Thursday 14 September 2023

पावले उषेची -

 

पावले उषेची -


तुरळक तुरळक मेघांवरती

अलगद अलगद ठेवत पाउल

उषा हासरी आली आली

जरा न लागू देता चाहुल -------

 

दवबिंदूतच न्हाउन आली

ओलेती सुकुमार सुंदरी

गुलाबकलिका जणु वाटावी

इतुकी कोमल प्रसन्न हसरी---

 

व-मौक्तिक ते चुकार काही

केसांमध्ये तिच्या चमकती

अलंकार हे दवबिंदुंचे

रत्नमालिकांना लाजवती

 

मधुर मधुर मधुबोल तिचेची

पवनावरुनी सुदूर जाती ----

पुष्पमधुसमा तिचीच वाणी

जणू उचलली द्विजवृंदांनी -----

 

तिची पावले  कोमल कोमल

कमलकळीचे घेउन मार्दव

रंगहि त्यांचा घेउन अबलख

जलदांवरुनी जाती चालत ----

 

लाल गुलाबी जलद रंगले

सोनेरी अन निळे जांभळे

नभ जे होते काळे काळे

चमकु लागले निळसर अवघे ----

 

शुक्र चांदणी परि चमचमती

घरी जायचे विसरुन गेली

उषा राणिच्या आगमनाचे

कौतुक सारे बघत बैसली ------

 

तळव्यांचे ते गुलाब-कोमल-

ठसे उमटले दवबिंदुंवर

विशाल नभिचे रंग मनोरम

राहुन गेले मनात कायम ----

----------------------------------

#लेखणीअरुंधतीची-

No comments:

Post a Comment