Sunday 1 October 2023

कांचन -

 

कांचन -


पाऊस ओसरता ओसरता फुलणारा उंचापुरा गगनचाफा आकाशाला भिडायला निघाला असता; पानाफुलांची पसरट छत्री असलेली, थोडीशी ठेंगणी  कांचनची झाडं आकर्षक गुलाबी कधी लाल, कधी दोन रंगांचे मिश्रण तर कधी जांभळट तर क्वचित पांढर्‍या मोठ्या फुलांनी बहरून आली की गार्डनची फुलाफुलांचे प्रिंट असलेली छानशी साडी नेसलेली एखादी रमणीच माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. धीरगंभीर गगनचाफ्याच्या शेजारी फुललेली श्रीमंत कांचन ही जोडी जराही विजोड न वाटता मनाला प्रफुल्लित करून जाते.   

 

लाल, गुलाबी, निळी जांभळी

फुलाफुलांची नेसुन साडी

पदर घेउनी हातावरती

उभी नार का जणु बाजिंदी-----1

 

दावित  अबलख रंगसंगती

रंग फुलांचे आकर्षक अति

जाणार्‍यांच्या नजरा वेधुन

सहज घेतसे कांचन बाई ------2

 

जशी नर्तकी तीन ठिकाणी

मोहक मोहक तनू वाकवी

तसे तरूचे वळण पाहुनी

तिला पाहण्या थबके कुणिही ------3

 

निघे कामिनी सजुनी धजुनी

अवचित सर ती येइ धावुनी

चिंब होतसे जैसी रमणी

दिसे तशी ही कांचन भिजुनी ------4

 

जरा ठेंगणी पसरट बांधा

मोठ्या घरची शोभे बाला

कुसुमांनी बहरताचि वाटे

नखशिखांत नटली कांचनबाला ------5

--------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

 

 


 

No comments:

Post a Comment