Thursday 24 November 2022

ताड वृक्ष / तालतरु

 

 ताड वृक्ष / तालतरु

ताड माड इत्यादि एका खांबांवर प्रपंच उभारणार्‍या झाडांचे व्हावे तसे कौतुक होत नाही. माडाने माणसांच्या आयुष्यात कल्पवृक्षाचं स्थान तरी घेतलं. खजूराने रोझ्यांच्या गळ्यात गळा घातला. पण ताड उपेक्षितच राहिला. उन्हाळ्यात येणारे लोण्यासारखे, शहाळ्याच्या चवीचे ताडगोळे मटकावतांनाही ताडाच्या झाडाचं रुपडं कधी डोळ्यासमोर उभं रहात नाही.

खरच! दोन वर्ष अलिबागला शेकडो ताडामाडाच्या संगतीत राहून कोणा माणसाच्या डोक्यावर नारळ वा ताडगोळा येऊन आपटल्याने तो जखमी झाल्याचे मी कधीही ऐकले वा पाहिले नाही. इतकी तो सर्वांची काळजी घेतो.

तरीही  सुसंस्कृतांनी कसा श्लोक केला कोण जाणे! म्हणे,

(वृत्त- शार्दूलविक्रीडित)

(खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापितो मस्तके

वाञ्छन् देशमनातपं विधिवशात्तालस्य मूलं गतः ।

तत्राप्यस्य महाफलेन पतता भग्नं सशब्दं शिरः

प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितः तत्रापदां भाजनम् ।। )

(वृत्त- शार्दूलविक्रीडित)

सूर्याच्या झळया न सोसुन कुणी, शोधे जरा सावली

छाया त्यास मिळे अकिंचन अशा, त्या तालवृक्षापरी ।

कैसे त्या टकलू शिरी फळ पडे, झाडावरूनी महा

दुर्दैवी मनुजास संकट कधी, ना सोडते हो पहा ।।

एकंदर अत्यंत उपयोगी असूनही इतक्या पराकोटीचा बदनाम झालेला दुसरा कोणी वृक्ष परिवार नसेल.

 ताड आणि ताडी,---- फार फार तर नीरा हा कधी फारसा प्रतिष्ठितपणाची खुर्ची न लाभलेला, फारसा अनुभवला न जाणारा पेयप्रकार. नीरा आवडणारे अनेक असले तरीही उसाचा रस म्हटलं की जशी लोकांच्या डोळ्यात आधीच तृप्तीची चमक दिसते तशी, निरा ह्या नावाने न पीताही नेत्रात चमके ऐवजी जरा कल्पनिक झिंगच जास्त दिसायला लागते. ``येथे निरा मिळेल’’ अशा पाट्यांपाशी कधी झुंडीने लोक पहायला मिळत नाहीत. एक दोन उदास माणसं दिसली तर दिसली ह्या पल्याड ताडाला कौतिकाची नजर लाभली नाही.

कुठूनही कुठेही जातांना वाटेत कुठेही ताडाची झाडं दिसू शकतात असं मला आपलं वाटतं. रेल्वेनी जातांना दिसतात. बसनी जातांना दिसतात. ओसाडीत दिसतात.  हिरव्यागार वृक्ष परिसरातही दिसतात. गावात दिसतात, शहरात दिसतात. त्यांचा उंचीमुळे इतर झाडांमधून उठून दिसली तरी आहाहा ताडाचं झाड! अशी मन त्याची नोंद घेत नाही. आजुबाजूला विरळ अतंरावर त्याची पिल्लावळही पसरलेली दिसते. उंचच उंच खंबुळ्या खोडावर भल्यामोठ्या पंख्यांच्या आकाराची गोल गोल पानं खरतर छान आकाराची असतात. ह्या भल्यामोठ्या पानावरील नागमोड आणि करवत काठ बघत रहावी अशी सुंदर असते. पूर्वी गुरुकुलात शिकणारे अनेक बटु ह्या तालपत्राची छत्री डोक्यावर धरून जातांनाची छान छान चित्रही मी पाहिली आहेत. पण आता गावाकडीची मुलही शाळेत जातांना डोक्यावर ताडाच्या पानाची छत्री धरून जातांना दिसत नाहीत.

 नारळाच्या झावळ्या जशा गळून पडतात वा तट्ट्या विणण्यासाठी कापल्या जातात तशी ताडाची आनंदानी उभी असलेली हिरवी पानं सुकल्यावर, न कापण्यामुळे वा न गळण्यामुळे खाली वाकतात आणि पाहता पाहता हिरव्या पानांच्या खाली काळ्या सुकलेल्या, वाकलेल्या पानांचे थर तयार होतात. लांबून पाहतांना मला हे थर दाढीचे खुंट वाढलेल्या भिक्षेकर्‍याच्या उदासवाण्या चेहर्‍यासारखा का दिसायला लागतात न कळे.  एकेका झाडाच्या नशिबीही वनवास असतो खरा!

