माठ
एप्रिल -
मे पुढे पुढे सरकायला लागले
की उन्हाळ्याची तीव्रताही वाढत जाते. उन्हाळ्यात जीवाला
सुखकारक होण्यासाठी घरोघरी फ्रिज आहेतच.
लहानपणी मात्र
उन्हातून आलेल्या कोणाचेही स्वागत करायला माठातील थंड पाण्याने भरलेलं
तांब्याभांडं समोर ठेवलं जाई. आणि आहाहा!
वाळा, मोगरा ह्यांच्या सुगंधाने अमृततुल्य
झालेलं पाणी दोन घोट घशाखाली जाताच सगळा शीण नाहिसा करी. हा
माठही असा तसा नाही, बाळगोपाळांसोबत उत्साहाने घरी येई.
नव्हता A.C. नव्हता पंखा
फ्रिजही नव्हता घरीच जेंव्हा
उणीव भासत नव्हती तेंव्हा
जीव सुखावर लोळत होता
छोट्या छोट्या गोष्टींचेही
होते अप्रुप मोठे तेंव्हा
गृहीत होती दुःखे सारी
भिजवुन टाकी सुख शिडकावा
--------------------- बालपणाचा काळ सुखाचा
तेंव्हा सगळ्या गोष्टींची सांगड देवाशी घातलेली असे. प्रत्येक गोष्टीचा दोर देवाशी बांधलेला असे. चुलीवर उकळत्या पाण्यात तांदुळ धुवून शिजायला टाकायचे तरी त्यातील दोन तिन दाणे चुलीला ओवाळुन मग आई भात टाके. घरात गॅस आला तरी परंपरा टिकून राहिली. पोळ्या बनवितांनाही पहिली इवलीशी चांदकी अग्नीला, दुसरी गाईला मग आपल्याला. आंब्याच्या पेटीतला सर्वात मोठा, चांगला आंबा पहिल्यांदा देवापुढे विराजमान झाला की मग तो खाण्याची मुभा असे. आम्हाला शिंग फुटल्यावर आम्ही ह्या प्रत्येक `रिचुअलचा' नसलेल्या ज्ञानाच्या निकषावर घासून समाचार घेत असू. तरीही ना वडिलांनी त्यांच्या वागण्यात बदल केला ना आईने. सारे पदार्थ आपली ठराविक वेळ आली की मगच घरात येत. छोट्याशा गोष्टीच्या आगमनाचाही उत्सव असायचा. त्यामुळेच घरात सतत उत्साह असायचा. तेंव्हा ही गोष्ट कळलीच नाही.
प्रत्येक गोष्टीचा देवाशी बांधलेला दोर आपण तोडून टाकला. आणि आपण एकटे पडलो असं मला उगीचच वाटत. केंव्हाही बाजारात जा हवी ती वस्तु आणा आणि वापरा. उत्सव आणि उत्साह दोन्ही सुकून गेले. आपल्या प्रत्येक गोष्टीत भाग घेणारा देवबाप्पा आपण धुडकारुन दिला आणि `परस्परं भावयन्तः' म्हणजे एकामुळे दुसर्याला अस्तित्त्व आहे, मान आहे अशा प्रत्येक गोष्टीत त्याचं अस्तित्त्व मान्य करायला लावणार्या देवाची साथ सोडल्यामुळे आपणही दोर तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन गोते खायला लागलो.
एक छोटीशी गोष्ट आठवली. अक्षयतृतीयेच्या
आधी 2-4 दिवस आमच्या घरी नवीन माठ यायचा. माळ्यावर जुना माठ शिल्लक असेल तर तोही अक्षय तृतियेच्या
मुहुर्तावरच खाली उतरे. नवीन माठ
(त्या दिवशी त्याला केळी करा म्हणत.) आणि खरबुज देवापुढे ठेऊन ब्राह्मणाला दान देऊन मगच माठ वापरायला सुरवात होई.
तेंव्हाच कलिंगड खरबुजांना घराचा दरवाजा उघडला जाई. बाजारातून नवा माठ आणायचा तो हृद्य सोहळा आठवला आणि मला थेट भूतकाळात घेऊन गेला
-
माठ -
वैशाखाचा वणवा भीषण
ऊन कडाका भवती रणरण
जल्लोशातच तेंव्हा होई
माठाचे ते घरी आगमन
डोक्यावरती धरे सावली
कल्पवल्लिसम वाटे छत्री
वडिलांचे मग बोट पकडुनी
निघे बाळ-गोपाळ मंडळी
तुडवित कुठल्या गल्ल्या बोळी
गवसे कुंभाराची आळी
मातीची ती दुनिया सगळी
पाहुन हरखे बाळ-मंडळी
सुगडी, पणत्या, खापर, भगुले
घडे लाल अन काळे रचले
लहान मोठे सुबक चांगले
एकावरती एक खुबीने
त्यावर नाणे वाजवि खणखण
नाही कच्चा सांगे ठासुन
भट्टीमध्ये पक्का भाजुन
खरपुस आहे घडा घडा मम
धरुनी सूर्यासमोर सांगे
प्रकाश किरणहि नच या भेदे
गळका नाही घडा एकही
पाणी ओतुन त्यात दाखवी
लाल हवा का खरपुस काळा
खल या विषयी चाले मोठा
घडे दोन मग येती घरला
एकचि देवा एकचि आम्हा
अथवा माळ्यावरुनी येई
गतवर्षीचा घडा खालती
गतवर्षी जरी असे वाचला
चेंडु लगोरी यांच्या मधुनी
ऊन देउनी त्यास चांगले
घासुन त्यासी मग काथ्याने
धुवुनी भरुनी मग पाण्याने
तिवईवरती घडा विराजे
जळी तयाच्या जुडी तरंगे
वाळ्याचा जी सुगंध सांगे
फुले मोगरी परिमल लाभे
सलील नच ते अमृत वाटे
माठावरचे खापर झाकण
लिंबांचीही करीच राखण
माठाखाली बसे कलिंगड
वा द्राक्षांचे मोठे ते घड
तुंदिल तनुचे माठ शेठ हे
निवांत बसती सज्जामध्ये
कोपे जितुका नभि नारायण
तितुका हाची शांतिपरायण
प्रखर दाह तो झणि स्वीकारुन
द्यावे जगता नित संजीवन
वसा घेतला हा आजीवन
घटासारखा केवळ सज्जन
---------------------------------------
लेखणी
अरुंधतीची -
No comments:
Post a Comment