स्वप्ने
मूल वर्षाचं झालं की आपोआप चालायचा प्रयत्न करतच आणि थोड्या दिवसात छान चालायला लागत. ते ते वय त्या त्या गोष्टी करायची प्रेरणा देत राहतं. आज्जी झाल्यावर गोष्टी रंगवून सांगायला कोणी शिकवायला लागत नाही. त्या आतूनच येतात. मग कधी कविताही तयार होतात चिल्यापिल्यांसाठी. त्यासाठी शब्द सापडवायला लागत नाही. वृत्त शोधायला लागत नाही. अपसुक गवतफुल फुलल्यासारख्या मनात फुलतात. कुठेही केंव्हाही. एखाद्या लहानग्याने दोन मिनटं त्या इलुशा दिसणार्या गवत फुलाशेजारी बसून वाकून पाहता पाहता त्याचा गवतावर तोल जाऊन कोलांटी मारली जावी इतकी छोटीशी अपेक्षा त्या गवतफुलाची असते. तशीच ह्या कवितेचीही!
स्वप्नांची
एक असते गम्मत । पहायला
ना पडते किम्मत
जागेपणी जे नाहीच जमत । स्वप्नी
घडते ते बिनदिक्कत
नियम कोणतेच येथे नसती । उल्टापाल्टा
घटनाक्रमही
वेडा ठरे भलताच शहाणा । शहाणा फिरतो दीनवाणा
भिकारी म्हणतो टेचात हाय ! कुबेर म्हणतो पोटाला नाय्!
रंभा बनविते मसाला चाय । भणंग पीतो पसरून पाय
स्वप्न-संगती आणते रंगत । निद्रा
नाही तरिही भंगत
गादीवरती झोपून खुशाल । तुडवत फिरतो काट्याकुट्यात
स्वप्ने विवरात नेतात खोल । गोल जिन्यावर
सावरत तोल
वेगात नेती कधी खालती । पडलो पडलो वाटे भीती
अरुंद कड्यावर
नेतात उंच । डोळे फिरताच्
मिटतो गच्च
तरीही पुढती गणिताचे
सर । सांग म्हणतात
तेवीस सक्क
फिरून येता समुद्रावरती
। कुड कुड कुड कुड वाजे थंडी
आई ओरडे जागे करुनी । गधड्या
केली ओली चड्डी
-----------------------------------------------------------
#लेखणीअरुंधतीची-
No comments:
Post a Comment