Thursday, 10 August 2023

पृथ्वी

 

पृथ्वी

खेळत असता पडतो मीची; किती मला खरचटे

ठणका लागुन रडतो मी गे; पृथ्वी का नच रडे

घरंगळतचि जाते पृथ्वी, परी न पडते कुठे

आई तिजला सांग कसे गं खरचटते ना कुठे?

 

पळता पळता दूध पितांना हमखासचि सांडते

एका जागी बसून पी रे!” म्हणुन तू दटावते

काठोकाठचि समुद्र भरला, त्यास घेऊनी कडे

गिरक्या घेते तरि न सांडते पाणी थेंबचि कुठे?

 

डोळे बांधुन पकडापकडी खेळ खेळता कसे

भींतीवरती धडकुन मजला टेंगुळ माथी सुजे

डोळे नसुनी पृथ्वीला या कसे बरे दिसतसे?

दाटीने या किती तारका धडकत नाही कसे?

---------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

No comments:

Post a Comment