माऊ
एक माऊ मऊ मऊ
पायात पायात येऊ येऊ
म्हणे उचलून नको घेऊ
दे लवकर मला खाऊ
श्रावणाचा माझा वसा
खाईन उंदीर नाहीतर मासा
उपवास ठेवीन तोवर खासा
नाहीतर लावीन अस्सा धोशा
चहासोबत चालेल चकली
कुरकुरीत मात्र पाहिजे चांगली
नाहीतर चालेल शेव इवली
तोंड हलवायला मधुन बरी
ग्रीन
टी तूच घे
मला आपलं दूध दे
फ्रिजमधलं नक्को बाई
थोडं कोमट मला पाहिजे.
जेवणानंतर वामकुक्षी
मला लागते सावरीची उशी
उबदार गादी आबदार पांघरूण
मग येते झोप कशी
कधी तुझ्या कुशीत झोपीन
नाही तर उन्हात मस्त शेकीन
चाटून पुसून साफ करीन
कायम मी स्वच्छ राहीन
पाहिजे तेंव्हा येईन आत
बाहेर जाईन येता मनात
विचारायची नस्से बात
म्यॅव केलं की घ्यायचं आत
बाळं ठेऊन जेंव्हा घरात
फिरून येईन बाजारात
काळजी घ्यायची त्याची छान
नियम ऐकून ठेव सात
माऊ बोलली मोठ्या ऐटित
तोर्यामध्ये शेपुट हलवीत
मी म्हटलं बरं बाई
राहीन मी तुझ्या दिमतीत
तेंव्हा पासून मैत्री खाशी
ती मालकीण मी दासी
कौतुकाने तरीही तीसी
मी म्हणते मनीमावशी
------------------------------
#लेखणीअरुंधतीची -
No comments:
Post a Comment