Thursday 24 November 2022

समुद्र आणि ढग / झुंज

 

समुद्र आणि ढग / झुंज

 

एकदा अशीच मी। सागरातटी उभी

श्वास रोधुनी बघे। झुंज ती भयंकरी

 

काळ मेघ दाटले। झुंडिने नभांगणी

जणु गजेंद्र ठाकले। प्राशुनीच वारुणी

 

दुंदुभीच वाजती । धाड ताड अंबरी

धावले पिसाट हे । गर्जुनी भयंकरी

 

मेघ, अग्नि, दामिनी । वायुच्या उभे रथी

उन्मळून टाकिले । सघन हे तरू किती

 

किरण-सैन्य सर्व हे । रोखुनी अधांतरी

थांब भास्करा ’! असे । गर्जुनीच सांगती

 

ग्रस्त जो क्षयामुळे । झाकुनी मुखास तो

चंद्र ही लपे कुठे । चांदण्यां सवेच तो

 

नीर-तीर सोडता । धीर जलधिच्या उरी

झेलुनि प्रहार ते । विद्ध होय अंबुधी

 

रक्त रंगि नाहला । नील-रंग सौंगडी

छेडिता तया जरा । खवळला महारथी

 

शंख फुंकिता रणी । व्योमही थरारले

गर्जला भयंकरी । रोम रोम ते उभे

 

तरंग सैन्य संगति । घेउनीच संगरी

धडकला तटी तटी । धडाडधाड सिंधुही

 

फेन धवल करकरा । दात रगडिले महा

लाललाल वीचीहि । कालिच्या जिभा जशा

 

घास घ्यावया अधीर । धावती कशा पहा

नागराज सळसळे । काढुनी फणा जसा

 

पाहुनीच ऊग्र ते। रूप काळभैरवी

मेघ कोसळे रणी । बिथरलेच सैन्यही

 

थेंब थेंब चाटुनी । घेतसे महोदधी

काळ मेघ ना उरे । औषधास एकही

 

शांत तृप्त होउनी । सुस्त पसरती तटी

खेळती तरंग हे । धरेस घालुनी मिठी

 

--------------------------------

 

No comments:

Post a Comment