Monday, 20 March 2023

आम्रयोद्धा -

 

आम्रयोद्धा -

बोलण्यानी मन कळतं फुलण्यानी झाड कळतं. काही झाडं फुलांच्या फुलण्यानी कळतात तर काही झाडं फळांच्या लगडण्यानी कळतात. मोगरा, गुलाब, बकुळ पारिजात, गुलमोहर, त्यांच्या फुलांमुळे सुशोभित होतात. तर संत्री, पपया,  फणस, त्यांच्या फळं लगडण्यानी ऐश्वर्यशाली होतात. पेरूची फुलं आणि गुलमोहराची फळं मुद्दाम पाहिली जात नाहीत. बकुळीची फुलं जमिनीवरूनही उचलून घेतली जातात पण वर पाहून त्याला आलेल्या फळांची कोणी फार प्रशंसा करत असेल असं वाटत नाही. पपईला नर फुलं आली तर आनंदित होण्याऐवजी अरेरे म्हणून त्याचा तिरस्कार होतो तर नारळाच्या पोयीला छेद घेऊन त्याखाली मडकं बांधलं जातं.

पण एकच आम्रवृक्ष असा आहे की त्याच्या इवल्या इवल्या फुलांच्या मोहराचा सर्वांनाच मोह पडतो. बाणाप्रमाने टोकदार, जोमदार आलेले फुलांचे हिरवे किंवा तांब्याच्या रंगाचे मरून तुरे सार्‍या वृक्षाच्या अंगावर आनंदानी काटा आल्याप्रमाणे दिसतात. किंवा बाणाप्रमाणे टोकदार, जोमदार आलेले फुलांचे तुरे म्हणजे वसंताने पुष्पधनुष्याला लावलेले बाण आहेत असे म्हणत कालिदासही म्हणतो ``वसंत योद्धा समुपागतः प्रिये ।’’ मोहरलेले आंब्यांचे डेरेदार  झाड येणार्‍या जाणार्‍याला वेड लावल्याशिवाय राहात नाही.

फुलारलेला आम्रवृक्ष जितका सुंदर दिसतो तितकाच लांबलचक देठांच्या लोंबकाळणार्‍या कैर्‍यांनी लगडलेले, पाड लागलेल्या आंब्यांचे झाडही मोहक असते. आम्रतरुच्या लावण्याचं अधिराज्य डिसेंबर जानेवारीपासूनच सुरू होतं ते थेट पावसापर्यंत टिकून राहतं. पावसानंतर त्याला येणारी सशाच्या कानासारखी लांब लालेलाल पानंही झाडाला परत सुंदर बनवतात. मातीत पडलेली आंब्याची कोयही पावसाने रुजून वर येते आणि लहान बाळाच्या तळव्यासारख्या कोवळ्या लालबुंद पानांना जन्म देते. चैत्रापर्यंत घराच्या तोरणाला, पूजेला कलशाच्या पाण्यातही ही पानं स्थानापन्न होतात. आणि आंब्याचं राज्य  माणसाच्या मनावरही अधिराज्य गाजवत राहतं.

फुलांनी मोहरलेल्या आंब्यावर कविता लिहायचा मोह मला आवरला नाही.

 

मोहरला मोहरला । आम्रतरू मोहरला

 दरवळला दरवळला । आसमंत घमघमला

 

सरसरून सर्वांगी । काटा हा फुलला का

मधुर स्पर्श तरुला ह्या । कुणि केला कुणि केला

 

तरुवर हा बघतांना  । मज वाटे आज मना

मदनाचे सैन्य जणु । शर जोडुन सज्ज सदा

 

मदनाचे पुष्पबाण । सज्जचि हे वेधाया

हाय! हाय!! हृदयांसी । हसत हसत सर्वांच्या

 

वार्‍यावर उधळतीच । सौगंधी अश्व दहा

वायुसवे सौरभ हा । रानभरी वावरला

 

कुहू कुहू चढत जाय । तानचि ही गगनाला

येण्याची ललकारी । विश्वजयी मदनाच्या

 

`परिवर्तनहाचि कुणी । पृथुल असा ऐरावत

पायघड्या पुष्पांच्या । चालतसे डुलत झुलत

 

डौलदार चाल छान । कनक छत्र सूर्य धरत

 

अंबारी नवअंबर । पवनराज चौरीधर

अवतरला पृथ्वीवर । कुसुमाकर दिमाखात

 

किलबिलाट भाट करत । मधुकर करि मधुगुंजन

पराभूत शिशिर घेत । माघारचि धरणीवर

---------------------------------------------------------

लेखणी अरुंधतीची


आंब्याची स्तुती करायचा मोह पूर्वजांनाही झाला .त्यांनी केलेली आम्रस्तुती मराठीतून येथे देते.

आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं

 प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां

श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||

 

पाणीपाणिच जाहले हृदय हे त्या नारळाचे कसे

सर्वांगी फणसाचियाच फुलला काटा कसा हा बरे ।

गेले ते फुटुनीच उंबर कसे; खाली झुके केळ ही

द्राक्षेही अति काळवंडुन कशी झाली मनाने खुजी ।।

 

झाले जांभुळ जांभळे नच कळे चाले मनी काय त्या

झाली मत्सरग्रस्त सर्वचि फळे वाटून हेवा तया ।

आहा! रंग सुगंध स्वाद भुलवी पंचेद्रिया आम्र हा

लोकांच्याच मुखातुनी स्तुति अशी ऐकूच येता सदा ।।

---------------------------------

 


No comments:

Post a Comment