Thursday, 10 August 2023

चोर

 

चोर

सुट्टीत गावाकडे आजोळी गेलं की मज्जाच मज्जा असायची. अंगण, पडवी, ओटी माजघर, कौलं, पन्हाळी, झोपाळा, माळा, कोनाडे, खुंट्या, चूल, फुंकणी, गाय, गोठा, घागर डोण, विहीर, रहाट -- - - - अशा आज लुप्त झालेल्या अगणित शब्दांचा परिचय तिथे व्हायचा. रात्री मामा, आजोबा, आजी इत्यादि मंडळींकडून ---- भानाभूत इत्यादि  जाम रहस्यमय गोष्टी वरवर शूरपणे पण लटलटणार्‍या काळजाने डोळे ताणून ऐकतांना राम राम राम म्हणत झोपेच्या आधीन व्हावे लागे. रात्री कुणाला जाग आली तर काही खैर नसे.

माझ्या बालमित्रांसाठी अशीच खरीखुरी गमतीदार कहाणी --

 

रात्र होती मध्यावर

झोप होती डोळ्यावर

बंद होते सारे दिवे

झोपेमध्ये सारं घर

 

एक बोका बिलंदर

गलेलठ्ठ कलंदर

हळुच शिरला घरामध्ये

हिर्वे डोळे करडा रंग

 

अंधारात डोळे त्याचे

पाचुंसारखे चमचमत

अधांतरी फिरत होते

तेजोगोल लखलखत

 

अँटेनाच शेपटीचा

उभा होता ताठ वर

वाघोबाचा मामा सख्खा

तोरा त्याचा सर्वांवर

 

आवाजाचा घेत वेध

मनी तो अति सावध

सामसुम घरामधे

दबेपाव होता चालत

 

चाल त्याची कुर्रेबाज

बा आदब बेमिसाल

टिपत होता कानांनी

आवाजाची इवली खबर

 

घेत कानोसा घरभर

हिंडे बोका सारं घर

ढाराढूर झोपेमधे

सारे होते बेखबर

 

चढला तो ओट्यावर

दुधाच्याच मागावर

दिसले त्याला चंबु मधे

दुध होते खुलभर

 

पोटामधे भूक कोण

चंबुमधे घाली तोंड

पाणी सुटले तोंडाला

ताव मारी दुधावर

 

दूध घेता सारे चाटुन

सावकाशपणे मिशांवर

जीभ फिरता कळे त्या

चंबु घट्ट डोक्यावर

 

भयाची थंड लहर

सरसरत गेली अंगभर

भीतीने तो शहारला

कापु लागे भयंकर

 

दाये बाये खालीवर

हाले डोके गरागर

नजर बुडे अंधारी

चंबु घट्ट डोक्यावर

 

ये कापे थरथर

मागे मागे सर सर

ओट्यावरुन पडे खाली

बोका धपकन् भुईवर

 

आपटलाच की डोक्यावर

आपटे चंबु भुईवर

झाला आवाज चंबुचा

ठण् ठणाठण् घरभर

 

धडकी भरली भयंकर

धावत सुटला घरभर

वरखाली खालीवर

घेऊन चंबु डोक्यावर

 

धाड धुडधुम धम्

टांग धिडधांग टिच्

टिडिंग फाट् फचाक्

गडांग धाड धांग

 

आवाजाने दणाणले घर

उठून बसले सारेजण

ओरडाआरडा चोर चोर

दिवे लावति भराभर

 

गोळा झाले सारे लोक

लाठ्या काठ्या हाती फोक

बघतात तो समोर -- -!

हा हा हा हा! हा!

हासु फुटले ओठांवर

 

एक बोका बिलंदर

गलेलठ्ठ कलंदर

चंबु घट्ट तोंडावर

पळत होता घरभर

 

बोका होता गुरगुरत

भीतीने थरथरत

फेंदारलेली होती शेपुट

पळत होता धडपडत

 

असा चोर बिलंदर

गलेलठ्ठ कलंदर

पकडला त्याला मुश्किलिने

पाठलाग करून तासभर

 

कसाबसा काढला चंबू

अडकलेला तोंडावर

दिसता लोक सभोवार

धूम ठोके कलंदर

बोका घेई उडी थेट

खिडकीतून कौलावर

घर सारे हासत होते

गोष्टी सांगत रात्रभर

--------------------

#लेखणीअरुंधतीची -

No comments:

Post a Comment