Wednesday 23 November 2022

गाणारे झाड -

 

    गाणारे झाड -

             कधी काळी मुंबईच्या आमच्या घराशेजारीच एक बाग होती.  बागेच्या प्रवेशदारातून आत गेल्या गेल्या समोरच क्रोकोडाईल पामची चार झाडं होती. सुसरी, मगरीच्या कातडीसारखे खवल्या खवल्यांचे, फांद्या नसलेले, सरळसोट बुंधे आणि वर दाट झिपर्‍या झावळ्यांची छप्परं. बागेतल्या इतर सुंदर फुलणार्‍या तरुवरांच्या तुलनेत फार लक्ष जाण्यासारखी झाडं नव्हती. पण बागेत आलं की कोणाचंही लक्ष वेधून घेण्याची एक कला त्यांच्याकडे होती. 

ह्या चार झाडांपैकी एका झाडावरच्या झावळ्या दाट, गच्च वाढल्या होत्या. झाडावर बसलेले पक्षी जराही दिसणार नाहीत इतक्या. खाली काळीशार मांजर उभी असली तरी झाडाच्या खवल्यांना पार करून वरती जायची हिम्मत तिला नव्हती. पक्ष्यांची अशी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणारं हे झाड चिमण्यांचं आवडत होतं. झाडाची बॉटलग्रीन रंगाची गडद हिरवी पानं, काळ्याकडे झुकणारा तपकिरी बुंधा, मुळाशी पोपटी हिरवळ आणि त्यावर झाडावर भुर्र भुर्र उडणार्‍या चिमण्यांकडे आपले पिवळे जर्द डोळे लावून बसलेली, तोंडाला पाणी सुटल्यामुळे मिशा फुरफुरणारी काळी मांजर! पाहिल्या पाहिल्याच कोणालाही गालातल्या गालात तरी हसू येईल असं मोठं रम्य दृश्य असे! उजाडण्यापूर्वीच प्रचंड चिवचिवाट करायला लागणारं, खूप बोलणारं, अखंड गप्पा मारणारं आणि पहाटे पहाटे मला घरी बोलावणं पाठवणारं, माझा हात धरून मला बागेत यायला लावणारं ते झाड आज मुंबई सोडून गेल्यावरही--- अजूनही मला झोपेतून उठवत असतं. ----

 

एक आठवे मज सुंदरसे झाड बोलके किलबिलणारे

रोज पहाटे जागे होई तानांवरती ताना घेई

 

कितीक होते तरु बलाढ्य ते तोरा दावित उभे सभोवती

एक बोले परी कधीही टकळी याची सुरूच राही

 

कधी दिसले ओठ तयाचे जीभ त्याची चुरचुरुणारी

कंठही त्याचा कधी दिसला मधुर मधुर परि गमे वैखरी

 

मधेच उडती भुर्रऽऽऽ आकाशी पंख लावुनी गप्पा गोष्टी

कंठ कोवळे नित सांभाळी आई बाबा जरी जवळी

 

कितीक गलका संध्याकाळी वाटे सुटली शाळा का ही ?

पंखचि फुटले त्याला वाटे का मुंबैची लोकल आली.

 

पंख नव्हे ह्या बटाचि सुंदर उडती कैशा मस्त हवेवर

दिवा मालवुन जाता भास्कर गाढचि झोपे सुंदर तरुवर

 

कुठे राहते जवळपास मी परी शोधला पत्ता त्यानी

रोज पहाटे किलबिल बोले अबलख तरु तो माझ्या कानी

 

``कशी झोपली अजून इतुकी ऊठ ऊठ गे पहाट झाली''

प्रसन्न हृदये मला जागवी । ये ऐकाया निसर्गबोली

 

बोटाला मम धरुनी ओढत मला नेतसे लवकर लवकर

किलबिल ऐकुन ती मी बोले देवा तव ही सृष्टी सुंदर

 

आज तरू तो नाही जवळी । परी गुंजते किलबिल त्याची

रोज पहाटे माझ्या कानी । चिंब सुखाने होते जागी

----------------------------------------------------------

               लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment