Thursday 24 November 2022

नाते -

 

नाते -

 

``तुला राहुल देशपांडे आवडतो का शंकर महादेवन्?'' असं मला कोणी विचारल तर कुठलाही विचार करता विनाविलंब मी सांगेन, ``राहुल देशपांडे!'' म्हणजे --- दोघांच्या गाण्याविषयी तर काही बोलायलाच नको. दोघांचंही गाण्याच्या क्षेत्रातलं स्थान अढळ आहे. दोघांचही गाणं मला सारखच आवडतं. पण राहूल देशपांडे आवडायला एक खास कारण आहे. ते ऐकल्यावर तुम्हीही  ते मान्य कराल.

म्हणजे काय! माझ्या सासूबाईंच्या आईच्या अनेक बहिणीं किंवा चुलत बहिणींपैकी एक बहिण बयोबाई. बयोबाई पाग्यांकडे दिली. पागे हे पोलीस सेवेत होते.  ह्या पाग्यांची एक मुलगी वसंतराव देशपांड्यांना दिली. त्यांचा हा नातू! (मधल्या स्टेप्स मधे अजून काही असेल तर आठवत नाही.) असं एकंदर आमचं ``अगदी जवळचं घट्ट’’ नातं आहे. अर्थात हे राहुलला कोणी सांगितलं नसावं नाहीतर राहवून तो माझ्याकडे नक्की भेटायला बिटायला आला असता आणि मीही त्याला प्रेमाने साजुक तुपाचा शिरा करून खाऊ घातला असता. आणि किती छान गातोस रे वगैरे वगैरे म्हणून त्याची पाठ थोपटली असती. असो! पण अशी गप्पांमधून सांगितली गेलेली आमची अनेक नाती काही कोकणात काही देशावर, काही परदेशात तर काही भारतभर पसरलेली आहेत. त्यामुळे कोणी त्या गावी जाणार आहे म्हटलं की मला त्या unseen पण जवळच्या नातलगाची आठवण येते. परवाला कोणी तरी न्यूझिलंडला राहतो म्हटल्यावर मी माझ्या बहिणीच्या शेजारी राहणार्‍यांच्या मुलाची नात तिकडे असते असं सांगितल्यावर चक्क त्यांची ओळखही निघाली.

बदल्यांच्या ह्या नोकरीमधे बदली होणार्‍या ठिकठिकाणच्या गावांना असे आपले खूप जवळचे पण  कधी भेटलेले नातेवाईक शोधून त्यांना भेटल्यावर होणारा आनंद किती अवर्णनीय असतो हे कसे सांगावे? परवालाही अशाच एका नातेवाईकांना मी माझं लग्न झाल्यावर पहिल्यांदाच भेटले तर प्रवीण पंचेचाळीस वर्षांनी. त्यांना, त्यांच्या मुलीला जावयाला भेटून दोन्ही बाजूंना खूप खूप आनंद झाला. Blood is thicker than water! --- मनात आलं,

 

नाते

14: 14: 14: 14

अलवार शब्द तो नाते जणु विरजण घट्ट दह्याचे

बहु पातळ पातळ माया होतेच दाट नात्याने

 

नात्याचे म्हणता येतो किति गहिवर ओलावा तो

असु देच दूर देशीचा नित अपुला अपुला गमतो

 

नसु देत पाहिले त्यासी नसु देत बोललो काही

परि एक तंतु नात्याचा बांधून ठेवतो त्यासी

 

तो अमुक अमुक तो माझा राहतोच गावी कुठल्या

सांगतेच मी प्रेमाने उल्लेख गावचा येता

 

नात्याची रेशमी वीण इतिहास कुळांचा विणते

प्रत्येकचि ताणा बाणा एकेक गोष्ट ती कथिते

 

कुणि सांगे आजी विषयी कुणि दादाजींच्या गोष्टी

कुणि बोले पणजी विषयी शिस्तीच्या चुलत्याविषयी

 

कुणि सांगे कुळ पुरुषाचे युद्धात पराक्रम मोठे

वा त्याच्याच स्वामिनीचे सौंदर्य धैर्य वाखाणे

 

नाती ती विणुनी सारी भरजरी वस्त्र ते होई

मी पोत पाहते त्याचा अन् देखणा रंग अंजिरी

 

नातीच जोडुनी सारी तो वंशवृक्ष साकारे

तो वृक्ष सघन मी बघते नात्यांची सांधुन पाने  

-------------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

No comments:

Post a Comment