Saturday 30 September 2023

शब्द –

 

शब्द

कधी एकटी हिंपुटी बैसता मी

उदासी मना व्यापुनी राहता ती

सुटावी जरा गाठ अन् ओवलेले

मणी सर्व चौफेर ते ओघळावे ।। 1

 

तशी शब्दरत्नेच स्वर्गीय सारी

कुठे काव्यलेखांमधे गुंफलेली

सुटोनीच हृद् अंगणी धावताती

बघोनी तया चित्त हे लुब्ध होई ।। 2

 

जसे निर्झराने उड्या घेत यावे

तुषारांस त्या मुक्तहस्ते लुटावे

प्रपाताचिया त्या तुषारांप्रमाणे

उड्या घेत फैलावती शब्द सारे ।। 3

 

किती त्याचि शब्दावरी अर्थपैलू

तयातून फाकेच अर्थप्रकाशू

किती रंग दीप्तीतुनी व्यक्त होती

बघे विस्मये कौतुके मी तयांसी ।।4

 

तयातून जोत्स्नाच फाके सुवर्णी

तयांच्या प्रकाशी झळाळेच वाणी

मला सांगती शब्द ते गूज काही

अम्ही नूपुरे शारदाम्बा पदीची ।। 5

 

मिळो नाद वा गंध वा रंग दीप्ती

अहो शारदाम्बेचिया पाऊलांची

पदांचा तिच्या स्पर्श आम्हा मिळावा

तिचा डौल चालीतला प्राप्त व्हावा ।।6

 

म्हणोनीच केली पदी ह्याच दाटी

अगे बैसलो जन्मज्मांतरीही

अहो धन्य आम्ही पदस्पर्शमात्रे

मिळे मोद आमोद तो संगतीने ।।7

 

सुपुष्पे असू इंद्रबागेतलीही

परी शारदाम्बा पदी लीन आम्ही

मिळाया महा मोद आमोद पायी

विसावाच घेऊ तिच्या पादपद्मी ।। 8

 

कुठे शारदाम्बा? मला का दिसेना?

विचारेच भांबावुनी मी तयांना

``करी लेखणी घे मनी शब्दमोती

तयांच्याच दीप्तीत साकार होई ।। 9

 

कळी रत्नवेलीस ये माणकांची

मिळे सागराला जशी चंद्रकांती

हिमाद्रीच होतो जसा स्वर्णकांती

करी काव्य तैसे सुवर्णाक्षरानी’’ ।।10

 

 धरी हात शब्दांक्षरांचाच तूची

तुला शारदेच्या पदी तेच नेती

तयांच्याच दीप्तीत नेत्रांसमोरी

पदे माऊलीचीच येती दिसोनी ।।11

--------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment