बघ माझ्या विश्वरुपाचे

अनेकविध सोहळे

जे आजवरी एकल्या

अर्जुनास दाखविले

कणाकणातून तृणातृणातून

रूप माझेच प्रकटले

बघ माझे हे रूप,

विक्राळ अन् कोवळे

सर्वाथाने ओले तरी

अलिप्त अन् कोरडे

किति जागविले हळुवार

बिजांकुरास त्या फुलविले

जलसमाधी देऊन किती

नांदत्या गावांना मी मिटविले

एका हाताने जीवन,

मरण दुसर्‍या हाताने वाटले

उघडे ठेउन तुझे डोळे

बघ पाउस कसा कोसळे

--------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

No comments:

Post a Comment