ढगाची चित्रकला -
ढग्गोब्बांनी काळ्या कुळ्या, ओढल्या चार रेषा
आणि काढल्या सूर्यालाही, झुपकेदार मिशा
चंद्रालाही काळेकुरळे, काढले छान केस
बदलून टाकला त्याचा तो, पांढराशुभ्र वेश
पुसून टाकी चांदण्यांना, फिरवून काळा कुंचला
एका जागीच पळ म्हणे, गबदुल चांदोबाला
निळ्यानिळ्या आभाळावर ,काढले काय काय प्राणी
लवकर लवकर ओळखा म्हणे, पुसेन पुढच्या क्षणी
गुलाबी गुलाबी राजवाडे, त्यांना सोनेरी किनार
बर्फासारखे पांढरे शुभ्र , चितारले चार मिनार
चित्रनगरी चितारली ही, काय तिचा थाट
सांगा त्यातून कोठे जाते, म्हणे पाऊलवाट
------------------------------------------
#लेखणीअरुंधतीची –
No comments:
Post a Comment