Thursday 21 September 2023

माझी चाल

                                                              माझी चाल

( वृत्त – भुजंगप्रयात )

अहो चालते वृत्त मार्गावरी मी

दिमाखात तोर्‍यात सर्वांपुढे मी

कळेना परी वल्लभा तो म्हणेची

"कुठे पाहतेचालते तू कुठे ही"

 

असे नगिणीसारखी चाल माझी

`भुजंगाप्रमाणेच झोकात जाई

पतीला परी वाटते केरसूणी

"तुझी ओढणी मार्ग झाडी त्वरेनी"

 

कधी वृत्त झोका नभा स्पर्शिता हा

वदे मीच आनंदुनी आअहाहा!

पती बोलतो गे ऽऽ चि "खड्डा पहा हा!

तुझा मोडता पाय होईल हा हा!"

 

स्रवे वृत्त-निस्यंदिनी चित्तकोषी

गमे माधुरी अमृताचीच राशी

परी वल्लभा ना तयाचीच गोडी

चहासी वदे शर्करा घाल थोडी

 

मला  काव्य ने कल्पनांच्या तळाशी

भरारी कधी घेत आकाश-देशी

"कशाच्या सवे खाऊ या काव्यराशी

वदे  ``अन्नपूर्णे!’’ पती ``मी उपाशी’’

 

कधी स्वार अश्वावरी श्यामकर्णी

दिमाखात दौडेच मी अश्वधाटी

"नसे षोडशी राहिली तू तरूणी"

करी व्यक्त चिंता पतीचीच वाणी

 

कधी चंचला चालते मी हरीणी

कधी मीच हंसी कधी मी मयूरी

``तुझी काव्यसंध्या असे का जरूरी’’

म्हणे जांभई देत तो ``झोप बाई!’’

-----------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-



No comments:

Post a Comment