Friday 11 August 2023

थंडी

 

थंडी

गार गार वारं, झालं थंडीवरी स्वार

 निघे भन्नाट भरार, री सर्वत्र संचार

कसं बोचरं बोचरं, अंगी भरलं कापरं

होई दुनिया बेजार, करी दैना हो अपार

 

हे झोंबतां अंगाशी, करी जरा विचार

किती म्हातारं कोतारं, थंड झाले व्यवहार

कुणि शेकोटी शेकता, लाल फुलवि अंगार

शिवारावर हिरव्या, पसरे दवाची चादर

 

कसं सोडु घरदार, पक्षी पोचले की दूर

झडला पिसाराचि सारा, नाच विसरला मोर

सोफ्यावर गाढ झोपे, मनीमाऊच वेटोळ

उबदार जागी दिसे, कुत्र्याचं मुटकुळ

 

ढी शेपटाची दुलई, खारुताई अंगावर

मंद कुंदाचा सुवास, दरवळे दूरवर

उंबर सुखावला, लाल फळे अंगभर

जनीचा विठु उभा, घे बाळे कडेखांद्यावर

 

 

झुलताती फांद्यावर, बघ बोरांची झुंबरं

वारा मारीतो टपला, पाडी खाली सारी बोरं

बोरं पसरली सभोवार, पाहून नाचती की पोरं

एकएक उष्टावता, झाली दुपार दुपार

 

 

थंडगार वारं आता, चढली त्याला धार

येई वाटेमधे त्याला, सपासप मार

झाडांना झोडपून, उडविला पानांचा संभार

झाडं उभी ओकीबोकी, जणु हरविले रंगसूर

 

उडे पाचोळा पाचोळा, वार्‍यावर गरागर

वारा थाबता जरासा, राही ढिगारं ढिगारं

पाचोळ्यावर चालता, वाजतो कुरकुर

सांगे आज आणि काल या -

 जमिन अस्मान अंतर!

 

सोसाट्याने घोंगावित, येता काळाची वावटळ

उंच बैसला आकाशी, तरी मातीला मिळणं अटळ

झाडं निश्चल समाधिस्त, जणु योगी मुनीवर

झाडिला पानपान अहंकार, तेंव्हा चित्त झाले स्थिर!

-------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

No comments:

Post a Comment