अनुकरणशील माणासानी निसर्गात जे जे दिसेल त्याचं त्याचं अनुकरण करून पाहिलं. बिन फांद्यांच्या सरळसोट उभ्या असलेल्या ताडाकडे पाहत त्यानेही दोन्ही पायांची जेमतेम बोटं टेकवीत व जास्तीत जास्त हात वर ताणून उभं राहून, ताडासन करून पाहिलं. वा एका पायावर उभं राहून हात कानाला लागून वरती  नमस्कारात जोडत वृक्षासन केलं. ``ताडासारखं उंच व्हायचं असेल तर ताडासन करा.’’ असा बुटक्या मुलांना आदर्श घालून वा दटावून झालं. किंवा प्रमाणाबाहेर उंच होणार्‍या मुलाला काय ताडमाड वाढलाएस पण अजून अक्कल नाही अशी कानपिचकीही झाली.

बडा हुवा तो क्या हुवा जैसे पेड खजूर

पान्थन को छाया नही; फल लागत अति दूर

 असं म्हणून कबीराने यशोशिखरावर आरूढ झालेल्या थोर पण लोकहिताकडे पाठ फिरवलेल्या व्यक्तिमत्त्वांचा चांगलाच समाचार घेतला. बाबा रे मोठा झालास म्हणजे काय मोठे दिवे लावलेस? ते खजुराचं झाड ही वाढतचं की रे आकाशाएवढं! पण काय उपयोग? ना त्याची झुरमुट पानं कोणाला सावली देतात ना कोणाची भूक भागवतात. कारण फळं लागली तरी ती इतकी उंच असतात की काढणं सहजसाध्य नाही.

अशी निरुपयोगी नर-जीवनाची सांगड ह्या फांद्या न फुटणार्‍या ताड-माड परिवारातील झाडाशी घातली गेली आणि झाड हिरमुसलंच झालं. माणसाला म्हणू लागलं, ``अरे बाबा, `नाचता येईना अंगण वाकडेहे तूच शिकवतोस  सगळ्यांना?  हे  जर ठीक असेल,  तर चढता येईना  झाड उंच सरळसोटे असही म्हण ना. तुझ्या कमतरतांचा राग उगा आपला माझ्यावर काढणं बरोबर का आहे?

माझी महती एकट्या बलरामदादाला कळली. त्याने तालवृक्षाच्या गोल पंख्यासारख्या करवतकाठी पानाला त्याच्या ध्वजावर स्थान दिलं. एकेकाळी बलरामदादाच्या आगमनाची वार्ता सर्वांना देत मी त्याच्या डौलाने फडकणार्‍या ध्वजेसोबत मानाने मिरवत होतो. उंच वाढणं हा देवानं मला बहाल केलेला गुण आहे. तो प्रत्येकाला गृहीत धरायलाच लागतो. माझी मुळं पाताळात रुतवून मी पृथ्वीवर डोलतो आणि माझा झुलता पर्णमंच मी स्वर्गात तोलून धरतो. पाताळ, पृथ्वी, स्वर्ग अशा त्रैलोक्यात एकाच वेळी मी उपस्थित असतो.

 माझ्या ह्या पानांच्या झुलत्या रंगमंचावर सूर्यनारायण विराजमान होतात. रात्री चंद्र रोहीणीसवे जे  अद्भुत नाट्य सादर करतात तेही माझ्याच कलामंचावर! माझ्या झावळ्यांनी/ पंखेरी पानांनी मी त्या प्रकाशयोजनेला एक वेगळी गूढता देतो. वर्षादेवी ह्या कलामंचावर धारानृत्य करतात. त्यावेळी माझ्या मुळांमुळांमधून मी जमिनीच्या पोटातल्या पाण्याचे वा समुद्राच्या लहरींचे गाणे एकत असतो. तर पानावर आकाशातील धारा नृत्य अनुभवत असतो. कोणी तरी गुणगुणत असल्याचा भास झाला,----

ताड माड झाड उंच

शेंड्यावर पर्णसंच

बहु हिरवागार कंच

नभस्पृशं नभस्पृशम् ----- 1

 

जणु झुलता रंगमंच

त्यावरती चंद्रबिंब

सवेचि तारकापुंज

शोभतात नभस्पृशम् ------2

 

स्वर्गीचा कलामंच

घेऊन साराचि संच

अद्भुतचि कलाप्रपंच

चालतसे नभस्पृशम् -----3

झाड गात होतं मी कौतुकाने बघत राहिले. ऐकत राहिले.

नभस्पृशं नभस्पृशम्!

-----------------------------------------

लेखणी अरुंधतीची

 

No comments:

Post a Comment