Wednesday 23 November 2022

खुंटाळे

 

खुंटाळे

           जुनी घरं गेली आणि त्यांच्या सोबत कोनाडे, खुंट्या, फडताळं हेही गेले. पण त्यांची उपयुक्तता संपली नाही, मग ते वेगळ्या स्वरूपात आपल्या घरात आले इतकच. काही खुंट्या मात्र जशाच्या तशा आहेत. आजही--- अजुनही!

 

देहाच्या ह्या खुंटाळ्यावर, अगणित खुंट्या ठेवी यदुवर

कृष्ण विभूती जैशा अगणित, तैशा खुंट्या सर्व तनूवर

 

काही लवचिक काही खंद्या, जणु कायेला फुटल्या फांद्या

काही छोट्या काही मोठ्या, नाजुक वा मजबूत रांगड्या

 

डोक्याहुन ना दुजी कुठेही, टोपीसाठी सुयोग्य खुंटी

परी तयाचे कसे इलॅस्टिक!, अडकविण्यासी हवी हनुवटी

 

भलेचि मोठे असले पोते, पाठीवरती सहज बैसते

करे लेकरू घोडा घोडा, पाठखुंटि ही सहजचि पेले

 

महिरापीच्या कानखुंटिवर, शिंप्याची ती बसते पेन्सिल

मानखुंटिवर टेप विराजे, कात्री राहे हातखुंटिवर

 

कधी स्थिरावे चष्मा उमदा, कानखुंटिला घेऊन वळसा

चाफेकळि त्या नाकखुंटिवर, हळुच बैसतो दावुन तोरा

 

दोन्ही खुंट्यावर कानाच्या, अडकविला तो मास्क मुजोरा

एका खुंटीवर कानाच्या, इअर फोनचा अजुनी मारा

 

असोचि नाजुक पर्स साजिरी, झोळी, शबनम अथवा पिशवी

खांद्यासम ना मिळेचि खुंटी, आरामातचि चाला तुम्ही

 

कोपर्‍यात वा हात वाकवा, दुसरी खुंटी तयार होई

पदर भरजरी, शाल पश्मिना, मिरवायाला पर्स पुढे ती

 

माल किराणा अथवा भाजी, पिशव्या असल्या जड दोन्हीही

बोटे वळती होती खुंट्या, सहज उचलती दोन्ही पिशव्या

 

छल्ला वा मेखला मिरविण्या, कमरखुंटि ये उपयोगाला

बटवा चंची खोचायाला जुडगा किल्ल्यांचा वा मोठा

 

खुंट्यांवरती अगणित अडगळ, साचत राही नवी नविनतम

परीच सारे वदति वेडगळ, देह भूषणे ही तर उत्तम

 

देहावरती इतुक्या खुंट्या, माणसास का पुरे न झाल्या

उघडुन बघता देह कवाडा, आत असे अदृश्य खुंटिका

 

मनाचिया ह्या खुंटीवरती, कितीक ओझी अजुन लोंबती

अपमानांचे कसले कुठले, दुःखाचे वा जड गाठोडे

 

दुःख निराशा अजुन बोचके, मनखुंटिवर मी अडकविले

कृत्य कधी वा केले खोटे, मन खुंटीवर टांगुन राहे

 

देह वाकला जरि ओझ्याने, चिंतारूपी नवेच ओझे

डगडग हाले खुंटि तरिही , मनखुंटीवर टांगुन घेते

 

खुंटा बळकट नाही बघुनी । सोडून जातो मोद एकटा

वार्‍यावरती घेतचि झोके , मुक्तपणे दे सोडुन मजला!

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची.

 

No comments:

Post a Comment