Thursday 24 November 2022

काव्यबीज

 

काव्यबीज

              एखादा गद्य लेख लिहीण्यापूर्वी मनात काही आराखडा ठरवता  येतो. पण कित्येकवेळेला कवितेचं तसं होत नाही. सावरीच्या तंतुमय, हवेवर हेलकावे घेत येणार्‍या बीजाप्रमाणे कुठुनतरी आकाशातून तरंगत एखादी ओळ मनात येऊन बसते. रुजते. शब्दांची पालवी फुटावी तशा त्याभोवती ओळींमागून ओळी जमत जातात. त्या झाडानी कसं बहरावं? कसा आकार घ्यावा हे काहीच ना ठरवलेलं असतं ना इच्छेप्रमाणे घडत असत. कविता तयार झाली की आपलआल्याला आश्चर्य वाटायला लागतं. ती कविता आपल्या मनाच्या अंगणात उभी असते. मग अशा कवितेवर  ही मी लिहीली हे सांगतांना लेखणीही थबकते.

 

``तो’’ वेताळ विक्रमादित्याला म्हणतो, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकलं होऊन तुझ्याच पायावर लोळायला लागतील त्या प्रमाणे, मनातील कविता लिहीणार नाही म्हटलं तर तसच काहीसं होतं.

-------------------------

 

 यावेच तरंगत  बीज हवेवर कसे

हलके हलके झुलत डुलत अन 

वार्‍यावरुनी जसे      

 

अज्ञात अनामिक गगनातुन ह्या तसे

कसे उतरते अलगद अवचित

बीज काव्यपङ्क्तिचे

 

  कोणत्या झुल्यावर बसुन अनामिक कसे

 विहरत येते मनात नकळत

जणु हिमचि भुरभुरते

 

 हा तरू कोणता मला न काही कळे

ज्याचे येते बीज तरंगत

 रुजण्या चित्ती असे

 

हे मनी बैसते रुजते फोफावते

शब्दपर्ण हे त्यावर अगणित

अंकुरताती नवे

 

न बीज पेरिले न तरु लावला मी गे

काव्य-फुलांनी अविरत बहरत

कैसा मज ना कळे

 

अंगणी मनाच्या जेंव्हा मी पाहते

वेडावुन मी आश्चर्याने

बघत उभी राहते

 

काहीच मालकी त्यावर मम ना असे

कळते मजला तरू लाविला

देवाजीने इथे

 

ह्या देवदारुवर मुद्रा ना मम रुचे

म्हणुन लिहीते अरुंधतीची

फक्त लेखणी असे

-------------------------

लेखणी अरुंधतीची -


 

 

No comments:

Post a Comment