Thursday 24 November 2022

तामण/ जारूळ

 

तामण/ जारूळ

जारूळ किंवा तामण म्हणजे महाराष्ट्र राज्याचं खास फूल! महाराष्ट्रभूषण! एप्रिलमधे फुलते म्हणून एप्रिलफूल नावाने ओळखलं जाणारं! महाराष्ट्राच्या दगडधोंड्यांच्या बरड भूमीत एप्रिलच्या रणरणत्या उन्हात जांभळ्या, लाल, गुलाबी आणि क्वचित पिवळ्या नाजुक पोताच्या पाकळ्यांच्या फुलांचे भरगच्च तुरे तामणच्या झाडाला सजवायला लागतात. हे भरगच्च तुरे कधी कधी कुल्फी किंवा ऐस्प्रुटच्या कांडीसारखेही वाटतात तर कधी गारगोटीच्या दगडाच्या पोटात चमकणार्‍या अमॅथिस्टच्या जांभळ्या, गुलाबी पांढर्‍या बिलोरी स्फटिकांसारखे.  तापणारा सूर्य जणु त्यांची कठोर परीक्षा घेत असतो. अडिच तीन महिने उन्हात तापूनही अंगभर फुलणार्‍या झाडावर जूनचा कृपामेघ बरसतो. आणि उन्हात हसणारी झाडं पावसात नाचू लागतात.  यथावकाश पुष्प घोसांचं रूपांतर हिरव्या बोरांएवढ्या मोत्यांच्या घोसात होते आणि जून जुलै अखेर तामणवर हे हिरवे मोत्याचे घोस लोंबायला लागतात. राहून गेलेले चुकार दोन चार तुरे मी मी करत बोटं उंचावत मीच महाराष्ट्र पुष्प म्हणून पुढचे अनेक महिने ओळख सांगत राहतात.

वसंतऋतु आला की निसर्गाच्या रंगमंचावर ऐश्वर्याची जणु महासभाच भरते. एक एक तरु आपल्या विलक्षण सौंदर्य, लावण्य, डौल, ऐश्वर्याची शेखी मिरवत हजेरी लावू लागतात.

 

हो ऐश्वर्याच्या । महासभेचे । दिमाखात उद्घाटन

शुभ-मुहूर्त पाहुन । घरंदाज तरु । विराजमान ऐटीत

नवरंग-रत्न-सर । देहांवरती  । सुकान्तिमान झळकती

बहु रत्न, पोवळी, । माणिक, पाचू । पुष्कराज अन मोती ।। ----1

 

गालिचे फुलांचे । चरणाखाली । अंथरले बहु भारी

कमनीय तनूंचे । तरुवर सुंदर । आरास असे न्यारी 

ह्या अगणित अगणित । रंगछटांनी । महासभा ही विलसे

सुमनांच्या माना । हलवित हलवित । डोलतीच तरु सारे ।।----2

 

त्या सुंदर सुंदर। तरुंमधे मज । दिसला तामण तरु गे

तो मनमोहकसा । उभा असे हो । वैभव दावित त्याचे

भरघोस घोस हे । गच्च लगडले । ``तामण’’वर पुष्पांचे

 लाल गुलाबी अन । धवल जांभळे । स्फटिकांचे हे झेले ।।----3

 

अंगांगातुन । अनंग प्रकटे । पुष्पबाण की सजले

व्वा! महाराष्ट्र-भू-भूषण तामण । चित्त हरे सर्वांचे

 वेधूनचि घेती । प्रेक्षक नजरा । त्याच्या ऐश्वर्यानी

दे मानवंदना । अरुंधती ही । काव्यांजली अर्पुनी ।।----4

 

तपत्या तपनाच्या । तापातुनही । फुलणे कोमल कैसे

परिमाण असे हे । ऐश्वर्याचे । तरुवर सांगे मज गे

तापणे असे हो । गुणधर्मचि त्या । सवित्याला दिधलेला.

फुलणेच मनोहर । धर्म असे मम । सुख द्याया जगताला ----5

---------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

No comments:

Post a Comment