Wednesday 23 November 2022

माणिकमोहर (गुलमोहर) /गंध पाकळी

 

माणिकमोहर (गुलमोहर) /गंध पाकळी

8; 8; 8; 3

 तरुवर सुंदर उभा राहिला लेऊन वसने लाल

भरजरि वस्त्रे अनुपम त्याची काय ऐट तो डौल

 

पाचूची पानडी तयावर माणिक पुष्पे लाल

माणिक पाचू रत्न-सरींसी झुलवीत अंगावर

 

वार्‍यावरती हेलकावते लक्ष्मी तीच गजान्त

पायापाशी अंथरलासे गालिचाच आरक्त

 

एक पाकळी परी वेगळी सुमनांच्या झेल्यात

वेधुन घेते चित्तचि माझे मन करे आकर्षित

 

दूरवरुनही रेशिम बुट्टे दिसती हेची खास

लाल शालुवर साज चढवती नाही उपमा त्यास

 

उचलुन घेते फूल कौतुके निरखुन पाही त्यास

धूसर झाली तोच पाकळी नयन पाहती काय?

 

टिळा चंदनी विठू कपाळी दिसू लागला त्यात

रंग रूप आकार तोच तो मज दिसे पाकळीत

 

गंध पाकळी विठू कपाळी तरू कपाळी कशी

लावुन जाई विठूमाऊली फुलाफुलांवर कधी?

---------------------------------------------

No comments:

Post a Comment